त्या दिवशी रात्री झोपताना मोबाइल ‘सायलेंट’ करायचा विसरलो आणि नेमका सकाळी साडेचार वाजता मोबाइल वाजला. मेसेज आलेला होता. झोप मोडलेलीच होती. मेसेज पाहू लागलो.
या साखरझोपेच्या वेळी आलेल्या मेसेजबद्दल उत्सुकता वाढली. एखाद् वेळी रात्री पाठवलेला मेसेज उशिराने थकूनभागून पहाटे येऊ शकतो, किंवा एखादा उत्साही महाभाग एवढय़ा सकाळी ‘सुप्रभात/ Good Morning’ असा मेसेजही पाठवू शकतो. पण मेसेज वेगळाच आणि धक्कादायक होता. कुत्रा चावल्यामुळं सरकारी दवाखान्यात गावाकडच्या मित्राचा मृत्यू झालेला होता. अवघा दोन वर्षांचा संसार नि एक वर्षांची मुलगी मागे टाकून निघून जाण्याचं हे वय नव्हतं. झोप मोडलीच नाही तर उडाली होती. सकाळी सहा वाजता बातमीचे तपशील कळले. दहा-अकरा वर्षांनी लहान असलेल्या या मित्राला निदान शेवटचं ‘बाय’ करायला दवाखान्यात जावं असं ठरवत होतो. खरं तर लहानपणी या मित्राला कडेवर घेऊन मी खेळलेलो होतो. शिवाय त्याचे वडील आमच्या अध्र्या गावाचे डॉक्टर. या डॉक्टरांनी अनेकांच्या प्रकृतीची काळजी घेतलेली. छोटय़ाशा गावात या डॉक्टरांचाच आधार. आणि आज या डॉक्टरांचाच मुलगा रॅबिजमुळं गेलेला. शेवटची भेट घेण्याचा प्रयत्न यशस्वी झाला नाही. कारण भल्या पहाटेच प्रेत घेऊन लोक गावाकडं गेले होते. रात्री घरासमोरच्या अंधारात मित्राच्या पायात कुत्र्याचं पिल्लू आलं. त्या पिल्लाच्या अंगावर पाय पडल्यामुळं ते केकाटत पळून गेलं. मित्रानं सकाळी पाहिलं तर पायावर ओरखडा उमटलेला होता. नख किंवा दात लागलेला असावा. खबरदारी म्हणून गावातल्या सरकारी दवाखान्यात इंजेक्शन घेण्याकरिता मित्र गेलाही; पण नेमकं रॅबिजचं इंजेक्शन उपलब्ध नव्हतं. डॉक्टरांनी जिल्हा रुग्णालयात जायला सांगितलं. ‘पिल्लू तर होतं..!’ म्हणून मित्रानं कंटाळा केला. नेमका रॅबिजचा प्रादुर्भाव उद्भवला. परिस्थिती फारच हाताबाहेर गेली तेव्हा दोन जिल्हे ओलांडून इथं औरंगाबादला आणला. घाटी रुग्णालयात दाखल केलं. प्रचंड ओरडायचा. हात-पाय बांधावे लागले होते. पण रात्री उशिरा सर्व काही शांऽऽऽत झालं. सर्व इलाज उपलब्ध असतानाही या काळात कुत्रा चावल्यामुळं तरणा पोरगा असा जावा, याची संगती लावता येईना.
एक काळ होता- यावर दवाखाने, उपचार उपलब्ध नव्हते. कुत्रे तर चावायचेच. अशावेळी गावठी इलाज करण्याशिवाय पर्याय नव्हता. आंध्राच्या सीमेवर असणारं कुंडलवाडी हे गाव या औषधाकरिता प्रसिद्ध होतं. तिथं एकजण नि:स्वार्थ हेतूनं हे औषध द्यायचा. लहानपणी एकदा दह्यासोबत हे औषध घेतल्याचं मला आठवतंय. दूरदूरच्या गावांवरून लोक यायचे. लोकांना गुणही यायचा. मोकाट कुत्र्यांनी कित्येकांच्या पिंढऱ्या, ढोपरं फोडलेले आठवू लागले. श्वानपुराण डोक्यात घुमू लागलं. मुळात कुत्रा चावण्याची भीती करण्याचं कारण म्हणजे चौदा इंजेक्शनची दहशत. साधं इंजेक्शन म्हटलं तरी मोठी माणसंसुद्धा घाबरून जायची. कुत्रा चावल्यावर तर तेव्हा चौदा इंजेक्शन्स, तीही बेंबीच्या भोवती घ्यावी लागायची. या रॅबिजबद्दल अनेकदा चर्चा चघळल्या जायच्या. पिसाळलेला कुत्रा चावलेला माणूस कुत्र्यासारखा भुंकायला लागतो, हा माणूस दुसऱ्या माणसाला चावला तर तो माणूस मरतो, कुत्रा चावल्यानंतर दहा वर्षांत कधीही रॅबिज उद्भवू शकतो, अशी माहिती भोवताली भिरभिरत असे.
एकदा रात्री एक- दीड वाजता गलका झाला- म्हणजे कुत्री भुंकू लागली. आरडाओरडा झाला. गाढ झोपलेली गल्ली जागी झाली. तेवढय़ा रात्री लोक डोळे चोळत गणपतीच्या पाराजवळ गोळा झाले. आम्ही छोटी मुलंही हजर होतो. शेजारच्या खेडय़ातून बैलगाडीत घालून एका माणसाला रातोरात आणलेलं होतं. एरवीही पाराजवळच्या दवाखान्यात बैलगाडीतून पेशंट यायचे. पण यावेळी पेशंटला दोरीनं बांधलेलं होतं. तरीही तो बांधलेला माणूस हातपाय झाडत होता. विचित्र ओरडत होता. त्याच्या घशात काहीतरी अडकल्यासारखं वाटत होतं. त्या माणसाला पिसाळलेला कुत्रा चावलेला होता. त्या रात्रीपासून कुत्र्याबद्दलची दहशत मनात बसली. पुढं याच विषयावरची सरदार जाधव यांची ‘दात’ नावाची अप्रतिम कादंबरी वाचनात आली. या कादंबरीत कुत्रा चावलेल्या माणसाला गाव एका वाडय़ात कोंडून ठेवतं. घरचे लोकही त्या रॅबिज झालेल्या व्यक्तीजवळ जाऊ शकत नाहीत. एखाद्या पिसाळलेल्या रानटी प्राण्यासारखा पाय खोरून त्याचा एकाकी अंत होतो. गावात पाहिलेली व अंगावर काटा आणणारी दृश्ये या कादंबरीत आहेत.
प्रत्यक्ष नाही, पण डिस्कव्हरी चॅनलवर शिकार करताना रानटी कुत्र्यांना आपण पाहिलेलं असतं. त्यांची हिंस्रता पाहताना आपण टरकलेलो असतो. यातली काही रानटी कुत्री माणसाच्या वस्तीत येऊन माणसाळली. प्रसंगानुरूप वागू लागली. कधी शेपूट हलवत लाडात यायचं आणि कधी सुळे, दात दाखवत फोडून काढायचं, याचं गणित त्यांनी अवगत केलं. बऱ्याचदा डुकराच्या पिलाला चार-पाच कुत्री खिंडीत गाठतात. पाठलाग करून चहूबाजूनी हल्ला चढवतात. शेवटी त्या डुकराला फाडून काढतात. डुक्कर जिवाच्या आकांतानं चीत्कारत असतं. अर्थात सगळेच कुत्रे असे फाडू नसतात. काही कुत्री साजूक तुपात भिजवलेल्या फुलवातीसारखी नाजूक असतात. जणू तोडणीचा स्वच्छ-शुभ्र कापूस घरभर तुरतुरत असतो. स्वत:च्या भुंकण्याला स्वत:च घाबरणारी ही कुत्री संरक्षणासाठी नसतातच मुळी. खेळण्यांसारखे असतात बिचारे. पण मोकाट कुत्र्याचं हिंस्र रूप ज्यानं पाहिलंय त्याला कुत्रा सुरक्षित अंतरावरच बरा वाटतो. बऱ्याचदा मोठी गंमत होते. आपण एखाद्या घरी जातो. बेल वाजवतो. दार उघडलं जातं, आणि भला थोराड कुत्रा अंगलट यायला लागतो. आपण त्या कुत्र्याला बघूनच टरकलेलो असतो. त्यात भर म्हणजे तो विचित्र कुत्रा आपल्या छातीवर चक्क त्याचे समोरचे पाय ठेवतो. तेव्हा तर छातीतले ठोके शाळेच्या घंटेसारखे ऐकू यायला लागतात. अशावेळी घरमालक मात्र ‘काही करीत नाही. त्याचा खेळच आहे तो!’ असं सहजपणे सांगत असतात. ल्ह्या-ल्ह्या करणारी जीभ आणि तीक्ष्ण सुळे व दात दाखवत छातीवर पंजे ठेवून उभ्या असणाऱ्या त्या कुत्र्याचा खेळ जीवघेणाच आहे. एखाद्या दहशतवाद्यानं आपल्या कानशिलात पिस्तूल लावलीय, आपल्याला दरदरून घाम फुटलाय आणि कुणीतरी समजूत घालतंय- ‘घाबरू नको, गंमत करतोय तो. शिवाय त्यानं गांधींचं साहित्य वाचलेलं आहे..’ असा तो प्रकार आहे. कसेतरी आपण सोफ्यावर टेकतो, तर घरमालक व घरमालकीण श्वानस्तुती आळवत असतात. संगोपनाचं कौतुक ठीक आहे, पण अशा घाबरवेळी, त्या कुत्र्यानं कडाडून चावा घेतल्यावर आतल्या हाडाचाही तुकडा पडतो, हे सांगण्याची गरज नसते. पण ते बोलत असतात. घरमालकीण माहिती पुरवतात- ‘एखाद् वेळी सुरेश रैनाकडून कॅच सुटेल, पण आमचा कुत्रा कसंही फेकलेलं टोमॅटो झेलणारच. त्याला लाल टोमॅटो खूप आवडतात.’ अजून बरंच काही! हे ऐकून वाटतं, घराच्या दारात स्टेनगनधारी रक्षक ठेवण्याऐवजी ‘सावधान.. कुत्रा मोकळाच आहे!’ अशी गेटवर पाटी लावली तरी काम चालू शकतं.
कथा-कादंबऱ्यांतून, चित्रपटांतून ‘टिप्या’, ‘मोती’ यांचं खूपच रसभरीत चित्रण आलेलं आहे. त्यातली अतिशयोक्ती सोडली तर श्वानपथकातील कुत्र्यांची कामगिरी थोरच आहे. आपल्याकडे कुत्र्याच्या इमानदारीवर रचल्या गेलेल्या कहाण्यांना नाटय़-दिग्दर्शक कमलाकर सारंगांनी कलाटणी दिलेली आहे. कोकणातलं बालपण सांगताना सारंग त्यांच्या वफादार कुत्र्याबद्दल सांगतात. हा कुत्रा त्यांच्या घरात वाढलेला. छोटय़ा सारंगांच्या मागे सावलीसारखा राहणारा. सारंगांनाही त्याचा खूप लळा. पुढील शिक्षणासाठी छोटय़ा सारंगांना कोकणातलं गाव सोडून मुंबईला जायचं असतं. त्या आवडत्या कुत्र्याला सोडून जायची कल्पनाच सारंगांना सहन होईना. आपल्या माघारी याचं काय होईल? कसा राहील तो? या चिंतेनं सारंग परेशान. शेवटी जाण्याचा दिवस उजाडतो. छोटय़ा सारंगांना सोडायला सारं घर समुद्रावर जमलेलं. सोबत कुत्राही. कुत्रा सारंगांना सोडतच नाहीये. जणू पुढचा विरह त्याला कळलाय. जड पावलांनी आणि भरल्या डोळ्यांनी छोटे सारंग बोटीवर चढतात. काठापर्यंत येऊन कुत्रा स्तब्ध उभा. मालकाकडं पाहतोय. बोट हलते. घरची मंडळी वापस घराकडं निघतात. कुत्रा उभाच. छोटय़ा सारंगांचं लक्षही कुत्र्याकडंच. बोट हळूहळू आत सरकतेय. किनारा लांब जातोय. कुत्रा जागचा हलतो आणि शेजारी जेवण करीत बसलेल्या माणसाजवळ जाऊन शेपूट हलवायला लागतो. सारंग हे दृश्य लांबून पाहतात. पुढच्या प्रवासासाठी निश्चिंत होतात. खरंच आहे. जिवंत राहण्यासाठी कुत्र्याला कुणासमोर तरी शेपूट हलवावी लागेल, किंवा हिंस्र होऊन जनावरं फाडावी लागतील. जगण्यापुढं शेवटी वफादारीही लोळण घेते.
कुणालातरी आपल्या आज्ञेत ठेवणं माणसांना मुळातच आवडतं. लहान मूलसुद्धा चार-पाच वर्षांचं होईपर्यंत सर्वाना निरागस, गोंडस वाटत असतं. नंतर मात्र ते मूल स्वतंत्र विचार करायला लागतं. म्हणजे आपली प्रत्येक गोष्ट ऐकत नाही. मग तिथं संगोपन आणि संस्कारांचा अध्याय सुरू होतो. आंधळं अनुकरण संपतं. त्याबरोबर गोंडसपणा, निरागसता संपते. मग ताणतणावाला सुरुवात होते. त्यामानाने कुत्रा आज्ञाधारकपणे वागत असतो. ‘छूऽऽ’ म्हटलं की पळतो. ‘यूऽऽ’ म्हटलं की येतो. एरवी कुणीच आपलं ऐकत नसताना कुत्रा मात्र आपलं ऐकतो. स्वत:ची मतं व्यक्त न करता ‘कंपनी’ देतो. वाटलं तर जवळ घ्या, नाही तर साखळीनं जखडून ठेवा- त्याचं काही म्हणणं नसतं. (म्हणजे त्याला काही म्हणताच येत नाही. म्हणता आलं असतं तर मोठी पंचाईत झाली असती.) त्यानं लाडात यायचं की नाही, ते तुम्ही ठरवणार. तुम्ही ‘चूप’ म्हटलं की तो बिचारा शांत बसणार. या बदल्यात माणसंही त्याला अफाट सुखसोयी देतात. काही वेळा तर माणसापेक्षा त्याचा थाट जास्त असतो. कारणं काहीही असोत; काहीजणांना कुत्र्याची संगत आवडते.
काही वर्षांपूर्वीची घटना. भाडय़ाच्याच, पण ऐसपैस घरात राहत होतो. आमच्या शेजारचा प्लॉट रिकामा होता. तिथं पावसाचं पाणी साचून उंच गवत वाढलं होतं. मागच्या कोपऱ्यात बांधकामाचा राडारोडा आणून टाकलेला. त्याचा एक छोटा ढीग तयार झालेला होता. त्या ढिगाच्या आडोशाला एक कुत्री व्याली. डोळे न उघडलेल्या पिलांची कुईकुई सुरू झाली. कुत्री तिकडं कुणाला फिरकू देईना. कुणी तिकडं डोकावण्याचा प्रयत्न केला तर ती भुंकत अंगावर यायची. एकदा कुत्री नसताना मुद्दाम तिकडं जाऊन मी पिल्लं पाहिली. चांगली मांसल अशी वळवळणारी सहा पिल्लं होती. मधे काही दिवस गेले. पिल्लांचा आवाज वाढलेला होता. पिलांच्या मस्तीमुळं गवताच्या तळाशी हालचाल वाढली. एक दिवस तर चार पिल्लं रस्त्यावरच आली. नंतर कॉलनीत ही पिल्लं तुरुतुरु पळू लागली. लहान मुलं पिलांच्या शेपटय़ा धरून ओढायचे. मग जोरात केकाटण्याचा आवाज घुमायचा. घरोघरचे पोळी-भाकरीचे तुकडे खाऊन पिल्लं चांगलीच गुरगुरू लागली. एक दिवस मोटारसायकलखाली येऊन एक पिल्लू गतप्राण झालं. त्याची पोटातली छोटीशी आतडीच बाहेर आली होती. उरलेल्या पाच पिलांपैकी दोन पिल्लं लोकांनी पाळायला नेली. कारण ती नर होती. एक पिल्लू गायब झालं. शेवटी उरलेली दोन पिल्लं मात्र कॉलनीत फिरत राहायची. कॉलनीतल्या मंदिरासमोर उडणारे कागदाचे तुकडे तोंडात धरून पळण्याचा खेळ रंगात येई. पिल्लांच्या आईनं या पिल्लांकडं पूर्णत: दुर्लक्ष केलेलं होतं. दोन्ही पिल्लं स्वत:च्या हिमतीवर जगत होती. नको तिथे घुसायची. त्यामुळं फटका बसायचा. मग ‘क्याऽऽ क्याऽऽ’ केकाटण्याचा आवाज घुमायचा. बऱ्याचदा नालीतल्या पाण्यानं त्यांचं अंग बरबटलेलं असे. रस्त्यावरून जाणाऱ्या गाडय़ांमागं लागण्याचा धोकादायक खेळही त्यांनी सुरू केला होता.
हिवाळय़ाचे दिवस. दुपारी घराचं मागचं दार मी उघडलं. प्रकाश आणि थंड वाऱ्यासोबत ही दोन पिल्लं सरळ घरात घुसली. एक कुबट वास त्यांच्याबरोबर आत आला ‘हाऽऽड हाऽऽड’ म्हणेपर्यंत पार बेडरूमपर्यंत त्यांनी पल्ला गाठला. त्यांच्या मागंच पळालो. खोल्यांमधून पाठलाग सुरू झाला. पिल्लं चपळ होती. भुसकन् कुठंही घुसायची. हाती लागत नव्हती. तरी मोठय़ा कसरतीनं एकाच्या मानगुटीला धरलं आणि सरळ बाहेरचा रस्ता दाखवला. आत येऊन शोधतोय तर दुसरं गायब. पुन्हा सगळय़ा खोल्या शोधल्या. महाशय हॉलमध्ये दिवाणाखाली अंग आकसून बसले होते. बाहेर काही येईनात. शेवटी काठीनं डिवचून बाहेर काढलं. जोरजोरात ओरडत होतं. धरून बाहेर नेऊन सोडलं. चांगलंच थकवलं होतं त्यांनी. कुबट वास डोक्यात बसला होता. स्वच्छ हात-पाय धुतले. खिडकीतून त्यांच्या जागेकडे दोन पोळ्या भिरकावल्या. पंखा लावला. खुर्चीत येऊन बसलो. समोरच्या टेबलवर पॅडला लावून ठेवलेली कोरी कागदं होती. त्या पांढऱ्याशुभ्र कागदावर पिल्लांच्या छोटय़ा पावलांचे ठसे उमटलेले होते. ठसे चिखलाच्या पायांचे असले तरी होते मोठे मोहक. नंतर लक्ष गेलं तर टेबलावर, गादीवर आणि फरशीवरही छोटे पायठसे उमटलेले होते- घरभर.

No comments:
Post a Comment