Wednesday 7 October 2015

अंथरलेली वाळू

अभ्यासक्रम संपलेले होते. परीक्षा तोंडावर आलेली. पोरा-पोरींचे हसरे चेहरे गंभीर झालेले. जाडजूड पुस्तकं सांभाळत ग्रंथालयाच्या पायऱ्यावरून पोरांची लगबग सुरू होती. प्रवचनकाराने तत्त्वज्ञानाचा विषय बाजूला ठेवून एखादा हलकाफुलका किस्सा सांगावा त्याप्रमाणे शिकवणाऱ्या प्राध्यापकांनी संदर्भग्रंथ बाजूला ठेवून वर्तमानपत्र-मासिक वाचनाचा विरंगुळा शोधलेला होता. म्हणजे आम्ही मास्तरलोक सटरफटर वाचीत स्टाफ रूममध्ये बसलेलो होतो. कोर्टातला पट्टेवाला कुणाच्यातरी नावानं ‘हाजीऽऽ र होऽऽ’ असं ओरडत असतो- अगदी तसंच नव्हे, पण तशाच आविर्भावात नावं उच्चारत शिपाई आत आला. प्रत्येकानं तोंडासमोर वर्तमानपत्र धरलेलं असल्यामुळंही शिपायाला आम्ही लक्षात येत नसावेत. धांगडधिंगा टाईप गाण्यातले शब्द लवकर कळत नाहीत, तसे या ओरडण्यातले शब्दही लवकर कळालेच नाहीत. लक्षपूर्वक ऐकल्यावर कळलं, तो जी तीन-चार नावं घेत होता त्यात माझंही नाव होतं. चेहऱ्यासमोरचं मासिक खाली ठेवून मी त्याला माझ्या अस्तित्वाची जाणीव करून दिली. टेबल-खुच्र्या ओलांडत शिपाई माझ्याजवळ आला. पोरसवदा असणारा हा शिपाई म्हणजे पक्का वारकरी. गळ्यात तुळशीची माळ. दरवर्षी न चुकता पंढरपूरला जाणारा. गडबडय़ा, पण मोठय़ा सात्विक स्वभावाचा. अदबीनं त्यानं माझ्या हातात विद्यापीठाचं पत्र ठेवलं आणि दुसरी पत्रं द्यायला तो निघूनही गेला.
विद्यापीठाचं नियुक्तीपत्र आलेलं होतं. पदवी वर्गाच्या सुरू होणाऱ्या वार्षिक परीक्षेसाठी भरारी पथकात विद्यापीठाने नियुक्ती केलेली होती. म्हणजे जिल्ह्यातील परीक्षा केंद्रांना भेटी देऊन परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी तपासणी करणे, कारवाई करणे असा तो प्रकार होता. छोटय़ा छोटय़ा गावांतही राजकीय वरदहस्तामुळे राजकीय लोकांना शिक्षणसंस्था मिळाल्या. बऱ्याच शिक्षणसंस्थांना सरकारी अनुदान नाही. काही सन्माननीय अपवाद वगळता बऱ्याच शिक्षणसंस्थांचा हेतू ‘शिक्षण’ हा नाहीए. (या विनाअनुदान शिक्षणप्रणालीचा विजय तेंडुलकरांनी ‘पाहिजे जातीचे’ नाटकात चांगलाच समाचार घेतलाय). अशा कॉलेजमधून परीक्षेत मोठय़ा प्रमाणात ‘कॉप्यां’चा सुळसुळाट असतो. विशेष म्हणजे या ‘कॉप्यां’ना कॉलेजचाच पाठिंबा असतो. (कॉपीचं अनेकवचन ‘कॉप्या’ असं सर्रास वापरलं जातं.) अशा कॉपीड परीक्षा केंद्रांना सुरळीत करणे हा आव्हानात्मक व डोकेदुखीचा प्रकार असतो. त्यामुळं या पथकात फिरताना शिक्षणाच्या गढूळ झालेल्या पाण्यात आपण तुरटी फिरवत आहोत असा उगीचच भास होतो. महिनाभर गावोगाव फिरताना अनेक माणसं भेटतात. काही अनुभव येतात. त्यातलं काही मनात घर करून राहतं. काही खटकतंही.
आमचं चारजणांचं पथक होतं. योगायोगानं चौघेही जण परीक्षेतील गैरप्रकारांच्या विरोधातील होतो. कुठल्याही राजकीय पक्षाचे बांधील नव्हतो किंवा कुठल्याही राजकीय नेत्यांच्या कंपूतले नव्हतो. कारण आम्ही नोकरी करीत होतो ती शिक्षणसंस्था कुण्या राजकारण्याचं शहर कार्यालय नव्हती. म्हणूनच आमच्यावर कुणाचं बंधन नव्हतं. बाकी तिघेजण ज्येष्ठ प्राध्यापक होते. त्यांच्या तुलनेत मी अनुभवाने, वयाने नक्कीच कमी होतो. भरारी पथकाचे अध्यक्ष असणाऱ्या सरांची कार आम्ही महिनाभर वापरली. (अर्थात विद्यापीठ खर्च देणार होतंच.) घरातून बाहेर पडताना आम्ही जेवणाचा डबा सोबत घेऊन निघायचो; जेणेकरून कुठल्याही कॉलेजकडून जेवण घेण्याची गरज पडू नये. तसं जेवण घ्यायचंच नाही असं धोरण आम्ही ठरवलं होतं. आम्ही ते पाळलंही. असं आवर्जून ठरवायचं कारण म्हणजे काही कॉलेज भरारी पथकाला खाऊपिऊ घालून रुळवण्याचा प्रयत्न करतात; जेणेकरून त्यांचा कार्यभाग सुलभ व्हावा. परीक्षा सुरू झाल्या. आमची परीक्षा केंद्रांना भेट सुरूच होती. सगळीच कॉलेजं वाईट नसतात. काही काही कॉलेजमधील परीक्षेची शिस्त, गैरप्रकाराला थारा नसणे, उत्स्फूर्तपणे कॉपीला असलेला मज्जाव अशा ठिकाणी मन रमायचं. पण काही परीक्षा केंद्रांवर जाण्याआधीच मन खट्ट झालेलं असायचं. असंच एक आडवळणाच्या तालुक्याचं गाव. तेथील कॉलेजमधील ‘कॉप्यां’ची कीर्ती कानावर आलेली होतीच. आम्ही प्रथम त्या कॉलेजला भेट दिली तेव्हा कॉलेजभोवती प्रचंड गर्दी जमलेली होती. परीक्षार्थीशिवाय सोबतचे लोकच जास्त दिसत होते. एखादी जत्रा असल्याप्रमाणे कॉलेजभोवतीच्या झाडाखाली गाडय़ा लावून लोक बसलेले होते. हे सर्व लोक वर्गातील परीक्षार्थीना ‘कॉप्या’ पुरवायला आलेले असणार. म्हणजे या परीक्षा केंद्रावर प्रचंड कॉप्या सुरू असणारच असं मनाशी पक्कं करून आमचं पथक कॉलेजात दाखल झालं. मंत्री, मुख्यमंत्री आल्यावर गडबड व्हावी तसा माहोल झाला. एक शिपाई गाडीच्या पुढं पळाला. विद्यापीठाचा स्क्वॅड आल्याची बातमी क्षणात पसरली. प्राध्यापकांची लगबग जाणवली. प्राचार्य तर स्वागत करायला स्वत: बाहेर आले. त्यांनी मोठय़ा उत्साहाने स्वागत केलं. प्राचार्य चांगलेच बोलके होते. चहापाणी झालं. प्राचार्यानी त्यांच्या नेहमीच्या सुप्रसिद्ध धाब्याची तोंडभरून तारीफ केली. सगळ्या ‘गावरान’ मेनूची वर्णनं झाली. पण आम्ही बधलो नाही. ती आमची ठरवलेली भूमिकाच होती. शेवटी आम्ही परीक्षा सुरू असलेल्या वर्गात जाण्याची इच्छा व्यक्त केली. प्राचार्यानी ‘हो..हो’ म्हणत दहा-पंधरा मिनिटं गप्पा लांबवल्याच. एकदाचे आम्ही परीक्षेच्या हॉलकडे निघालो. चालताना मागे-पुढे प्राध्यापक तैनात होते. आमचे शब्द झेलायला ओंजळ धरून तयार असल्यासारखा त्यांचा आविर्भाव होता. खरं तर हे विचित्र वाटत होतं आणि अपेक्षितही नव्हतं. एवढय़ा ग्रामीण भागात कॉलेजचं केलेलं बांधकाम कौतुकास्पद होतं. विशेष म्हणजे परीक्षाही सुरळीत सुरू होती. हालचाल न करता शांतपणे परीक्षार्थी पेपर लिहीत होते. एका हॉलमध्ये एका विद्यार्थ्यांने हातावर काही मजकूर लिहून आणला होता. गार्डिग करणाऱ्या प्राध्यापकाने त्या पोराला आमच्यासमोर वर्गातून हाकलून दिलं. बाहेर संशयास्पद वातावरण असलं तरी हे परीक्षा केंद्र विनाकारण बदनाम झालंय असं वाटू लागलं. सगळ्या हॉलमधून फेरफटका मारला, पण कॉपी आढळली नाही. मात्र, एक वेगळीच गोष्ट मला खटकली. एवढय़ा चांगल्या बांधलेल्या हॉलमध्ये खाली फरशी केलेली नव्हती. वर्गामध्ये चक्क वाळू पसरलेली होती. त्या वाळूवर बेंच टाकून परीक्षार्थीना बसवलेलं होतं. वर्गातल्या भिंतींना रंग देण्याऐवजी फरशी केली असती तरी चाललं असतं. प्राचार्याचं कौतुक करून आम्ही दुसऱ्या गावासाठी निघालो. हे परीक्षा केंद्र सुधारल्याची गाडीत चर्चा सुरू होती. तरीही माझ्या मनात कॉलेजभोवतीची गर्दी आणि हॉलमधील वाळू रेंगाळतच होती. यावर आमच्यातील ज्येष्ठ सरांनी ग्रामीण भागातील कॉलेजसमोरील अडचणी मांडल्या. आर्थिक प्रश्न सांगितले. अर्थात या अडचणींत तथ्यही होतं. पण वाळू मात्र टोचतच राहिली.
रात्री घरी पोहोचलो. या परीक्षा केंद्राबद्दल वाईट बोलणाऱ्या मित्राला मुद्दाम फोन केला. सेंटरबाहेर आगंतुक लोक होते, पण सेंटर व्यवस्थित सुरू आहे, ‘कॉप्या’ सापडल्या नाहीत, असं मित्राला सांगितलं तरी त्या मित्राचा विश्वास बसेना. ‘जरा नीट लक्ष ठेवा..’ असंच मित्राचं म्हणणं होतं. या कॉलेजबद्दल मित्राचा काहीतरी पूर्वग्रहदूषित दृष्टिकोन आहे हे मी समजलो. दुर्लक्ष केलं. आमच्या पथकाची भरारी सुरूच होती. वेगवेगळे अनुभव येत होते. मुलांप्रमाणे मुलीही ‘कॉप्या’ करण्यात आघाडीवर होत्या. कॉपी सापडल्यावर त्या विद्यार्थ्यांची उत्तरपत्रिका घेऊन वर्गातून बाहेर पाठवण्याचा सपाटा सुरू होता. एका केंद्रावर तर जमलेल्या ‘कॉप्यां’चं अग्निहोत्र सुरू होतं. एका परीक्षा हॉलमध्ये आईच्या वयाची स्त्री कॉपी करताना बघवलं नाही. भांडणं, धमक्या, मारामाऱ्या, पोलीस बंदोबस्त असं सर्व काही सुरू होतं. काही ठिकाणी आपल्या परीक्षा केंद्राचा निकाल चांगला लागावा म्हणून कॉपी प्रकाराला कॉलेजच छुपा पाठिंबा देत असे. अशा ठिकाणी कॉपीबहाद्दरांना वर्गाबाहेर काढलं की त्या कॉलेजचे लोक दुखावले जात. एका संस्थाचालक राजकीय नेत्याने मोठय़ा विनयाने आम्हाला फोन केला होता. वरकरणी पाहता बंगल्यावर चहाला निमंत्रण देण्याचा बहाणा होता. ‘आमच्या घराला पाय लागू द्या..’ अशी अलंकारिक भाषा होती. शिवाय ग्रामीण भागात कॉलेज चालवताना किती अडचणी आहेत, तरी कसं कॉलेज उभं केलंय- असं सांगताना कॉलेजातील ‘कॉप्यां’कडे दुर्लक्ष करा, असंच सूचकपणे त्यांना सांगायचं होतं. आम्हीही ‘हो.. हो’ म्हणत राहिलो. पण प्रत्यक्षात बंगल्यावरचा चहाही घेतला नाही आणि त्यांच्या कॉपीबहाद्दरांना विशेष सूटही दिली नाही.
पुण्याचं काम करीत फिरत असताना वर्गात वाळू अंथरलेल्या कॉलेजात आम्ही अचानक धडकलो. हे परीक्षा केंद्र सुधारल्याची भावना तयार झालेली होती. पण गावात शिरताना चौकातल्या हॉटेलात चहा पिण्यासाठी आम्ही थांबलो. चहा पिताना मागच्या टेबलावर तीन-चार मुलांची हसीमजाक सुरू होती. परीक्षेशी संबंधित गप्पा सुरू होत्या. बोलताना एकाने वर्गातील वाळूचा उल्लेख केल्याचं मी पुसटसं ऐकलं. त्यांचं मात्र आमच्याकडं लक्ष नव्हतं. आम्ही कॉलेजात थेट पोहोचलो. हसमुख प्राचार्यानी स्वागत केलं. पण त्यांच्या चेहऱ्यावर अचानक भेट दिल्यामुळं आश्चर्य होतं. चहापाणी, गप्पा झाल्या. युरिनल कुठं आहे, असं विचारलं तर शिपाई सोबतच आला. मी आत जाऊन बाहेर आलो. शेजारच्या वर्गात परीक्षा सुरू होती. आत काहीतरी हालचाल जाणवली म्हणून खिडकीजवळ गेलो. समोरचं दृश्य बघून हादरलोच. एक विद्यार्थी चक्क वाळू उकरत होता. ही हाताने वाळू उकरण्याची पद्धत एखाद्या कुत्र्याने उकंडय़ात पुरून ठेवलेली भाकरी काढण्यासाठी पायाने माती उकरावी तशी होती. या प्रकाराचं आश्चर्य वाटलं. पाहतो तर काय, उकरलेल्या वाळूतून त्या पठ्ठय़ाने चक्क गाईड बाहेर काढलं. कदाचित माझी चाहूल लागल्यामुळे वर्ग चिडीचूप झाला आणि गाईड पुन्हा वाळूत झाकून वरती वाळू पूर्ववत करण्यात आली. डोळ्याला खटकणारी ही वर्गातली वाळू करामती होती.
आता प्राचार्याच्या हसत स्वागत करण्याचे, मागेपुढे प्राध्यापक सोबत चालण्याचे तयार केलेल्या बनावाचे अर्थ लागले. आमचं पथक आलं की प्रत्येक वर्गात निरोप जायचा. सगळ्या ‘कॉप्या’ वाळूत झाकून ठेवल्या जायच्या. पथकासमोर सर्वजण शांतपणे हालचाल न करता काहीतरी लिहिल्यासारखं करायचे. पथक गेलं की पुन्हा वाळू उकरून ‘कॉप्या’ बाहेर काढल्या जायच्या. बाहेर जमलेले हितचिंतक खिडकीतून कॉप्या टाकायचे. एकूण या प्रकरणाला कॉलेजचा पाठिंबा आहे हे लक्षात आलं. त्यामुळं हसमुख प्राचार्य एकदम सटपटले. आमच्यामुळं विद्यार्थ्यांना त्रास होतोय, आम्ही जाणीवपूर्वक त्रास देतोय, असे आमच्यावर आरोप सुरू झाले. आम्ही शांतपणे त्यांच्याशी बोलत होतो. तर त्यांनी ‘आमची मुलं-मुली शिकतायत, हे तुम्हाला बघवत नाही,’ असा थेट आरोप केला. आता ‘आमची मुलं-मुली’ म्हणजे नेमकं काय? ती मुलं आमची नाहीत काय? ‘कॉप्या’ करून पुढं खुल्या स्पर्धेत ही मुलं टिकली असती का? टिकणार आहेत का? अशा वाळू उकरण्यानं पाणी लागणार होतं का? या प्रश्नांची उत्तरं वर्गातल्या वाळूतून काढायला लावलेल्या ‘कॉप्यां’त नव्हती. अशी वाळू पायाखाली अंथरली तर प्रवास कुठल्या दिशेला जाईल? नदीत खोपा करतानाची वाळू माहीत होती. समुद्राकाठची उन्हात चमकणारी वाळू पायाखाली हुळहुळली होती. नदीपात्रातील माफियानं किडनॅप केलेली वाळू आपण जाणतो. सिमेंटसोबत एकरूप होऊन बांधकामातील लोखंड लपवणारी वाळू मोठी उपयोगी आहे. पण ‘कॉप्यां’चं दुष्कृत्य लपवण्यासाठी अंथरलेली करामती वाळू प्रथमच पाहत होतो.

लांब नाकवाल्याची गोष्ट

खिडकी उघडली. बाहेर टपून बसलेला थंडगार वारा अधाशासारखा आत घुसला. रात्रभरच्या प्रवासानं आंबलेलं अंग ताजंतवानं झालं. चढउताराचा वळणदार रस्ता होता. ड्रायव्हरमामांनी टेप बंद केला. मंद दिवा तेवत राहावा तशी त्यांच्याच आवडीची हिंदी गाणी रात्रभर सुरू होती. मी आपला ड्रायव्हरशेजारच्या सीटवर टक्क जागा.. तर कधी पेंगत बसलेलो होतो. गाव जवळ येताना विशिष्ट खाणाखुणा दिसायला सुरुवात होते. तसं पहाट होताना वातावरणात ओळखीचे बदल जाणवायला लागतात. थंड हवेत पहाटेचा एक वास पसरतो. फार कमी वेळा ही पहाटेची थंड हवा आपण अंगावर घेतो. बहुतांश वेळी या रामप्रहरी आपण साखरझोपेत असतो. म्हणूनही या वेळेचं अप्रुपवाटतं. पाखरं मात्र या थंड हवेच्या अलार्मला दाद देऊन किलबिलायला लागतात. हा पक्ष्यांचा आवाज सुरू असताना अंधार वितळायला सुरुवात झालेली असते.  एखाद्या खोडकर पोरानं लाल शाईची दौत सांडून द्यावी तसा लाल रंग आकाशात पसरू लागलाय.. म्हणजे तांबडं फुटलंय. रंगमंचावर हळूहळू प्रकाश उजळताना पात्रं, वस्तू स्पष्ट व्हाव्यात तसा भोवताल उजळू लागलेला होता. एका उतारातून वर चढाला लागल्यावर समोर पिवळसर प्रकाश चमकला. चढ चढून सपाट रस्त्यावर आल्यावर समोर नवथर लालबुंद गोळा चमकत होता. आईच्या उदरातून नुकतंच जन्माला आलेलं बाळ जणू बंद मुठींचे हात हलवतंय. उगवलेल्या सूर्याचं हे मोहक रूप मी मनात साठवत  होतो. ड्रायव्हरमामांनी तर चक्क कृतीच केली. म्हणजे स्टेअिरगवरचे हात क्षणभर जोडून सूर्याला नमस्कार केला. त्यांनी मलाही रामराम घातला. मीही रामराम करून प्रतिसाद दिला. चांगलं उजाडलं होतं. रांगत घरभर हुंदडणाऱ्या लेकरासारखा प्रकाश आता धीट झालेला होता. अजून आमचा ठेपा यायला तीनेक तास बाकी होते. काहीच करता येत नसेल तेव्हा किमान आपण विचार करू शकतो. अंगावर पडलेलं कोवळं ऊन खात बसल्या जागी मी सूर्याचा मोहक लालबुंद गोळा आठवत होतो.
उगवत्या सूर्याला नमस्कार करतात तसंच संध्याकाळी अंधारून येताना दिवा लावला जातो तेव्हाही मनोभावे नमस्कार करण्याची प्रथा आहे. आता तेलाचे दिवे, कंदील राहिले नाहीत. तरीही संध्याकाळी विजेचा दिवा लावला जातो तेव्हा काही ठिकाणी आजही नमस्कार केला जातो. थोडक्यात काय, तर प्रकाशाला नमन करण्याची ही प्रथा आहे. सूर्याला नमस्कार करण्याची ही प्रथा कधीपासून सुरू झाली असेल, का सुरू झाली असेल, अशा प्रश्नांशी शब्दकोडी सोडवल्यासारखा खेळत बसलो. (अगदी आदिबंध वगैरे शोधण्याचा प्रयत्न नव्हता.) चालत्या गाडीत धुंडाळायला कुठलेही संदर्भ नव्हते. मग मीच संदर्भ जुळवायला लागलो.
एका दृश्याची कल्पना डोक्यात आली. म्हणजे असं काहीसं घडलं असावं. गुहेच्या तोंडाशी थोडा प्रकाश शिल्लक असताना संध्याकाळी दोन आदिमानव गुहेत बसलेले. पुरेशी भाषाच नाही; मग बाकी काय असणार? शिकारीच्या मागे पळायचं.. अणकुचीदार दगडांनी प्राणी मारायचा.. ही शिकार मग गुहेत आणून सर्वानी मिळून खायची. अग्नी अजून उपयोगात आलेला नव्हता. म्हणून कच्चं मांस खाऊनच पोट भरायचं. ऊन-पावसापासून संरक्षण म्हणून गुहेत बसून राहायचं. काही ध्वनी, खाणाखुणांच्या आधारे जुजबी संवादही होत असेल त्यांच्यात. बाकी बसून राहण्याशिवाय पर्याय नव्हता. त्या दिवशीही संध्याकाळच्या वेळी दोघे एकमेकांसमोर दगडावर बसलेले होते. पाहता पाहता ते दोघे एकमेकांसाठी गायब झाले. पहिल्याला दुसरा दिसेना. दुसऱ्याला पहिला दिसेना. नेमकं काय झालं, त्यांना कळेना. झालं काहीच नव्हतं. रात्र झाल्यामुळं अंधार पडला होता. त्यामुळं दोघे समोरासमोर असूनही एकमेकांना दिसत नव्हते. रात्रभर ते बसून राहिले. तिथेच झोपलेही असतील. पाखरं किलबिलायला लागली. गुहेच्या तोंडाशी कोवळा प्रकाश आला. सोबतीला सूर्याचा लालबुंद गोळाही दिसू लागला. या गोळ्याच्या साक्षीनं अचानक गायब झालेले ते दोघे एकमेकांना सापडले. अशा अचानक गायब झालेल्या अनेक गोष्टी या जादूई लाल गोळ्यामुळं सापडू लागल्या. दोन आदिमानवांनी आपल्या सापडण्याचा संबंध प्रकाशमान गोळ्याशी लावला. शिकार करणारे त्यांचे कर्तृत्ववान हात नकळत जोडले गेले. अशाच एखाद्या घटनेपासून सूर्याला नमस्कार करण्याची प्रथा सुरू झाली असावी.
गुहेत शिरलोच आहोत तर गुहेतली एक गोष्ट सांगण्याचा मोह होतोय. अश्मयुग. अजून अग्नी वापरात आलेला नाही असा काळ. वातावरण वेगळं काय असणार? प्राण्यांची अणकुचीदार दगडांनी शिकार करायची. कच्चं मांस खाऊन दिवस ढकलायचा. नदीचं वाहतं पाणी होतं. राहण्यासाठी गुहा होतीच. आदिमानवांचा एक समूह गुण्यागोविंदानं राहत होता. शिकार करताना सगळे मिळून प्राण्याला सापळ्यात पकडायचे. सगळे मिळून कच्चं मांस खायचे. हे सगळं सुरू असताना एक लांब नाकाचा आदिमानव पुढाकार घ्यायचा. सगळ्यांना मदत करायचा. हा लांब नाकवाला सतत काहीतरी नवीन करीत असे. एकदा झाडाची सालं पांघरून झोपला. एकदा तर झाडाची साल अंगाला गुंडाळून फिरला. भाषेत सांगणं शक्य नव्हतं; पण बाकीच्यांना हे खटकलं होतं. या लांब नाकवाल्याचे नवनवीन प्रयोग सुरूच असायचे. शिकार करताना खवळलेल्या प्राण्याने एकाला शिंग मारलं. मोठी जखम झाली. भळाभळा रक्त वाहायला लागलं. शेवटी या जखमीला लांब नाकवाल्याकडे नेण्यात आलं. लांब नाकवाल्यानं एका झाडाचा पाला दगडानं ठेचून चोथा केला. तो पानांचा चोथा जखमेत भरला. काही दिवसांत जखम बरी झाली. अशा नव्या गोष्टी करून पाहणं हाच लांब नाकवाल्याचा छंद झाला. तो एकटाच भटकत असायचा.
एकदा जंगलात वणवा लागला. प्रचंड ज्वाळांनी जंगल वेढलं गेलं. एका टेकडीवर बसून लांब नाकवाला हा विध्वंस पाहत होता. आता जंगल जळून खाक होणार, अशा वेळेला प्रचंड मोठा पाऊस सुरू झाला. वणवा विझू लागला. दुसऱ्या दिवशी जळलेल्या जंगलातून लांब नाकवाला फिरत होता. फिरताना त्याला एक हरणासारखा जळलेला प्राणी सापडला. भाजून काळपट झालेला प्राणी लांब नाकवाल्यानं चाखून पाहिला. खरपूस भाजलेलं मांस प्रथमच तो चाखत होता. ते भाजलं गेलेलं मांस त्याला खूप आवडलं. त्याने तो जळलेला प्राणी पाठीवर टाकून गुहेत आणला. ही विचित्र शिकार बघून बाकी आदिमानव जमा झाले. कुतूहलाने शिकारीकडे पाहू लागले. कारण शिकार म्हणजे रक्तबंबाळ झालेला प्राणी असंच त्यांना माहीत होतं. हा तर जळून काळाठिक्कर झालेला प्राणी होता. रक्ताने माखलेली शिकार नाही म्हणजे काहीतरी अघटित घडलेलं होतं. कुजबुजणं शक्य नव्हतं. पण जमलेल्या आदिमानवांनी एकमेकांकडे आश्चर्यानं पाहिलं. त्या नजरेत नापसंतीही होतीच. धर्म-पंथ नव्हते. त्यामुळे धर्माच्या विरुद्ध काही घडलेलं नव्हतं. कुणाच्या भावना दुखावल्या नव्हत्या. तरीही शिकारीची तयार झालेली वहिवाट लांब नाकवाल्यानं मोडलेली होती. मिळालेली शिकार सगळ्यांनी मिळून फस्त करायची असा रिवाज होता. त्यामुळं लांब नाकवाल्यानं वणव्यात भाजला गेलेला प्राणी सगळ्यांसमोर ठेवला. पण कुणी त्याला स्पर्शही केला नाही. उलट, सगळेजण पाय आपटत गुहेबाहेर निघून गेले. जाताना विचित्र आवाज काढत होते. लांब नाकवाल्यानं खरपूस भाजलेलं मांस एकटय़ानं फस्त केलं.
या गोष्टीतील शेवट अचानक अनपेक्षित वळण घेतो. तिथं आपण थबकतो.
‘अश्मयुगात
आदिमानवाला एक
अणकुचीदार दगड सापडला-
आणि
दुसऱ्या दिवशी एका गुहेत
जखमांनी सजलेल्या
रक्तबंबाळ माणसाचं एक प्रेत..
या दोन घटनांचा
एकमेकांशी संबंध नाकारण्याची प्रथा
बुरशीसारखी वाढत गेली,
परिणामी गुहेतला आदिम अंधार
फणा आपटत गावात शिरलाय,
लोक शोधतायत
अडगळीत ठेवलेल्या काठय़ा-कुऱ्हाडी
आणि इकडे
कंदिलावरची काजळी वाढत चाललीय.’
त्या दिवशी भाजलेलं मांस खायला नकार देऊन सगळे आदिमानव पाय आपटत निघून गेले. लांब नाकवाला भाजलेलं मांस खाऊन झोपी गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी गुहेच्या दारातून कोवळा प्रकाश आत आला. त्या प्रकाशात लांब नाकवाला मरून पडलेला स्पष्ट दिसत होता. अणकुचीदार दगडाने लांब नाकवाल्याचं डोकं ठेचलेलं होतं. रक्तानं माखलेल्या चेहऱ्यावरचं टोकदार लांब नाक उघडय़ा डोळ्यांसोबत भेसूर दिसत होतं. बाकी गुहेत कुणीच नव्हतं. गुहेच्या तोंडाशी रक्ताने माखलेला एक अणकुचीदार दगड पडलेला होता. लांब नाकवाल्याला नेमकं कुणी मारलं, याचं उत्तर मिळालंच नाही. पण गुहेच्या तोंडाशी सापडलेला, रक्ताने माखलेला दगड आदिमानवांनी जमिनीत रोवला. पुढं चालून शिकार करून आणलेल्या प्राण्याचं थोडंसं रक्त त्या रोवलेल्या दगडाला वाहण्याचा रिवाज सुरू झाला.
वर्तमानकाळातल्या ड्रायव्हरने उगवत्या सूर्याला केलेल्या नमस्काराचं मूळ शोधण्यासाठी आपण भूतकालीन गुहेत गेलो. रात्रीच्या अंधारात एकमेकांसाठी अदृश्य झालेल्या आदिमानवांची घटना रचली. आता लांब नाकवाल्याच्या भूतकालीन घटनेतून वर्तमानकालीन घटनेकडे उलट यायचं ठरवलं तर..? खरं तर असा उलटा विचार करणं बरोबर नाही. अश्मयुगातल्या गुहेत घडलेल्या घटनेची तुलना वर्तमानकाळातील घटनेशी करणं योग्य नाही. लांब नाकवाल्याचा विचार पटला नाही म्हणून त्याला आदिमानवांनी मारून टाकलं असं समजूया. कारण तेव्हा चर्चा करायला भाषा नव्हती. लांब नाकवाल्याचा खुनी सापडला नाही, कारण तेव्हा प्रशासन नव्हतं. तपास यंत्रणाही नव्हती. आता आपल्याजवळ सर्व काही आहे. सक्रिय सरकार आहे. गतिशील प्रशासन आहे. समर्थ तपास यंत्रणाही आहे. त्यामुळं सगळं काही छान चाललंय. आता समाज म्हटल्यावर चार-दोन घटना घडणारच..

ता. क. : वरील मजकूर वाचून कुणाच्या खोडकर डोक्यात दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी अशी नावं येत असतील तर तो त्या लोकांचा दोष आहे. सदरील लेखकाचा प्रामाणिक हेतू अश्मयुगातील गोष्ट सांगणे, एवढा आणि एवढाच आहे.