Wednesday, 7 October 2015

अंथरलेली वाळू

अभ्यासक्रम संपलेले होते. परीक्षा तोंडावर आलेली. पोरा-पोरींचे हसरे चेहरे गंभीर झालेले. जाडजूड पुस्तकं सांभाळत ग्रंथालयाच्या पायऱ्यावरून पोरांची लगबग सुरू होती. प्रवचनकाराने तत्त्वज्ञानाचा विषय बाजूला ठेवून एखादा हलकाफुलका किस्सा सांगावा त्याप्रमाणे शिकवणाऱ्या प्राध्यापकांनी संदर्भग्रंथ बाजूला ठेवून वर्तमानपत्र-मासिक वाचनाचा विरंगुळा शोधलेला होता. म्हणजे आम्ही मास्तरलोक सटरफटर वाचीत स्टाफ रूममध्ये बसलेलो होतो. कोर्टातला पट्टेवाला कुणाच्यातरी नावानं ‘हाजीऽऽ र होऽऽ’ असं ओरडत असतो- अगदी तसंच नव्हे, पण तशाच आविर्भावात नावं उच्चारत शिपाई आत आला. प्रत्येकानं तोंडासमोर वर्तमानपत्र धरलेलं असल्यामुळंही शिपायाला आम्ही लक्षात येत नसावेत. धांगडधिंगा टाईप गाण्यातले शब्द लवकर कळत नाहीत, तसे या ओरडण्यातले शब्दही लवकर कळालेच नाहीत. लक्षपूर्वक ऐकल्यावर कळलं, तो जी तीन-चार नावं घेत होता त्यात माझंही नाव होतं. चेहऱ्यासमोरचं मासिक खाली ठेवून मी त्याला माझ्या अस्तित्वाची जाणीव करून दिली. टेबल-खुच्र्या ओलांडत शिपाई माझ्याजवळ आला. पोरसवदा असणारा हा शिपाई म्हणजे पक्का वारकरी. गळ्यात तुळशीची माळ. दरवर्षी न चुकता पंढरपूरला जाणारा. गडबडय़ा, पण मोठय़ा सात्विक स्वभावाचा. अदबीनं त्यानं माझ्या हातात विद्यापीठाचं पत्र ठेवलं आणि दुसरी पत्रं द्यायला तो निघूनही गेला.
विद्यापीठाचं नियुक्तीपत्र आलेलं होतं. पदवी वर्गाच्या सुरू होणाऱ्या वार्षिक परीक्षेसाठी भरारी पथकात विद्यापीठाने नियुक्ती केलेली होती. म्हणजे जिल्ह्यातील परीक्षा केंद्रांना भेटी देऊन परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी तपासणी करणे, कारवाई करणे असा तो प्रकार होता. छोटय़ा छोटय़ा गावांतही राजकीय वरदहस्तामुळे राजकीय लोकांना शिक्षणसंस्था मिळाल्या. बऱ्याच शिक्षणसंस्थांना सरकारी अनुदान नाही. काही सन्माननीय अपवाद वगळता बऱ्याच शिक्षणसंस्थांचा हेतू ‘शिक्षण’ हा नाहीए. (या विनाअनुदान शिक्षणप्रणालीचा विजय तेंडुलकरांनी ‘पाहिजे जातीचे’ नाटकात चांगलाच समाचार घेतलाय). अशा कॉलेजमधून परीक्षेत मोठय़ा प्रमाणात ‘कॉप्यां’चा सुळसुळाट असतो. विशेष म्हणजे या ‘कॉप्यां’ना कॉलेजचाच पाठिंबा असतो. (कॉपीचं अनेकवचन ‘कॉप्या’ असं सर्रास वापरलं जातं.) अशा कॉपीड परीक्षा केंद्रांना सुरळीत करणे हा आव्हानात्मक व डोकेदुखीचा प्रकार असतो. त्यामुळं या पथकात फिरताना शिक्षणाच्या गढूळ झालेल्या पाण्यात आपण तुरटी फिरवत आहोत असा उगीचच भास होतो. महिनाभर गावोगाव फिरताना अनेक माणसं भेटतात. काही अनुभव येतात. त्यातलं काही मनात घर करून राहतं. काही खटकतंही.
आमचं चारजणांचं पथक होतं. योगायोगानं चौघेही जण परीक्षेतील गैरप्रकारांच्या विरोधातील होतो. कुठल्याही राजकीय पक्षाचे बांधील नव्हतो किंवा कुठल्याही राजकीय नेत्यांच्या कंपूतले नव्हतो. कारण आम्ही नोकरी करीत होतो ती शिक्षणसंस्था कुण्या राजकारण्याचं शहर कार्यालय नव्हती. म्हणूनच आमच्यावर कुणाचं बंधन नव्हतं. बाकी तिघेजण ज्येष्ठ प्राध्यापक होते. त्यांच्या तुलनेत मी अनुभवाने, वयाने नक्कीच कमी होतो. भरारी पथकाचे अध्यक्ष असणाऱ्या सरांची कार आम्ही महिनाभर वापरली. (अर्थात विद्यापीठ खर्च देणार होतंच.) घरातून बाहेर पडताना आम्ही जेवणाचा डबा सोबत घेऊन निघायचो; जेणेकरून कुठल्याही कॉलेजकडून जेवण घेण्याची गरज पडू नये. तसं जेवण घ्यायचंच नाही असं धोरण आम्ही ठरवलं होतं. आम्ही ते पाळलंही. असं आवर्जून ठरवायचं कारण म्हणजे काही कॉलेज भरारी पथकाला खाऊपिऊ घालून रुळवण्याचा प्रयत्न करतात; जेणेकरून त्यांचा कार्यभाग सुलभ व्हावा. परीक्षा सुरू झाल्या. आमची परीक्षा केंद्रांना भेट सुरूच होती. सगळीच कॉलेजं वाईट नसतात. काही काही कॉलेजमधील परीक्षेची शिस्त, गैरप्रकाराला थारा नसणे, उत्स्फूर्तपणे कॉपीला असलेला मज्जाव अशा ठिकाणी मन रमायचं. पण काही परीक्षा केंद्रांवर जाण्याआधीच मन खट्ट झालेलं असायचं. असंच एक आडवळणाच्या तालुक्याचं गाव. तेथील कॉलेजमधील ‘कॉप्यां’ची कीर्ती कानावर आलेली होतीच. आम्ही प्रथम त्या कॉलेजला भेट दिली तेव्हा कॉलेजभोवती प्रचंड गर्दी जमलेली होती. परीक्षार्थीशिवाय सोबतचे लोकच जास्त दिसत होते. एखादी जत्रा असल्याप्रमाणे कॉलेजभोवतीच्या झाडाखाली गाडय़ा लावून लोक बसलेले होते. हे सर्व लोक वर्गातील परीक्षार्थीना ‘कॉप्या’ पुरवायला आलेले असणार. म्हणजे या परीक्षा केंद्रावर प्रचंड कॉप्या सुरू असणारच असं मनाशी पक्कं करून आमचं पथक कॉलेजात दाखल झालं. मंत्री, मुख्यमंत्री आल्यावर गडबड व्हावी तसा माहोल झाला. एक शिपाई गाडीच्या पुढं पळाला. विद्यापीठाचा स्क्वॅड आल्याची बातमी क्षणात पसरली. प्राध्यापकांची लगबग जाणवली. प्राचार्य तर स्वागत करायला स्वत: बाहेर आले. त्यांनी मोठय़ा उत्साहाने स्वागत केलं. प्राचार्य चांगलेच बोलके होते. चहापाणी झालं. प्राचार्यानी त्यांच्या नेहमीच्या सुप्रसिद्ध धाब्याची तोंडभरून तारीफ केली. सगळ्या ‘गावरान’ मेनूची वर्णनं झाली. पण आम्ही बधलो नाही. ती आमची ठरवलेली भूमिकाच होती. शेवटी आम्ही परीक्षा सुरू असलेल्या वर्गात जाण्याची इच्छा व्यक्त केली. प्राचार्यानी ‘हो..हो’ म्हणत दहा-पंधरा मिनिटं गप्पा लांबवल्याच. एकदाचे आम्ही परीक्षेच्या हॉलकडे निघालो. चालताना मागे-पुढे प्राध्यापक तैनात होते. आमचे शब्द झेलायला ओंजळ धरून तयार असल्यासारखा त्यांचा आविर्भाव होता. खरं तर हे विचित्र वाटत होतं आणि अपेक्षितही नव्हतं. एवढय़ा ग्रामीण भागात कॉलेजचं केलेलं बांधकाम कौतुकास्पद होतं. विशेष म्हणजे परीक्षाही सुरळीत सुरू होती. हालचाल न करता शांतपणे परीक्षार्थी पेपर लिहीत होते. एका हॉलमध्ये एका विद्यार्थ्यांने हातावर काही मजकूर लिहून आणला होता. गार्डिग करणाऱ्या प्राध्यापकाने त्या पोराला आमच्यासमोर वर्गातून हाकलून दिलं. बाहेर संशयास्पद वातावरण असलं तरी हे परीक्षा केंद्र विनाकारण बदनाम झालंय असं वाटू लागलं. सगळ्या हॉलमधून फेरफटका मारला, पण कॉपी आढळली नाही. मात्र, एक वेगळीच गोष्ट मला खटकली. एवढय़ा चांगल्या बांधलेल्या हॉलमध्ये खाली फरशी केलेली नव्हती. वर्गामध्ये चक्क वाळू पसरलेली होती. त्या वाळूवर बेंच टाकून परीक्षार्थीना बसवलेलं होतं. वर्गातल्या भिंतींना रंग देण्याऐवजी फरशी केली असती तरी चाललं असतं. प्राचार्याचं कौतुक करून आम्ही दुसऱ्या गावासाठी निघालो. हे परीक्षा केंद्र सुधारल्याची गाडीत चर्चा सुरू होती. तरीही माझ्या मनात कॉलेजभोवतीची गर्दी आणि हॉलमधील वाळू रेंगाळतच होती. यावर आमच्यातील ज्येष्ठ सरांनी ग्रामीण भागातील कॉलेजसमोरील अडचणी मांडल्या. आर्थिक प्रश्न सांगितले. अर्थात या अडचणींत तथ्यही होतं. पण वाळू मात्र टोचतच राहिली.
रात्री घरी पोहोचलो. या परीक्षा केंद्राबद्दल वाईट बोलणाऱ्या मित्राला मुद्दाम फोन केला. सेंटरबाहेर आगंतुक लोक होते, पण सेंटर व्यवस्थित सुरू आहे, ‘कॉप्या’ सापडल्या नाहीत, असं मित्राला सांगितलं तरी त्या मित्राचा विश्वास बसेना. ‘जरा नीट लक्ष ठेवा..’ असंच मित्राचं म्हणणं होतं. या कॉलेजबद्दल मित्राचा काहीतरी पूर्वग्रहदूषित दृष्टिकोन आहे हे मी समजलो. दुर्लक्ष केलं. आमच्या पथकाची भरारी सुरूच होती. वेगवेगळे अनुभव येत होते. मुलांप्रमाणे मुलीही ‘कॉप्या’ करण्यात आघाडीवर होत्या. कॉपी सापडल्यावर त्या विद्यार्थ्यांची उत्तरपत्रिका घेऊन वर्गातून बाहेर पाठवण्याचा सपाटा सुरू होता. एका केंद्रावर तर जमलेल्या ‘कॉप्यां’चं अग्निहोत्र सुरू होतं. एका परीक्षा हॉलमध्ये आईच्या वयाची स्त्री कॉपी करताना बघवलं नाही. भांडणं, धमक्या, मारामाऱ्या, पोलीस बंदोबस्त असं सर्व काही सुरू होतं. काही ठिकाणी आपल्या परीक्षा केंद्राचा निकाल चांगला लागावा म्हणून कॉपी प्रकाराला कॉलेजच छुपा पाठिंबा देत असे. अशा ठिकाणी कॉपीबहाद्दरांना वर्गाबाहेर काढलं की त्या कॉलेजचे लोक दुखावले जात. एका संस्थाचालक राजकीय नेत्याने मोठय़ा विनयाने आम्हाला फोन केला होता. वरकरणी पाहता बंगल्यावर चहाला निमंत्रण देण्याचा बहाणा होता. ‘आमच्या घराला पाय लागू द्या..’ अशी अलंकारिक भाषा होती. शिवाय ग्रामीण भागात कॉलेज चालवताना किती अडचणी आहेत, तरी कसं कॉलेज उभं केलंय- असं सांगताना कॉलेजातील ‘कॉप्यां’कडे दुर्लक्ष करा, असंच सूचकपणे त्यांना सांगायचं होतं. आम्हीही ‘हो.. हो’ म्हणत राहिलो. पण प्रत्यक्षात बंगल्यावरचा चहाही घेतला नाही आणि त्यांच्या कॉपीबहाद्दरांना विशेष सूटही दिली नाही.
पुण्याचं काम करीत फिरत असताना वर्गात वाळू अंथरलेल्या कॉलेजात आम्ही अचानक धडकलो. हे परीक्षा केंद्र सुधारल्याची भावना तयार झालेली होती. पण गावात शिरताना चौकातल्या हॉटेलात चहा पिण्यासाठी आम्ही थांबलो. चहा पिताना मागच्या टेबलावर तीन-चार मुलांची हसीमजाक सुरू होती. परीक्षेशी संबंधित गप्पा सुरू होत्या. बोलताना एकाने वर्गातील वाळूचा उल्लेख केल्याचं मी पुसटसं ऐकलं. त्यांचं मात्र आमच्याकडं लक्ष नव्हतं. आम्ही कॉलेजात थेट पोहोचलो. हसमुख प्राचार्यानी स्वागत केलं. पण त्यांच्या चेहऱ्यावर अचानक भेट दिल्यामुळं आश्चर्य होतं. चहापाणी, गप्पा झाल्या. युरिनल कुठं आहे, असं विचारलं तर शिपाई सोबतच आला. मी आत जाऊन बाहेर आलो. शेजारच्या वर्गात परीक्षा सुरू होती. आत काहीतरी हालचाल जाणवली म्हणून खिडकीजवळ गेलो. समोरचं दृश्य बघून हादरलोच. एक विद्यार्थी चक्क वाळू उकरत होता. ही हाताने वाळू उकरण्याची पद्धत एखाद्या कुत्र्याने उकंडय़ात पुरून ठेवलेली भाकरी काढण्यासाठी पायाने माती उकरावी तशी होती. या प्रकाराचं आश्चर्य वाटलं. पाहतो तर काय, उकरलेल्या वाळूतून त्या पठ्ठय़ाने चक्क गाईड बाहेर काढलं. कदाचित माझी चाहूल लागल्यामुळे वर्ग चिडीचूप झाला आणि गाईड पुन्हा वाळूत झाकून वरती वाळू पूर्ववत करण्यात आली. डोळ्याला खटकणारी ही वर्गातली वाळू करामती होती.
आता प्राचार्याच्या हसत स्वागत करण्याचे, मागेपुढे प्राध्यापक सोबत चालण्याचे तयार केलेल्या बनावाचे अर्थ लागले. आमचं पथक आलं की प्रत्येक वर्गात निरोप जायचा. सगळ्या ‘कॉप्या’ वाळूत झाकून ठेवल्या जायच्या. पथकासमोर सर्वजण शांतपणे हालचाल न करता काहीतरी लिहिल्यासारखं करायचे. पथक गेलं की पुन्हा वाळू उकरून ‘कॉप्या’ बाहेर काढल्या जायच्या. बाहेर जमलेले हितचिंतक खिडकीतून कॉप्या टाकायचे. एकूण या प्रकरणाला कॉलेजचा पाठिंबा आहे हे लक्षात आलं. त्यामुळं हसमुख प्राचार्य एकदम सटपटले. आमच्यामुळं विद्यार्थ्यांना त्रास होतोय, आम्ही जाणीवपूर्वक त्रास देतोय, असे आमच्यावर आरोप सुरू झाले. आम्ही शांतपणे त्यांच्याशी बोलत होतो. तर त्यांनी ‘आमची मुलं-मुली शिकतायत, हे तुम्हाला बघवत नाही,’ असा थेट आरोप केला. आता ‘आमची मुलं-मुली’ म्हणजे नेमकं काय? ती मुलं आमची नाहीत काय? ‘कॉप्या’ करून पुढं खुल्या स्पर्धेत ही मुलं टिकली असती का? टिकणार आहेत का? अशा वाळू उकरण्यानं पाणी लागणार होतं का? या प्रश्नांची उत्तरं वर्गातल्या वाळूतून काढायला लावलेल्या ‘कॉप्यां’त नव्हती. अशी वाळू पायाखाली अंथरली तर प्रवास कुठल्या दिशेला जाईल? नदीत खोपा करतानाची वाळू माहीत होती. समुद्राकाठची उन्हात चमकणारी वाळू पायाखाली हुळहुळली होती. नदीपात्रातील माफियानं किडनॅप केलेली वाळू आपण जाणतो. सिमेंटसोबत एकरूप होऊन बांधकामातील लोखंड लपवणारी वाळू मोठी उपयोगी आहे. पण ‘कॉप्यां’चं दुष्कृत्य लपवण्यासाठी अंथरलेली करामती वाळू प्रथमच पाहत होतो.

लांब नाकवाल्याची गोष्ट

खिडकी उघडली. बाहेर टपून बसलेला थंडगार वारा अधाशासारखा आत घुसला. रात्रभरच्या प्रवासानं आंबलेलं अंग ताजंतवानं झालं. चढउताराचा वळणदार रस्ता होता. ड्रायव्हरमामांनी टेप बंद केला. मंद दिवा तेवत राहावा तशी त्यांच्याच आवडीची हिंदी गाणी रात्रभर सुरू होती. मी आपला ड्रायव्हरशेजारच्या सीटवर टक्क जागा.. तर कधी पेंगत बसलेलो होतो. गाव जवळ येताना विशिष्ट खाणाखुणा दिसायला सुरुवात होते. तसं पहाट होताना वातावरणात ओळखीचे बदल जाणवायला लागतात. थंड हवेत पहाटेचा एक वास पसरतो. फार कमी वेळा ही पहाटेची थंड हवा आपण अंगावर घेतो. बहुतांश वेळी या रामप्रहरी आपण साखरझोपेत असतो. म्हणूनही या वेळेचं अप्रुपवाटतं. पाखरं मात्र या थंड हवेच्या अलार्मला दाद देऊन किलबिलायला लागतात. हा पक्ष्यांचा आवाज सुरू असताना अंधार वितळायला सुरुवात झालेली असते.  एखाद्या खोडकर पोरानं लाल शाईची दौत सांडून द्यावी तसा लाल रंग आकाशात पसरू लागलाय.. म्हणजे तांबडं फुटलंय. रंगमंचावर हळूहळू प्रकाश उजळताना पात्रं, वस्तू स्पष्ट व्हाव्यात तसा भोवताल उजळू लागलेला होता. एका उतारातून वर चढाला लागल्यावर समोर पिवळसर प्रकाश चमकला. चढ चढून सपाट रस्त्यावर आल्यावर समोर नवथर लालबुंद गोळा चमकत होता. आईच्या उदरातून नुकतंच जन्माला आलेलं बाळ जणू बंद मुठींचे हात हलवतंय. उगवलेल्या सूर्याचं हे मोहक रूप मी मनात साठवत  होतो. ड्रायव्हरमामांनी तर चक्क कृतीच केली. म्हणजे स्टेअिरगवरचे हात क्षणभर जोडून सूर्याला नमस्कार केला. त्यांनी मलाही रामराम घातला. मीही रामराम करून प्रतिसाद दिला. चांगलं उजाडलं होतं. रांगत घरभर हुंदडणाऱ्या लेकरासारखा प्रकाश आता धीट झालेला होता. अजून आमचा ठेपा यायला तीनेक तास बाकी होते. काहीच करता येत नसेल तेव्हा किमान आपण विचार करू शकतो. अंगावर पडलेलं कोवळं ऊन खात बसल्या जागी मी सूर्याचा मोहक लालबुंद गोळा आठवत होतो.
उगवत्या सूर्याला नमस्कार करतात तसंच संध्याकाळी अंधारून येताना दिवा लावला जातो तेव्हाही मनोभावे नमस्कार करण्याची प्रथा आहे. आता तेलाचे दिवे, कंदील राहिले नाहीत. तरीही संध्याकाळी विजेचा दिवा लावला जातो तेव्हा काही ठिकाणी आजही नमस्कार केला जातो. थोडक्यात काय, तर प्रकाशाला नमन करण्याची ही प्रथा आहे. सूर्याला नमस्कार करण्याची ही प्रथा कधीपासून सुरू झाली असेल, का सुरू झाली असेल, अशा प्रश्नांशी शब्दकोडी सोडवल्यासारखा खेळत बसलो. (अगदी आदिबंध वगैरे शोधण्याचा प्रयत्न नव्हता.) चालत्या गाडीत धुंडाळायला कुठलेही संदर्भ नव्हते. मग मीच संदर्भ जुळवायला लागलो.
एका दृश्याची कल्पना डोक्यात आली. म्हणजे असं काहीसं घडलं असावं. गुहेच्या तोंडाशी थोडा प्रकाश शिल्लक असताना संध्याकाळी दोन आदिमानव गुहेत बसलेले. पुरेशी भाषाच नाही; मग बाकी काय असणार? शिकारीच्या मागे पळायचं.. अणकुचीदार दगडांनी प्राणी मारायचा.. ही शिकार मग गुहेत आणून सर्वानी मिळून खायची. अग्नी अजून उपयोगात आलेला नव्हता. म्हणून कच्चं मांस खाऊनच पोट भरायचं. ऊन-पावसापासून संरक्षण म्हणून गुहेत बसून राहायचं. काही ध्वनी, खाणाखुणांच्या आधारे जुजबी संवादही होत असेल त्यांच्यात. बाकी बसून राहण्याशिवाय पर्याय नव्हता. त्या दिवशीही संध्याकाळच्या वेळी दोघे एकमेकांसमोर दगडावर बसलेले होते. पाहता पाहता ते दोघे एकमेकांसाठी गायब झाले. पहिल्याला दुसरा दिसेना. दुसऱ्याला पहिला दिसेना. नेमकं काय झालं, त्यांना कळेना. झालं काहीच नव्हतं. रात्र झाल्यामुळं अंधार पडला होता. त्यामुळं दोघे समोरासमोर असूनही एकमेकांना दिसत नव्हते. रात्रभर ते बसून राहिले. तिथेच झोपलेही असतील. पाखरं किलबिलायला लागली. गुहेच्या तोंडाशी कोवळा प्रकाश आला. सोबतीला सूर्याचा लालबुंद गोळाही दिसू लागला. या गोळ्याच्या साक्षीनं अचानक गायब झालेले ते दोघे एकमेकांना सापडले. अशा अचानक गायब झालेल्या अनेक गोष्टी या जादूई लाल गोळ्यामुळं सापडू लागल्या. दोन आदिमानवांनी आपल्या सापडण्याचा संबंध प्रकाशमान गोळ्याशी लावला. शिकार करणारे त्यांचे कर्तृत्ववान हात नकळत जोडले गेले. अशाच एखाद्या घटनेपासून सूर्याला नमस्कार करण्याची प्रथा सुरू झाली असावी.
गुहेत शिरलोच आहोत तर गुहेतली एक गोष्ट सांगण्याचा मोह होतोय. अश्मयुग. अजून अग्नी वापरात आलेला नाही असा काळ. वातावरण वेगळं काय असणार? प्राण्यांची अणकुचीदार दगडांनी शिकार करायची. कच्चं मांस खाऊन दिवस ढकलायचा. नदीचं वाहतं पाणी होतं. राहण्यासाठी गुहा होतीच. आदिमानवांचा एक समूह गुण्यागोविंदानं राहत होता. शिकार करताना सगळे मिळून प्राण्याला सापळ्यात पकडायचे. सगळे मिळून कच्चं मांस खायचे. हे सगळं सुरू असताना एक लांब नाकाचा आदिमानव पुढाकार घ्यायचा. सगळ्यांना मदत करायचा. हा लांब नाकवाला सतत काहीतरी नवीन करीत असे. एकदा झाडाची सालं पांघरून झोपला. एकदा तर झाडाची साल अंगाला गुंडाळून फिरला. भाषेत सांगणं शक्य नव्हतं; पण बाकीच्यांना हे खटकलं होतं. या लांब नाकवाल्याचे नवनवीन प्रयोग सुरूच असायचे. शिकार करताना खवळलेल्या प्राण्याने एकाला शिंग मारलं. मोठी जखम झाली. भळाभळा रक्त वाहायला लागलं. शेवटी या जखमीला लांब नाकवाल्याकडे नेण्यात आलं. लांब नाकवाल्यानं एका झाडाचा पाला दगडानं ठेचून चोथा केला. तो पानांचा चोथा जखमेत भरला. काही दिवसांत जखम बरी झाली. अशा नव्या गोष्टी करून पाहणं हाच लांब नाकवाल्याचा छंद झाला. तो एकटाच भटकत असायचा.
एकदा जंगलात वणवा लागला. प्रचंड ज्वाळांनी जंगल वेढलं गेलं. एका टेकडीवर बसून लांब नाकवाला हा विध्वंस पाहत होता. आता जंगल जळून खाक होणार, अशा वेळेला प्रचंड मोठा पाऊस सुरू झाला. वणवा विझू लागला. दुसऱ्या दिवशी जळलेल्या जंगलातून लांब नाकवाला फिरत होता. फिरताना त्याला एक हरणासारखा जळलेला प्राणी सापडला. भाजून काळपट झालेला प्राणी लांब नाकवाल्यानं चाखून पाहिला. खरपूस भाजलेलं मांस प्रथमच तो चाखत होता. ते भाजलं गेलेलं मांस त्याला खूप आवडलं. त्याने तो जळलेला प्राणी पाठीवर टाकून गुहेत आणला. ही विचित्र शिकार बघून बाकी आदिमानव जमा झाले. कुतूहलाने शिकारीकडे पाहू लागले. कारण शिकार म्हणजे रक्तबंबाळ झालेला प्राणी असंच त्यांना माहीत होतं. हा तर जळून काळाठिक्कर झालेला प्राणी होता. रक्ताने माखलेली शिकार नाही म्हणजे काहीतरी अघटित घडलेलं होतं. कुजबुजणं शक्य नव्हतं. पण जमलेल्या आदिमानवांनी एकमेकांकडे आश्चर्यानं पाहिलं. त्या नजरेत नापसंतीही होतीच. धर्म-पंथ नव्हते. त्यामुळे धर्माच्या विरुद्ध काही घडलेलं नव्हतं. कुणाच्या भावना दुखावल्या नव्हत्या. तरीही शिकारीची तयार झालेली वहिवाट लांब नाकवाल्यानं मोडलेली होती. मिळालेली शिकार सगळ्यांनी मिळून फस्त करायची असा रिवाज होता. त्यामुळं लांब नाकवाल्यानं वणव्यात भाजला गेलेला प्राणी सगळ्यांसमोर ठेवला. पण कुणी त्याला स्पर्शही केला नाही. उलट, सगळेजण पाय आपटत गुहेबाहेर निघून गेले. जाताना विचित्र आवाज काढत होते. लांब नाकवाल्यानं खरपूस भाजलेलं मांस एकटय़ानं फस्त केलं.
या गोष्टीतील शेवट अचानक अनपेक्षित वळण घेतो. तिथं आपण थबकतो.
‘अश्मयुगात
आदिमानवाला एक
अणकुचीदार दगड सापडला-
आणि
दुसऱ्या दिवशी एका गुहेत
जखमांनी सजलेल्या
रक्तबंबाळ माणसाचं एक प्रेत..
या दोन घटनांचा
एकमेकांशी संबंध नाकारण्याची प्रथा
बुरशीसारखी वाढत गेली,
परिणामी गुहेतला आदिम अंधार
फणा आपटत गावात शिरलाय,
लोक शोधतायत
अडगळीत ठेवलेल्या काठय़ा-कुऱ्हाडी
आणि इकडे
कंदिलावरची काजळी वाढत चाललीय.’
त्या दिवशी भाजलेलं मांस खायला नकार देऊन सगळे आदिमानव पाय आपटत निघून गेले. लांब नाकवाला भाजलेलं मांस खाऊन झोपी गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी गुहेच्या दारातून कोवळा प्रकाश आत आला. त्या प्रकाशात लांब नाकवाला मरून पडलेला स्पष्ट दिसत होता. अणकुचीदार दगडाने लांब नाकवाल्याचं डोकं ठेचलेलं होतं. रक्तानं माखलेल्या चेहऱ्यावरचं टोकदार लांब नाक उघडय़ा डोळ्यांसोबत भेसूर दिसत होतं. बाकी गुहेत कुणीच नव्हतं. गुहेच्या तोंडाशी रक्ताने माखलेला एक अणकुचीदार दगड पडलेला होता. लांब नाकवाल्याला नेमकं कुणी मारलं, याचं उत्तर मिळालंच नाही. पण गुहेच्या तोंडाशी सापडलेला, रक्ताने माखलेला दगड आदिमानवांनी जमिनीत रोवला. पुढं चालून शिकार करून आणलेल्या प्राण्याचं थोडंसं रक्त त्या रोवलेल्या दगडाला वाहण्याचा रिवाज सुरू झाला.
वर्तमानकाळातल्या ड्रायव्हरने उगवत्या सूर्याला केलेल्या नमस्काराचं मूळ शोधण्यासाठी आपण भूतकालीन गुहेत गेलो. रात्रीच्या अंधारात एकमेकांसाठी अदृश्य झालेल्या आदिमानवांची घटना रचली. आता लांब नाकवाल्याच्या भूतकालीन घटनेतून वर्तमानकालीन घटनेकडे उलट यायचं ठरवलं तर..? खरं तर असा उलटा विचार करणं बरोबर नाही. अश्मयुगातल्या गुहेत घडलेल्या घटनेची तुलना वर्तमानकाळातील घटनेशी करणं योग्य नाही. लांब नाकवाल्याचा विचार पटला नाही म्हणून त्याला आदिमानवांनी मारून टाकलं असं समजूया. कारण तेव्हा चर्चा करायला भाषा नव्हती. लांब नाकवाल्याचा खुनी सापडला नाही, कारण तेव्हा प्रशासन नव्हतं. तपास यंत्रणाही नव्हती. आता आपल्याजवळ सर्व काही आहे. सक्रिय सरकार आहे. गतिशील प्रशासन आहे. समर्थ तपास यंत्रणाही आहे. त्यामुळं सगळं काही छान चाललंय. आता समाज म्हटल्यावर चार-दोन घटना घडणारच..

ता. क. : वरील मजकूर वाचून कुणाच्या खोडकर डोक्यात दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी अशी नावं येत असतील तर तो त्या लोकांचा दोष आहे. सदरील लेखकाचा प्रामाणिक हेतू अश्मयुगातील गोष्ट सांगणे, एवढा आणि एवढाच आहे.

निघून गेला आहे

वडाखालच्या मारोतीजवळ चांगलंच ऊन चमकतंय. या उन्हात पदरानं डोकं झाकून बायका केव्हाच्या बसल्यात. मधेच वेशीकडच्या वाटेवर धुरळा उडतो. बायकांच्या माना आशेनं रस्त्याकडं  वळतात. कुणाचंतरी तोडलेलं झाड घेऊन जाणारी ट्रॅक्टरची ट्रॉली खडखडत असते. घरची कामंधामं तशीच पडून आहेत. म्हाताऱ्या, तरण्या, संसारी, परकरी पोरी, बायका वाट पाहत बसल्यात. एवढी वाट तर माहेराहून घ्यायला येणाऱ्या गाडीचीही पाहिली नव्हती. आज मात्र चार-चार घंटे अंगातलं रक्त तापवीत बसून राहावं लागतंय. रात्री-बेरात्रीसाठी पुरुष मंडळी कंदील-बॅटऱ्या घेऊन तयार असतात. कालपासून टँकर आलेलाच नाहीये. चारशे उंबऱ्याचं तहानलेलं गाव. दुष्काळी गाव म्हणून निर्माण झालेली नवीन ओळख. नेते आले. तळमळीने बोलले. त्यांचे बोल हवेत विरले. गाव कोरडाच. विहिरी आटल्या. नदीत तर वाळूही शिल्लक नाहीये. प्लेगच्या साथीपेक्षाही भयंकर अशी आत्महत्येची साथ आलीय. रानात उगवलेलं वाळून गेलं. बंद  पडलेल्या हापशाजवळ भांडे, कळशा, बघोन्यांची रांग लागलीय. त्या रांगेतल्या नंबरवरून भांडाभांडी, तर कधी मारामारीही झाली. बायकांनी एकमेकींच्या झिंज्या  धरल्या. पण टँकर काही वेळेवर येईना. परवा तर एका बाईला रांगेत घेरी आली. तिच्या तोंडावर पाणी मारावं तर पाण्याची बोंब. कुणीतरी घरातला रांजण खरवडून ग्लासभर पाणी आणलं म्हणून भागलं. नुस्तंच आभाळ भरून येतं. मधेच कधीतरी उंदीर मुतल्यासारखा पाऊस पडतो. एखाद्या कंजूष दानशूरानं पाखरासाठी स्वत:चा खरकटा हात झटकावा तसे चार शिंतोडे पडतात.
चिंताक्रांत बायका बसल्यात ओटय़ावरच्या तुटपुंज्या सावलीत. बोलणार तरी काय? बोडख्या कपाळासारखी शांतता. न बोलावं तर वेळ कसा कटणार? म्हणून बायका बोलतायत. चार बायका खोदून खोदून विचारतायत प्रयागाबाईला. घडाघडा बोलतायत प्रयागाबाई.. ‘‘असा वंगाळ वकत. तरीबी ट्रॅक्स करून आम्ही आठ-धाजण पोरगी पाहायाला गेल्तो. पाव्हणेबी आपल्यासारखेच. पन पाऊसकाळ बरा असलेले. खाऊनपिऊन सुखी. तरतरीत पोरगी. नाकीडोळं देखणी. चांगली बारावी शिकल्याली. दाखवायाचा कार्येक्रम यवस्थित झाला. आम्हाला पोरगी पसंद पडली. खरं तर तिथंच कुंकाचा कार्येक्रम उरकायचा; पन हे दुष्काळाचं घोडं मधीच आलं. पार दिवाळीपतुर सारं लांबलं. गोडाधोडाचं जेवण झालं. आम्ही गावाची वाट धरली. कधी नव्हं ते आमच्या पोराला पोरगी पसंद पडलेली. त्यामुळं पोरगं खुशीत व्हतं. सुनबाईला पुढी शिकवायाचा त्याचा इचार होता. दोघाचा जोडा लक्ष्मी-नारायणाचा..’’ तेवढय़ात न राहवून एक बाई बोललीच- ‘‘मंग माशी शिंकली कुठं?’’ प्रयागाबाई गहिवरल्या. ‘‘कशान् की काय माय, कुण्या चांडाळाची नजर लागली. चार रोजानी पाव्हण्याचा कागुद आला. ठरलेलं लगीन मोडलं. काय तर म्हणं आमचं ठिकाण पसंद न्हाई.’’ जमलेल्या  बायकांना टँकरच्या प्रतीक्षेतही ठिकाण का पसंत नाही याची उत्सुकता होतीच. नाकारण्याचं नेमकं कारण ऐकायला उत्सुक असलेली एक म्हातारी बोललीच, ‘‘एवढं राजबिंडं, हुश्शार पोरगं. ठोकरून लावायला काय धाड बडवली त्या तालेवारायला. काय काळ आला रं देवा!’’ तेवढय़ात रस्त्यावरचा धुरळा उडाला. आता मात्र पाण्याचा टँकर आलेला होता. बायका सावध झाल्या. शत्रूची चाहूल लागताच सैनिकांनी शस्त्र रोखून सज्ज व्हावं तशा हांडे-कळशा घेऊन बायका तय्यार झाल्या. भांडय़ाला भांडी लागली. गावात गलका झाला.. ‘टँकर आलाय, टँकर आलाय.’ या गोंधळात प्रयागाबाईच्या पोराची सोयरीक मोडण्याची गोष्ट पूर्ण झाली नाही. पण त्या मोडलेल्या सोयरिकीची सल कायम होती. खरं तर प्रयागाबाईचा पोरगा चांगला धट्टाकट्टा. डी. एड. झालेला. शिक्षकाच्या नोकरीसाठी दहा लाख देणं शक्य  नव्हतं, नाहीतर आयत्या पगाराच्या नोटा मोजत बसला असता. घरात दहा एकर शेती. शेवटी बापाबरोबर शेती करू लागला. तीन वर्षांपासून पाऊस नाही. परिस्थिती बिघडली. गाव कंगाल झालं. प्यायलासुद्धा पाणी नाही. कुणाच्या घरी दिवसा पाहुणा आला तर घरात बाई दिसणार नाही. हांडे-कळशा घेऊन बाई बसलेली टँकरच्या रांगेत. नाहीतर दूरवरच्या  विहिरीतलं पाणी खरडण्यासाठी पायपीट करायला गेलेली. शेत ओसाड झालेलं. तिथं काही काम नाही. मग बापे माणसं अंगणातल्या खाटेवर बिडय़ाचा धूर काढीत, नाहीतर तंबाखू चघळत बसलेले.
आधी टँकर गावातल्या कोरडय़ा विहिरीत रिकामा केला जायचा. टँकरच्या पाइपाचं पाणी थेट विहिरीत सोडलं जायचं. वरतून खाली खडकावर पडणाऱ्या पाण्याचा मोठा आवाज व्हायचा. खालच्या गाळात पाण्याची धार पडल्यामुळं पाणी गढूळ व्हायचं. तसं गढूळ पाणी मग पोहऱ्यानं शेंदून घ्यावं लागायचं. त्यामुळं पाइपातून विहिरीत पाणी पडतानाच काठावरून भांडे-कळशा भरून घेण्यासाठी धडपड सुरू असे. पाइपाच्या धारेला भांडं धरलं की फोर्समुळं चटकन् भरून जाई. ही वरच्या वर भांडं भरायची पद्धत सर्रास झाली. एक दिवस तेरा-चौदा वर्षांची परकरी पोरगी वरच्या वर घागर भरू लागली. घागरीचं तोंड लहान. तिनं पडतं पाणी धरण्यासाठी विहिरीच्या आतल्या बाजूनी घागर धरली. घागर भरत गेली. वजनदार झाली. ती वजनदार घागर सांभाळताना या पोरीचे काठावरचे पाय आधर झाले. आत तोल गेला. घागरीसगट पोरगी खडकावर आदळत तळाशी गेली. भलामोठा आवाज करणारी टँकरची मोटार कुणीतरी बंद केली. मोटार शांत झाली. घागरीसकट मुलीला वरती काढलं. मुलगीही शांत झालेली होती. गावातला गलका मात्र वाढतच गेला. बातमी पंचक्रोशीत पोहोचली.घटना घडत गेल्या. बापे चिंताक्रांत झाले. बायका डोळ्याला पदर लावू लागल्या. तरी टँकर थांबला नाही. एका परकरी पोरीचा जीव गेला म्हणून थेट विहिरीत पाणी टाकणं बंद झालं. आता बंद पडलेल्या हापशाजवळ टँकर येऊन उभा राहायचा. टँकरची वाट पाहत बायका-पोरी रांगेत बसून तोंड हलवायच्या. मग जुनेपाने विषय निघायचे. एक दिवस नेहमीप्रमाणं टँकरची वाट पाहत बायका बसलेल्या. एकीनं प्रयागाबाईला छेडलंच- ‘‘कामुन मोडली असंल त्यायनी सोयरीक?’’ प्रयागाबाईचंही साठलेल्या अपमानाचं बेंड ठसठसत होतंच. बाई बोलायला लागल्या आणि एक भयंकर गोष्ट बाहेर आली. सोयरीक मोडली तरी मोडण्याची कारणं स्पष्ट होत नव्हती. हुंडय़ाचा प्रश्न सुटलेला होता. मुलगा आणि मुलीनं एकमेकांना पसंत केलेलं होतं. तरीही मुलीकडच्यांनी सोयरीक मोडली होती. मुलाचे वडील मुलाच्या हट्टामुळे स्वत: जाऊन चर्चा करून आले तेव्हा खरं कारण पुढं आलं. मुलीच्या वडलांचं म्हणणं होतं- या गावात दिलेल्या प्रत्येक पोरीचं आयुष्य पाणी भरण्यातच बर्बाद होणार. या गावाची दुष्काळी ख्याती कानी येत गेली म्हणून ही सोयरीक मोडली. तसं पाहिलं तर मुलीच्या वडिलांच्या म्हणण्यात तथ्य आहे. या गावात पोरगी देणं म्हणजे तिला कोरडय़ा विहिरीत ढकलून दिल्यासारखंच आहे. पण या मोडलेल्या लग्नाचा परिणाम प्रयागाबाईच्या मुलावर झाला. चार दिवसांनी पोरगं गायब झालं. पाव्हण्यारावळ्यांकडं विचारणा केली.  जमेल तिथं शोध घेतला. पण पोरगं काही सापडेना. ‘हरवला आहे’ म्हणावं तर चांगलं लग्नाचं पोरगं हरवेल कसं? पोलिसात तक्रार दिली. शेवटी काही लोकांच्या सांगण्यावरून जिल्ह्याच्या पेपरात  ‘घरातून निघून गेला आहे’ अशी जाहिरात देण्याचं ठरलं. जाहिरात छापून आलीही असेल. कदाचित निघून गेलेला पोरगा वापसही आला असेल. पण आता टँकरच्या रांगेत बसलेल्या बायका शांत बसून राहतात. एकमेकीला पोराची सोयरीक मोडल्याचं कारण विचारीत नाहीत. त्यांनी ते अनुभवलेलं असतं.
ज्यांना ही ‘निघून गेला आहे’ची कहाणी फारच कल्पनाविलास वाटत असेल त्यांनी आमच्या भागात येऊन बघावं. प्रारंभी कर्तव्यदक्षतेने दाखल झालेला आता बेपत्ता झालाय. ‘हरवला आहे’ असं मी  म्हणणार होतो; पण नंतर लक्षात आलं- रोज त्याच्याबद्दल अनेक बातम्या कळतायत.. ‘आज तिकडं होता’, ‘परवा त्यानं धुमाकूळ घातला.’ म्हणून ‘हरवला आहे’ असं म्हणता येणार नाही. मग आता ‘निघून गेला आहे’ असंच म्हणू या..

‘वक्तशीर मुलगा
पाठीवर दप्तर घेऊन
शाळेत वेळेवर पोहोचतो
तसा येऊन पोहचला पाऊस,
एखादं आदिम तत्त्वज्ञान रुजवावं
तसं शेतकऱ्यानं बी पेरून दिलं
जमिनीच्या पोटात

मग भुरभुर वारा सुटला..
छोटय़ा स्टेशनवर न थांबता
एक्स्प्रेस गाडी
धाडधाड निघून गेल्याप्रमाणे
काळे ढग नुस्तेच तरंगत गेले,
वाट चुकल्या भ्रमिष्ट माणसासारखा
अचानक पाऊस बेपत्ता झाला

बियांच्या पोपटी अंकुरानं
जमिनीला धडका मारून
वर येण्यासाठी रचलेले मनसुबे
दिवसागणिक वाळून गेले,
जन्मताच दगावलेल्या पोराचा बाप
दवाखान्यातल्या व्हरांडय़ात
विमनस्क फेऱ्या मारतो
तसा शेतकरी धुऱ्यावर उभा

लांबवर टाळ-मृदंगाच्या गजरात
पंढरपुराकडे निघालेली दिंडी
आणि इथं काळ्या शेतात
मरून पडलेला हिरवा पांडुरंग!’
आता याचंही भ्रमिष्टासारखं बेपत्ता होणं, अचानक निघून जाणं समजून घ्यायला हवंय. याचीही एखादी सोयरीक मोडली
नसेल कशावरून?

मार्गदर्शन

प्रदर्शित झालेला नवा चित्रपट पूर्वी छोटय़ा गावांत उशिराने लागायचा. त्यामुळे पहिल्या दिवशी पहिला शो पाहण्यासाठी तिकीट खिडकीवर रांगा लागायच्या. नव्या चित्रपटाबद्दल प्रचंड उत्सुकता ताणलेली असायची. पहिल्या दिवशी पहिला शो पाहणारा चंद्रावर पाऊल ठेवणाऱ्या नील आर्मस्ट्रॉंगच्या थाटात गावभर मिरवत असे. पण आजकाल नव्या तंत्रज्ञानामुळे नवा चित्रपट गावोगाव गल्लीबोळांतल्या टॉकिजमध्ये एकाच वेळी लागतो. त्यामुळे फारशा रांगा लागत नाहीत. उलट, मोठय़ा टॉकिजचं अस्तित्व धोक्यात आलंय. अनेक ठिकाणी नवाकोरा चित्रपट सहज उपलब्ध असल्यामुळे प्रेक्षकांची सोय झालीय. नाटकाच्या बाबतीत मात्र अजूनही दुष्काळ आहे. नव्हे, तो अधिकच वाढलाय. चांगल्या नाटकांचे मुंबई-पुण्याबाहेरचे प्रयोग दुर्मीळ होत चालले आहेत. अशा परिस्थितीत कधीतरी एखाद्या चांगल्या व्यावसायिक नाटकाची जाहिरात झळकते. विनाविलंब आपण तिकीट बुक करतो. प्रयोगाच्या दिवशी उत्सुकतेने नाटकाला जातो. नाटय़गृहातील हवंहवंसं वातावरण प्रसन्न वाटतं. तो मंद हलणारा लाल पडदा. हातात तिकीट नाचवत स्वत:ची सीट शोधणाऱ्यांची लगबग. पडद्यामागे उजवीकडून डावीकडे व डावीकडून उजवीकडे वाजणारा घंटेचा आवाज. बंद पडद्यातून कमावलेल्या आवाजात अनाऊन्समेंट होते. थोडय़ाशा मिश्कील शब्दांत मोबाइल सायलेंट करण्याविषयी सांगितलं जातं. नाटक सुरू व्हायची वेळ आलेली. मधेच उशिराने आलेलं एक जोडपं जागा शोधून चटकन् बसण्याऐवजी ‘हाय-हॅलो’मध्ये मश्गूल असतं. तिसरी घंटा होते आणि अधीर पडदा प्रसन्न संगीताच्या साथीनं बाजूला सरकत जातो. प्रेक्षकांतले दिवे मंद होतात. रंगमंच उजळतो. नाटक सुरू होतं. वेगळ्या विषयावरचं दोन-पात्री नाटक. संपूर्ण नाटक एका महानगरीय लोकलच्या डब्यात घडतं. त्यामुळे ‘मुक्काम, पोस्ट : दिवाणखान्या’त अडकलेलं मराठी नाटक पार लोकलच्या डब्यात आलेलं. नायक-नायिकेची भूमिका करणारे कसलेले व्यावसायिक कलाकार होते. नाटय़ रंगत गेलं. प्रयोग अप्रतिम झाला. पडदा पूर्ववत बंद झाला. प्रेक्षकांतले दिवे उजळले. प्रेक्षक स्वत:च्या कथानकात परतले. आम्ही काहीजण कलावंतांना भेटण्यासाठी स्टेजच्या मागे गेलो. नाटकातील कलावंत आणि दिग्दर्शक मोठय़ा विनम्रतेने सगळ्यांना भेटत होते. खरं तर अजून कलावंतांनी मेकअपही उतरवला नव्हता. बऱ्यापैकी परिचय असल्यामुळे आम्ही दिग्दर्शकाशी बोलत होतो. तेवढय़ात ‘सर आले, सर आले’ अशी कुजबुज झाली. एक ज्येष्ठ प्राध्यापक त्यांच्या शिष्यांसह येऊन दाखल झाले. तेवढय़ा गडबडीत त्यांच्या एका उपस्थित शिष्याने त्या ज्येष्ठ प्राध्यापकाला चरणस्पर्श केला. एका शिष्याने ज्येष्ठ प्राध्यापकाची कलावंतांशी ओळख करून दिली. दिग्दर्शकाने आदराने विचारलं, ‘सर, कसं वाटलं नाटक?’ झालं! या ज्येष्ठ प्राध्यापकाने अदृश्य माइक हातात घेतला आणि बोलणं सुरू झालं. प्रयोग आवडलेले अनेक प्रेक्षक कलावंतांना भेटायला आलेले होते. दोन्ही कलावंतांनी उत्तम अभिनय तर केला होताच; शिवाय मालिकांमुळे घराघरात पोचलेले हे दोघे कलावंत असल्यामुळेही प्रेक्षकांना उत्सुकता होती. काही तरुण मुलामुलींना त्या दोघांची स्वाक्षरी घ्यायची होती. काहींना त्यांच्यासोबत फोटो काढायचा होता. पण ज्येष्ठ प्राध्यापकाचं बोलणं काही संपेचना. ते ग्रीनरूमचा ताबा घेतल्यासारखं हातवारे करीत बोलत होते. सोबतच्या शिष्यांच्या चेहऱ्यावर कौतुक दिसत होते. बोलताना अभिप्रायाचं रूपांतर मार्गदर्शनात झालेलं होतं. दिग्दर्शक बिचारे ‘हो, हो’ करीत होते. ज्येष्ठ प्राध्यापकांच्या सूचनांत काही दम नव्हता; पण सूचना काही थांबेनात. ‘दुसऱ्या अंकाला स्पीड हवा होता’, ‘पात्रांनी सायको-टेक्निकचा वापर करायला पाहिजे होता’, ‘पात्रांची इन्व्हॉल्व्हमेंट काही जागी कमी पडतेय’ अशी शेरेबाजी सुरूच होती. दिग्दर्शक, कलावंत अस्वस्थ झाल्याचं स्पष्ट जाणवत होतं. तरीही ज्येष्ठ प्राध्यापकांचं थिअरॉटिकल बोलणं काही थांबेचना. शेवटी ‘पहिल्या अंकाला ट्रीटमेंट वेगळी हवी होती..’ हे ज्येष्ठ प्राध्यापकांचं वाक्य थांबवत दिग्दर्शक बोलले, ‘सर, असं व्हेग बोलू नका. ट्रीटमेंट वेगळी म्हणजे नेमकी कशी हवी होती, ते सांगा.’ ज्येष्ठ प्राध्यापक चपापले. त्यांना काय म्हणायचं होतं ते नेमकेपणाने सांगता येईना. त्यामुळे या लक्षवेधी मार्गदर्शनाची निर्थकता सगळ्यांच्याच लक्षात आली. पण तसं बोललं कुणी नाही.
एक चांगला प्रयोग नुकताच पाहिलाय, प्रयोगाचा अनुभव आत जिरतोय- म्हणजे चांगल्या प्रयोगानंतर येणारं भारावलेपण अजून आहे.. अशा अवस्थेत रंगकर्मीना भेटून त्यांना दाद देणं, अभिनंदन करणं हा रसिकतेचा एक चांगला रिवाज आहे. बारशाला गेल्यानंतर लेकराला ‘नकटं’ म्हणायचं नसतं. उलट, ‘गोबऱ्या गालात नाक लपलंय,’ असं म्हणायचं असतं. तसं प्रयोगानंतर भेटताना दाद देणं, कौतुक करणं अपेक्षित असतं. इथं तर प्रयोगालाही नाव ठेवायला जागा नव्हती. दिग्दर्शक, कलावंतांचा चांगला दबदबा होता. तरीही नम्रतापूर्वक ते ज्येष्ठ प्राध्यापकांचं ऐकून घेत होते. एखादा ऐकून घेतोय म्हणून किती ऐकवावं? शेवटी या मार्गदर्शनात नाटकाच्या व्याख्याच सांगायच्या बाकी होत्या. मुळात नाटक हा प्रत्यक्ष रंगमंचावर मनापासून खेळायचा खेळ आहे. क्रिकेटच्या सामन्याचं रसभरीत धावतं वर्णन करणारा समालोचक खेळाडूला मार्गदर्शन करू लागला तर अवघड परिस्थिती निर्माण होईल. पण आपल्याकडे सर्व क्षेत्रांत मोफत आणि सहज उपलब्ध असलेली गोष्ट म्हणजे मार्गदर्शन! रात्री कंपाऊंडच्या गेटला कडीकुलूप लावून घरात गुडुपचूप झोपणारे सीमेवरच्या सैनिकांना राष्ट्रभक्तीपर मार्गदर्शन करायला तयार असतात.
अनेक कलावंतांनी कुठलंही प्रशिक्षण न घेता स्वत:ला प्रयोगात सिद्ध केलेलं आहे. अशांना पुस्तकी मार्गदर्शनाची गरज नसते. सगळे सिद्धान्त त्यांनी स्वत:च्या पद्धतीने समजून घेतलेले असतात. जो प्रत्यक्षात सिद्ध करतो, त्याला पुन्हा सिद्धान्त सांगण्याचे प्रयत्न मार्गदर्शकांच्या हट्टापायी होत असावेत. आधीपासूनच आपल्याकडे मार्गदर्शकाबद्दल (गुरूबद्दल) आदराची भावना आहे. या आदरापोटी पटलं नाही तरी ऐकून घेतात. हा आयता आदर मिळवण्यासाठी कुणीही कोणत्याही विषयावर मार्गदर्शन करायला एका पायावर तयार असतो.
कोणी कुणाला मार्गदर्शन करावं, याचे काही संकेत आहेत. तसंच केव्हा, कुठं आणि कधी मार्गदर्शन करावं, याचेही काही नियम असायला हवेत. आपल्याकडे वकूब नसलेला माणूस अधिकारवाणीने मार्गदर्शन करीत असतो. याचं सगळ्यात चांगलं उदाहरण म्हणजे सराईतपणे गाडी चालवणाऱ्या ड्रायव्हरला शेजारच्या सीटवर बसलेला बिनधास्त मार्गदर्शन करीत असतो. बऱ्याचदा शेजारी बसणाऱ्याला स्वत:ला गाडी चालवता येत नसते, पण व्यवस्थित मार्गदर्शन मात्र सुरू असतं. क्रिकेटची मॅच पाहत असतानाच्या कॉमेन्ट्स भावनिक असल्या तरी मार्गदर्शकही असतात. ‘तेंडल्यानं हा रन घ्यायला नको होता’, ‘धोनीनं जडेजाला शेवटची ओव्हर देऊन माती खाल्ली’, ‘टॉस जिंकल्यावर बॅटिंग घ्यायला हवी होती’ असे फुकटचे सल्ले अधिकारवाणीने दिले जातात. सल्ला देताना आपल्याला मैदानाचा अनुभव असायला हवा असं आवश्यक नसतं. सल्ला देणाऱ्यांनी एकदा मॅचची पहिली ओव्हर खेळून बघावीच. नवा चकाकणारा लालबुंद चेंडू ‘सुईई’ करीत कानाजवळून जातो ना तेव्हा कळू शकतं- चौका-छक्का मारणं म्हणजे काय असतं? प्रेक्षक म्हणून आपल्याला प्रतिक्रिया देण्याचा अधिकार नक्कीच आहे. म्हणून मार्गदर्शनही करणं बरोबर नसतं. कुठलाही कार्यक्रम असू द्यात, कुठलाही विषय असू द्या, ‘पाहुण्यांनी मार्गदर्शनपर दोन शब्द बोलावेत-’ असं म्हटल्याबरोबर जो कोणी बोलायला उठतो तो ज्ञानाचा उद्गाता झालेला असतो. माइकचा शोध लागल्यापासून मार्गदर्शकांच्या संख्येत वाढ झालेली असावी. पण तसं म्हणावं तर माईकशिवायही जमेल तिथं, जमेल तसं मार्गदर्शन अव्याहत सुरूच असतं. पार ऋषी-मुनींच्या मार्गदर्शनापासून ते ‘ताईचा सल्ला’, ‘विचारा तर खरं’, ‘वहिनींचा सल्ला’, ‘कार घेताना’, ‘फ्लॅट घेताना’, ‘आरोग्याचा सल्ला’, इ. इ. ते सेल्फी मार्गदर्शन वर्गापर्यंत घनघोर मार्गदर्शन सुरू असतं. लोकही मोठय़ा आत्मीयतेने प्रश्न विचारत असतात. ‘माझे वय पंचेचाळीस वर्षे आहे. मला ऑफिसात रोज आठ तास बैठे काम करावे लागते. शरीर जास्तच स्थूल झालेले आहे. चालताना त्रास होतोय. काय करावे?’ अशा अनेक त्रस्त प्रश्नांना मन:पूर्वक, सविस्तर मार्गदर्शन होताना आपण पाहतो; वाचतो.
एका अंत्यविधीसाठी स्मशानात गेलो होतो. तिथे काही समाध्या बांधलेल्या दिसल्या. एक चकचकीत टाइल्स लावून सजवलेली समाधी होती. उत्सुकतेने जवळ जाऊन पाहिलं तर कोनशिलेसारखा मजकूर वाचनीय होता- ‘आमचे प्रेरणास्थान व मार्गदर्शक’ म्हणून समाधीत निवांत झोपलेल्या गृहस्थाचं नाव होतं. त्या नावापुढे ‘माजी जिल्हा परिषद सदस्य (अपक्ष)’ असा मजकूर होता. चिरनिद्रा घेणारं मार्गदर्शन परवडलं. एका दरवाजावर चक्क लटकणारं मार्गदर्शनही पाहण्यात आलं. एका प्राध्यापक महोदयांनी घरावर भलीमोठी नेमप्लेट लावलेली होती. त्यांना मिळालेल्या पदव्या, शेवटी ‘पीएच. डी. गाइड’ असा भरगच्च मजकूर नेमप्लेटमधून उतू जात होता.
मार्गदर्शनाच्या सुकाळामुळे काही विद्यार्थी आता मार्गदर्शक निरखून-पारखून घेताहेत. ‘आम्हाला असे मार्गदर्शक (प्रमुख) नकोत,’ असे ठामपणे सांगताहेत. संप करताहेत. तासिका बंद करताहेत. म्हणजे ही चर्चा मार्गदर्शनाबद्दलचीच आहे. यातलं राजकारण घडीभर बाजूला ठेवू या; पण आयुष्याच्या प्रवासात मार्गदर्शकाचं महत्त्व नाकारताच येत नाही. आपला मार्गदर्शक कर्तृत्ववान असावा, पारदर्शक असावा, ही विद्यार्थ्यांची अपेक्षा रास्तच आहे. हे शहाणपणाचं मार्गदर्शन त्यांना अनुभवातून मिळालं असावं. वेल वाढताना डावीकडे वळली तशी उजवीकडेही वळू शकते. फक्त तिचा प्रकाशाकडे जाण्याचा प्रवास अखंडित असायला हवा. हे माझे मार्गदर्शन नव्हे; एक प्रांजळ अपेक्षा आहे.

बाजार

चारेक वर्षांपूर्वी नव्यानं उघडणाऱ्या मॉलची सर्वत्र चर्चा होती. गावभर लागलेले होर्डिग्ज.. वर्तमानपत्रांतून मॉलच्या भव्यपणाचं कौतुक करताना ओसंडून वाहणारे रकाने.. प्रत्येकाच्या तोंडी मॉलची चर्चा रंगलेली. ‘अहो, एवढा मोठ्ठा मॉल. संपूर्ण एअर कंडिशन आहे म्हणे!’ ‘हे आहे का? ते आहे का? असलं विचारायचं नाही. काय पाहिजे ते ब्रँडेड मिळणार!’.. असा मॉलचा बोलबाला वाढतच गेला. शेवटी हे मॉलचं वातावरण एवढं तापलं, की शुभारंभाच्या दिवशी प्रवेशासाठी लोकांना रांगा लावाव्या लागल्या. तरीही लोक आटोक्यात येईनात. शेवटी पोलिसांना पाचारण करावं लागलं. काहींनी पोलिसांचे दंडुके खाल्ले. दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रांत मॉलसमोर लागलेल्या लांबच्या लांब रांगांचे फोटो झळकले. त्यामुळे उर्वरित लोकांची उत्सुकता अधिकच ताणली गेली. परिणामी मॉलची गर्दी काही हटेना. एकमेकांना विचारणं सुरू झालं, ‘तुम्ही अजून मॉलमध्ये गेला नाहीत?’ या प्रश्नातील ‘अजून’वर दिलेला जोर बघून अधिकच मागासल्यासारखं वाटायला लागलं. एखादा उत्साही रसिकमित्र मारधाड सिनेमा पाहून आल्यावर साभिनय स्टोरी सांगतो. त्यात त्यानं जवळपास चित्रपटाची गंमतच सांगून टाकलेली असते. तसे मॉलला भेट देऊन आलेले उत्साही लोक भेटल्यावर भरभरून बोलू लागले. तिथले सरकते जिने, रोषणाई, वस्तूंच्या मोहक व्हरायटी, स्वस्त आणि मस्त प्रॉडक्ट्स, बिलिंग पद्धत, दुडूदुडू धावणाऱ्या ट्रॉलीज्, तन आणि मन आल्हाददायक ठेवणारं वातावरण.. असं काय काय सांगताना लोक थकत नव्हते. हे सर्व ऐकताना इथले दारिद्रय़च संपून गेलंय, एकदाची मस्त सुबत्ता आलीय असं वाटू लागलं.
उत्सुकता वाढलेली होतीच. शिवाय ‘मॉलमध्ये न गेलेला’ असा मागासलेपणाचा शिक्काही पुसायला हवा म्हणून एक दिवस मॉलमध्ये गेलो. आता पोलिसांना पाचारण करावं लागावं अशा रांगा नव्हत्या. पण गर्दी मात्र होतीच. खरंच, या शहराच्या मानानं भव्यदिव्य मॉल होता. लोकांचं कुतूहल ओसंडून वाहत होतं. सरकत्या जिन्यांवर काहीजण तर बागेतल्यासारखे ये-जा करण्याचा खेळ खेळत होते. लोकांची दणकावून खरेदी सुरू होती. ट्रॉलीची गाडी- गाडी करीत वस्तू गोळा करीत होते. हातात चमचे- काटेचमचे नाचवत काही काही खात होते. आता मॉल बऱ्यापैकी परिचयाचा झालाय. पण नव्यानं मॉल अनुभवणाऱ्याला प्रभावित होण्याशिवाय पर्याय नव्हता. ज्यांनी एखाद्या खोलीतलं कागदाच्या पुडीत गूळ-साखर-शेंगदाणे बांधून देतानाचं किराणा दुकान पाहिलंय, किंवा दहा- वीस कपडय़ांचे गठ्ठे म्हणजे कपडय़ाचं दुकान असा ज्यांचा अनुभव आहे, त्या लोकांसाठी हा वस्तूचा अद्भुत झगमगाट टोळे दिपवून टाकणारा होता. गळ्यात मॉलचं ओळखपत्र अडकवून उभ्या असलेल्या तरुण मुलं-मुलींचं हिंदी बोलणं ऐकतानाच ते मराठीभाषिक असल्याचं लक्षात येत होतं. दोघेजण तर ओळखीचे विद्यार्थीच निघाले. त्यांना हिंदीतच बोललं पाहिजे अशी ताकीद दिलेली होती. फळानं लगडलेल्या एखाद्या बागेतून फिरावं तसं वाटत होतं.
‘मॉलमध्ये रमतं मन
थंडगार राहतं तन
मॉलमधेच उगवतात भाज्या,
लटकणाऱ्या कपडय़ांना
लगडतात माणसं,
या चकचकीत लोणच्यापासून
तयार होते कैरी,
या मोहक फुलांसाठीच जन्मलीत फुलपाखरं,
हेच दूध नेऊन भरलं जातं
गाई-म्हशीच्या आचळात,
ही अंडी उधार नेऊन
पक्षी करतात स्वत:ची वंशवृद्धी,
कधीही येऊ शकतात मधमाश्या
या नॅचरल मधाच्या बाटलीवर..’
अशा कवितेत केलेल्या कल्पना प्रत्यक्षात उतरल्यावर समाधान वाटण्यापेक्षा धक्काच अधिक बसतो. तीनेक वर्षांपूर्वी छोटय़ा मुलीला विद्यापीठातील आमराई दाखवायला मुद्दाम घेऊन गेलो होतो. झाडांना मस्त आंबे लागलेले होते. वेगवेगळ्या जातीची झाडं. वेगवेगळी चव, रंग व आकार असलेले आंबे. हातानं तोडता यावेत असे लोंबणारे आंब्याचे घोस. काही गाभुळे आंबे खाली पडलेले. एका गोटी आंब्याच्या झाडाखाली आम्ही थांबलेलो. त्या छोटय़ा आकाराच्या आंब्याचं मुलीला कुतूहल वाटलं. एक खाली पडलेला छोटुसा पिवळा आंबा मी तिला दिला. न कापता आंबा खातात हे तिला माहीत नाहीए. शेवटी तिला मी एक आंबा स्वत: खाऊन दाखवला. मग तिनेही जमेल तसा आंबा खाल्ला. मुळात एवढे लखाटलेले आंबे प्रथमच प्रत्यक्ष बघून ती खूश झालेली होती. आता आंबा खाल्ल्यावर तर तिचा चेहरा चांगलाच खुलला. तिला चव आवडलेली होती. मी मुद्दाम विचारलं, ‘कसाय आंबा? आवडला का?’ तर ती म्हणाली, ‘छानय. पण बाबा, हा तर फ्रुटीसारखा लागतोय!’ हा संवाद कळला असता तर ते आंब्याचं झाड उन्मळूनच पडलं असतं. यात मुलीचीही चूक नाही. तिनं आधी घेतलेली फ्रुटीची चव तिच्या डोक्यात पक्की आहे, आणि आता नंतर ती आंबा खात होती. त्यामुळं मॉलमधली अंडी उधार नेऊन पक्षी वंशवृद्धी करतो, किंवा मॉलमधलं फ्रेश दूध गायीच्या आचळात नेऊन भरलं जातं, असं कवीला वाटणं फार अनाठायी ठरत नाही.
धूमधडाक्यात सुरू झालेले असे अनेक मॉल काही दिवसांतच बंदही पडले. पडताहेत. त्यामागेही काहीतरी वेगळं गणित असणारच. वाढत्या लोकसंख्येबरोबर खरेदी करण्याची क्षमता वाढलेल्या लोकांसाठी अद्ययावत बाजारपेठ असायलाच हवी. संकरित बी-बियाण्यांच्या तुलनेत देशी वाण सात्त्विक असणारच. पण या हायब्रीडमुळंच मुबलक धान्यसाठा आपण करू शकलो, हे मान्य करावंच लागतं. म्हणून आज दुष्काळ पडला तरी पाण्याचा तुटवडा आहे; पण धान्य मात्र पुरेसे उपलब्ध आहे. कुठलाही बदल हा अपेक्षितच असतो. तो स्वीकारावा लागतो. पण पुन्हा त्याचे म्हणून काही दुष्परिणाम असतात.
रंगभूमी, चित्रपटांतून एक संवेदनशील अभिनेता म्हणून संदीप मेहता सुपरिचित आहे. त्याच्या व्यावसायिक नाटकाचे औरंगाबादेत सलग दोन प्रयोग होते. पहिला प्रयोग झाल्यावर दुसऱ्या दिवशी नाश्त्याला घरी येण्याचं ठरलं. घरासमोरच्याच हॉटेलात उतरला असल्यामुळे संदीप सकाळी सहज चालत येऊन पोहोचला. गप्पा सुरू होत्या. संदीप मूळ जळगावचा. तीसेक वर्षांपासून आता तो मुंबईत आहे. जाहिराती, चित्रपट, नाटक असा त्याचा दमदार प्रवास आहे. त्याचं वाचन चांगलं आहे. सडेतोड मतं मांडत असतो. गप्पा, खाणं सुरू होतं. तेवढय़ात टेबलावरचं पॅक दही बघून तो सटकला, ‘अरे, असलं पॅक दही खाण्याशिवाय आम्हा मुंबईवाल्यांना पर्याय नाहीए. तुम्ही कशाला असलं दही खाता? मस्त ताजं दही मिळतंय इकडं, ते खा की!’ प्रिझव्‍‌र्हेटिव्हमुळे हे दही आंबट होत नाही, खराब होत नाही, हे मलाही माहीत होतं. पण ताजं दही आणायला वेळ नव्हता म्हणून समोरच उपलब्ध असलेलं पॅक दही ऐनवेळी आणलेलं होतं. मग रासायनिक परिणामांवर घनघोर चर्चा झाली.
आपल्या व्यस्त आणि धकाधकीच्या जीवनात वेळ वाचवणारं, सहज उपलब्ध असणारं आणि चकचकीत असणारं आपण स्वीकारतो. त्याला शहरात पर्यायही नाहीए. या असहायतेचा मग फायदा घेतला जातो. ‘सिर्फ दो मिनिटा’त तयार होणारा पदार्थ आपल्या जगण्याचा भाग बनला. ‘मॅगी तेरी याद में’ आजही अनेकजण दु:खी आहेत. पण दुष्परिणाम समोर आल्यामुळं शांतता आहे. खरं तर यात आपली भूमिकाही निर्दोष नाही. आपल्याला आजारी पडल्याबरोबर ताबडतोब दुरूस्त व्हायचं असल्यामुळं डॉक्टर अ‍ॅन्टीबायोटिक्सचा मारा करतात. यातूनच बाजारात उपलब्ध फळं, भाज्या, वस्तू खात्रीलायक राहिल्या नाहीत. काहीजणांनी केळी खाणं सोडून दिलंय. पावडरमध्ये पिकवलेल्या पिवळ्याजर्द दिसणाऱ्या आंब्याची चव गायब झाली. दुधात युरिया खत निघालं. हॉटेलात जेवताना हिरव्यागार पालकच्या भाजीचं केलेलं कौतुकही हात धुताना धुऊन गेलं. कारण ती ताजी भाजी नव्हती, तर हिरवा रंग होता, हे कळतं. परवा तर तांदळामध्ये न ओळखू येतील असे प्लॅस्टिकचे दाणे निघाले. मग आता खायचं तरी काय? काहीतरी तर खावं लागेलच ना! म्हणून मग आम्ही धुंडाळतो नवनवे मॉल. करतो भरपूर खरेदी. बऱ्याचदा खरेदी ही गरज न राहता करमणूक झाली आहे. बोअर होत होतं म्हणून शॉपिंगला जाणारेही भेटतील. त्यामुळं वस्तूंचं अप्रूप राहिलं नाही. वर्षभरात पाहिजे तेव्हा टरबूज उपलब्ध आहे. पण ते टरबूज कुठल्या पाण्यावर वाढलंय, आणि कसलं इंजेक्शन देऊन पिकवलंय, ते सांगता येणार नाही. लोक खरेदी करताहेत.. आस्वाद घेताहेत. अमेरिकन सॉफ्ट चॉकलेट्स गट्टम् करणाऱ्या लेकरांना गूळ- शेंगदाण्याची चिक्की खा असं म्हणणं म्हणजे हनीसिंग ऐकणाऱ्यांना दीनानाथ मंगेशकरांच्या गायनाची रेकॉर्डप्लेयर लावून दिल्यासारखं आहे.
व्हिक्टर द्रागुन्स्की नावाच्या लेखकाने छोटय़ांसाठी छान छोटय़ा छोटय़ा गोष्टी लिहिलेल्या आहेत. एका गोष्टीत नोकरी करणाऱ्या आई- वडिलांचा एकुलता एक मुलगा. घरी एकटाच असतो. त्याच्या हट्टामुळं आई त्याला महागडी मोटार घेऊन देते. ही मोटार बटने दाबताच घरभर पळते. तिचे दिवे लागतात. मुलाला ही मोटार खूप आवडते. एक दिवस घरात एकटाच मुलगा मोटारीसोबत खेळत असतो. तेवढय़ात शेजारी राहणारी त्याची छोटी मैत्रीण येते. दोघे खेळू लागतात. मैत्रिणीलाही ती मोटार खूप आवडते. मैत्रीण ती मोटार त्याच्याकडे मागते. तो छोटा मुलगा ‘मोटारीच्या बदल्यात काय देशील?’ असं विचारतो. ती मुलगी त्याला एक काडय़ाची पेटी दाखवते. त्या पेटीत बाभळीचा पाला असतो आणि तो पाला खाणारा एक सोनकीडा असतो. निळसर हिरवा, दोन काळ्या ठिपक्यांचे डोळे असणारा आणि सदैव मिशांसारखा अ‍ॅन्टेना हलवणारा तो कीडा मुलाला खूपच आवडतो. तो अदलाबदलीला तयार होतो. ती मोटार मैत्रिणीला देऊन तो कीडा घेतो. संध्याकाळी घरी आल्यावर आईला मोटार दिसत नाही. म्हणून ती विचारते, तर ती मोटार मैत्रिणीला देऊन त्या बदल्यात सोनकीडा घेतल्याचं तो सांगतो. एवढी महागडी मोटार दिली म्हणून आई रागावते.. ‘वेडायस का? एवढी महागडी मोटार देऊन हा कीडा घेतलास. एवढं काय आहे त्या किडय़ात?’ मुलगा उत्तर देतो, ‘आई, मोटार छान आहे, पण तिचं बटन दाबावं लागतं. हा कीडा मात्र जिवंत आहे. म्हणून मला आवडलाय!’
आपण सगळे अशा जिवंत वस्तूंच्या शोधात आहोत. भोवताली मात्र बटनस्टार्ट वस्तूंचा बाजार भरून गेलाय.

का गं तुझे डोळे ओले

एक प्रशस्त वाहता रस्ता. संध्याकाळची वेळ. रस्त्याच्या कडेला दोन मध्यवयीन स्त्रिया गप्पा मारीत उभ्या आहेत. एक पाय रस्त्यावर टेकवून बाईकवर बसलेली आहे ती बाईकवाली. एक बाईकच्या हॅंडलवर एक हात ठेवून उभी आहे. तिच्या दुसऱ्या हातात भाजीची पिशवी आहे. ती पिशवीवाली.
बाईकवाली : अगं, किती दिवसांनी भेटतेयस?
पिशवीवाली : हो न गं, कामेच संपत नाहीत. बघ ना, आतासुद्धा भाजी आणायलाच निघालेय.
बाईकवाली : एखादा फोन तरी करायचास. गेल्या वीकेंडला तुला मेसेज केला होता. पण तुझा साधा रिप्लायसुद्धा नाही. मस्त ऑफर होती..
पिशवीवाली : ऑफर! अय्या कसली?
बाईकवाली : अलगद रडू येण्यासाठी दु:खी पुस्तकं मिळणार होती. शिवाय डोळे बसायला टिश्यू पेपर व मेकअप साहित्य.. मोफत.
पिशवीवाली : सॉरी बरं का.. कामात अख्खा दिवस निघून जातो. दुपारी थोडी पाठ टेकवावी म्हटलं तर दहा मिनिटंसुद्धा वेळ मिळत नाही. तू रेग्युलर जातेस ना?
बाईकवाली : बऱ्यापैकी रेग्युलर आहे. ही काय तिकडूनच येतीय. आज भरपूर रियाज केला. हलकं हलकं वाटतंय.
पिशवीवाली : किती वेळ रडलीस आज?
बाईकवाली : आज चांगली तासभर रडले.
पिशवीवाली : एवढं रडूनही डोळे सुजलेले नाहीत.. उलट फ्रेश वाटतायत.
बाईकवाली : आता मी काही शिकाऊ उमेदवार नाहीये. क्राइंग रूमची पर्मनंट मेंबर झालीय.
पिशवीवाली : मीही ठरवतेय नियमित यायचं आणि जमेल तेवढं रडायचं. पण घरचं रडगाणं संपेचना.. म्हणून रडायला यायला वेळ मिळेना.
बाईकवाली : वेळ काढावा लागतो गं. या दोन दिवसांत वार्षिक सभासद झालीस तर ‘आईज् मास्क’ आणि मदतनीस मोफत मिळणार आहे.
पिशवीवाली : ओके डन्. मी उद्याच येते. खूप दिवसांत रडलेच नाही गं. प्लीज- उद्या निघताना मिसकॉल दे ना.
बाईकवाली : माझ्या मिसकॉलचा मिस्ड कॉल होऊ देऊ नकोस.
पिशवीवाली : नाही गं. उद्या नक्की भेटूया आणि मनसोक्त रडूया. चल पळते. मला अजून मुलीला क्लासवरून आणायचंय. बाय.
बाईकवाली : बाय.. सी यू.. भेटूया.. रडूया.
बाईकवाली बाईक सुरू करते. मैत्रिणीला एक स्माइल देऊन निघून जाते. पिशवीवाली पिशवी सावरीत उद्याच्या रडण्याचा निश्चय पक्का करीत चालू लागते.
आळेकरी एकांकिकेत किंवा श्याम मनोहरांच्या कादंबरीत शोभेल असा हा प्रसंग आहे. प्रसंग काल्पनिक असला तरी त्यातील ‘क्राइंग रूम’ काल्पनिक नाहीये, किंवा एखाद्या लेखकाला सुचलेली ही भन्नाट कल्पनाही नाही. जपानमध्ये एका हॉटेलात अशा प्रकारची ‘क्राइंग रूम’ सुरू झालेली आहे. जपानमधील महिलांना रडून मन मोकळं करण्यासाठी ‘द मित्सूई गार्डन योत्सूया’ या हॉटेलमध्ये क्राइंग रूमची व्यवस्था करण्यात आली आहे. महिलांना नैराश्य आल्यानंतर मन मोकळं करण्यासाठी जागेची आवश्यकता असते. या रूममध्ये महिलांना मनसोक्त रडता येईल. त्यांना मेकअप् साहित्य, टिश्यू पेपरसारखं साहित्य पुरवलं जाणार आहे. शिवाय महिलांना रडू कोसळण्यासाठी दु:खी पुस्तकंही देण्यात येतील. या पुस्तकांच्या वाचनाने आपोआप डोळ्यात अश्रू येऊ लागतील. खास व्यवस्था म्हणून महिलांना ‘आईज् मास्क’ आणि मदतनीस देण्यात येतील. अर्थात् त्यासाठी महिलांना पैसे मोजावे लागतील. पण त्या बदल्यात मन मोकळं करण्याचा आनंद इथं खात्रीलायक मिळेल असा हॉटेल व्यवस्थापकाचा दावा आहे.
ही क्राइंग रूमची कल्पना थोडी मजेशीर वाटली तरी अगदीच नवीन नाही. खेडय़ांत पाणवठय़ावर गेलेल्या बायकांना परत यायला उशीर व्हायचा. ‘हंडाभर पाणी आणायला एवढा वेळ लागतो का गं?’ असा जाब सुनेला विचारणारी सासू घरात असली, तरी सासूलाही उशीर होण्याचं खरं कारण माहीत असे. कारण सासूही सून असताना पाणवठय़ावर सुखदु:खाचं बोलत बसलेली असते. बायकांनी विहिरीत सोडलेले पोहरे दगडी भिंतीला लागून वाजतात, फुटतात, गळतात. ते दु:खाचं वाजणं, मनाचं फुटणं आणि डोळ्यांचं गळणं असतं. पाणवठय़ावर बायका मन मोकळं करतात.
एका छोटय़ाशा गावात आमच्या एका कार्यकर्त्यां मित्रानं मोठय़ा परिश्रमानं काही गोष्टी घडवून आणल्या. रस्त्याची कामं, नळपाणी योजना, बॅंक योजना याबरोबरच हागंदारीमुक्त गाव योजनेचाही त्याने पाठपुरावा केला. विशेषत्वाने बायकांसाठी संडास बांधण्याकरता कलेक्टर ऑफिसात पाठपुरावा केला. सामाजिक क्षेत्रात या मित्राचा चांगला दबदबा होता. तो त्याच्या कामातून निर्माण झालेला होता. योजनेला मंजुरी घेऊन गावात बायकांसाठी संडास बांधले गेले. धूमधडाक्यात या योजनेचं उद्घाटन झालं. स्वत: जिल्हाधिकारी कार्यक्रमाला उपस्थित राहिले. गावात लावलेल्या पताका वाऱ्याबरोबर फडफडल्या. पेढे वाटले गेले. पेपरांत बातम्या झळकल्या. बातमीतल्या फोटोत कार्यकर्ता मित्र कोपऱ्यात अर्धवट दिसत होता. राजकीय नेते मात्र ठळक होते. अर्थात् या कार्यकर्ता मित्राचा ‘मरावे परी फोटोरूपी उरावे’ असा विचार कधीच नव्हता. उलट, उघडय़ावर विधीला जाणाऱ्या गावातल्या बायका आता संडासचा वापर करणार याचं त्याला जास्त समाधान होतं.
उद्घाटनाला शहरातून आलेल्या गाडय़ा धूळ उडवीत वापस गेल्या. गावाचं रहाटगाडगं सुरू झालं. सुरुवातीला एक-दोन दिवस काही बायकांनी नव्या बांधलेल्या संडासचा उपयोग केला. पण नंतर मात्र त्या संडासकडं एकही बाई फिरकेना. ही बातमी कार्यकर्त्यां मित्राच्या कानावर गेली. मित्र गावात येऊन धडकला. तरी समाधानकारक उत्तर मिळालं नाही. गावातल्या पुरुषांशी चर्चा केली. फक्त ‘तिकडं नको’ एवढंच बायका बोलतात, बाकी काही सांगत नाहीत, अशी माहिती मिळाली. बायकांशी बोलायचा तर प्रश्नच नव्हता. म्हणजे समाधानकारक कारण कळालं नाही. तोडगा निघाला नाही. एवढा पाठपुरावा करून बांधलेले संडास वापराविना पडलेले. महिन्याभरात एका संडासाचं दार काढून कोणीतरी नेलं. नळाच्या तोटय़ा पळवण्याचा प्रयत्न झाला. पण गावातल्या बायका मात्र तिकडं फिरकल्या नाहीत. नेमकं काय घडलं? निवडलेल्या जागेबद्दल काही वदंता असाव्यात. खेडय़ात एखाद्या जागेत भुताटकी आहे म्हणून चर्चा होते आणि ती जागा किंवा तो वाडा ओस पडतो. कदाचित बांधलेल्या संडासबद्दल असे काही गैरसमज असावेत. बायकांना घरातून विरोध झाला असेल. अनेक शक्यता, अनेक प्रश्न निर्माण झाले. या प्रश्नांची खरी उत्तरं गावातल्या बायकाच देऊ शकत होत्या. पण बायका तर पदरामागं चेहरा लपवून गप्प! शेवटी मित्राने शहरातून दोन महिला कार्यकर्त्यां सोबत आणल्या. या महिला कार्यकर्त्यां घरोघर जाऊन बायकांशी बोलल्या. बायकाही मोकळेपणाने त्यांच्याशी बोलल्या. संडास न वापरण्याचं कारण उजागर झालं. मोकळ्या जागेची सवय असलेल्या या बायकांना बंदिस्त संडासमध्ये प्रशस्त वाटेना, हे एक कारण आपण समजू शकतो. याशिवायची बायकांची तक्रार मोठी धक्का देणारी होती. दिवस-रात्र शेतात, घरात निमूट राबणाऱ्या या बायकांना मन मोकळं करण्यासाठी दुसरी जागाच नाही, म्हणून मोकळ्या जागेवर विधीसाठी गेल्यावर एकमेकींशी बोलून त्या मोकळ्या होत. या बंदिस्त संडासमध्ये ते शक्य नव्हतं. या कारणानं हक्काची मोकळी जागा सोडून बायका संडास वापरायला तयार नव्हत्या. विधीला गेल्यावर एकमेकांशी सुखदु:खाचं बोलणं म्हणजे मन हलकं करणंच आहे. एखादी बोचणारी सल सांगताना एखादीचे डोळे भरून येत असतील. अशावेळी हक्काचा टिश्यू पेपर म्हणजे ती पदर डोळ्याला लावते. डोळे भरून येण्यासाठी तिला कुठलंही दु:खी पुस्तक वाचण्याची गरज नाही. तिला तिचं रडगाणं पुरेसं आहे. ही मोकळी जागा ‘क्राइंग रूम’च्या धर्तीवर मोठीच ‘क्राइंग स्पेस’ आहे.
अग्निशामक दलाची गाडी नेहमी तयारच असते, तसे बाईचे डोळे पुरुषाच्या तुलनेत केव्हाही भरून येऊ शकतात. येतात. शाळेतही काही मुलींना सरच घाबरून असायचे. रागवायचे नाहीत. कारण या मुली कुणी रागावलं, काही बोललं, की रडून रडून लालबुंद व्हायच्या. रेल्वे स्टेशन, बसस्टँडवर रेल्वे/ बस हलताना निरोप द्यायला आलेल्या कित्येक बायकांचे डोळे आजही भरून येताना दिसतात. पुरुषांच्या बाबतीत रडणं हे कमीपणाचं मानलं गेलेलं आहे. पुरुषानं धीरोदात्त असलं पाहिजे, हा संदेश पुरुषाच्या अश्रू निर्माण करणाऱ्या ग्रंथीनंही स्वीकारलेला असावा. म्हणून पुरुषानं कुढलेलं चालतं, पण रडता कामा नये. जगप्रसिद्ध शोकांतिकेतला राजा इडिपस दु:खानं वेडापिसा होतो. शेवटी स्वत:चे डोळे फोडून घेतो. पण रडत नाही. म्हणूनच आरती प्रभू दोन डोळ्यांना दोन खाचा म्हणतात. त्यामुळं आसवांचा प्रश्नच उरत नाही. याउलट, बाईचे डोळे सतत पाझरणाऱ्या खडकासारखे आहेत. हा खडक कुठल्या तप्त लाव्हारसात भाजला गेलाय, ते माहीत नाही.
रागाच्या भरात स्वत:च्या लेकराला आई मारते आणि क्षणात त्याच लेकराला छातीशी घट्ट धरून स्वत:च रडायला लागते. याउलट, काही मुक्या डोळ्यांतला गलबला आकांतापेक्षाही जीवघेणा असतो. काही डोळ्यांत दु:खाची अडगळ झाकून ठेवण्यासाठी हसू टांगलेलं असतं. एकूण काय, तर या ‘क्राइंग रूम’ची व्याप्ती फार मोठी आणि आदिम आहे. जपानमधील हॉटेलात सुरू झालेल्या क्राइंग रूममध्ये लावण्यासाठी अरुण कोलटकरांची एक कविता पाठविण्याचा मी विचार करतोय. ती कविता-
कोणीतरी रडतंय मगापासून
कोणीतरी रडत होतं रात्रभर
कोणीतरी रडत बसलंय
युगानुयुगं
तूच का गं
पण तू का रडते आहेस अशी
अविरत
रडायला काय झालं तुला
कोण म्हणालं का काही
कुणी मारलं का
कुठं दुखतंय तुला
खुपतंय का कुठं काही
तू का रडते आहेस
एकटीच
इथं या अरण्यात बसून
की तूच हे अरण्य आहेस
रडणारं.

श्वानपुराण

त्या दिवशी रात्री झोपताना मोबाइल ‘सायलेंट’ करायचा विसरलो आणि नेमका सकाळी साडेचार वाजता मोबाइल वाजला. मेसेज आलेला होता. झोप मोडलेलीच होती. मेसेज पाहू लागलो. 
या साखरझोपेच्या वेळी आलेल्या मेसेजबद्दल उत्सुकता वाढली. एखाद् वेळी रात्री पाठवलेला मेसेज उशिराने थकूनभागून पहाटे येऊ शकतो, किंवा एखादा उत्साही महाभाग एवढय़ा सकाळी ‘सुप्रभात/ Good Morning’ असा मेसेजही पाठवू शकतो. पण मेसेज वेगळाच आणि धक्कादायक होता. कुत्रा चावल्यामुळं सरकारी दवाखान्यात गावाकडच्या मित्राचा मृत्यू झालेला होता. अवघा दोन वर्षांचा संसार नि एक वर्षांची मुलगी मागे टाकून निघून जाण्याचं हे वय नव्हतं. झोप मोडलीच नाही तर उडाली होती. सकाळी सहा वाजता बातमीचे तपशील कळले. दहा-अकरा वर्षांनी लहान असलेल्या या मित्राला निदान शेवटचं ‘बाय’ करायला दवाखान्यात जावं असं ठरवत होतो. खरं तर लहानपणी या मित्राला कडेवर घेऊन मी खेळलेलो होतो. शिवाय त्याचे वडील आमच्या अध्र्या गावाचे डॉक्टर. या डॉक्टरांनी अनेकांच्या प्रकृतीची काळजी घेतलेली. छोटय़ाशा गावात या डॉक्टरांचाच आधार. आणि आज या डॉक्टरांचाच मुलगा रॅबिजमुळं गेलेला. शेवटची भेट घेण्याचा प्रयत्न यशस्वी झाला नाही. कारण भल्या पहाटेच प्रेत घेऊन लोक गावाकडं गेले होते. रात्री घरासमोरच्या अंधारात मित्राच्या पायात कुत्र्याचं पिल्लू आलं. त्या पिल्लाच्या अंगावर पाय पडल्यामुळं ते केकाटत पळून गेलं. मित्रानं सकाळी पाहिलं तर पायावर ओरखडा उमटलेला होता. नख किंवा दात लागलेला असावा. खबरदारी म्हणून गावातल्या सरकारी दवाखान्यात इंजेक्शन घेण्याकरिता मित्र गेलाही; पण नेमकं रॅबिजचं इंजेक्शन उपलब्ध नव्हतं. डॉक्टरांनी जिल्हा रुग्णालयात जायला सांगितलं. ‘पिल्लू तर होतं..!’ म्हणून मित्रानं कंटाळा केला. नेमका रॅबिजचा प्रादुर्भाव उद्भवला. परिस्थिती फारच हाताबाहेर गेली तेव्हा दोन जिल्हे ओलांडून इथं औरंगाबादला आणला. घाटी रुग्णालयात दाखल केलं. प्रचंड ओरडायचा. हात-पाय बांधावे लागले होते. पण रात्री उशिरा सर्व काही शांऽऽऽत झालं. सर्व इलाज उपलब्ध असतानाही या काळात कुत्रा चावल्यामुळं तरणा पोरगा असा जावा, याची संगती लावता येईना.
एक काळ होता- यावर दवाखाने, उपचार उपलब्ध नव्हते. कुत्रे तर चावायचेच. अशावेळी गावठी इलाज करण्याशिवाय पर्याय नव्हता. आंध्राच्या सीमेवर असणारं कुंडलवाडी हे गाव या औषधाकरिता प्रसिद्ध होतं. तिथं एकजण नि:स्वार्थ हेतूनं हे औषध द्यायचा. लहानपणी एकदा दह्यासोबत हे औषध घेतल्याचं मला आठवतंय. दूरदूरच्या गावांवरून लोक यायचे. लोकांना गुणही यायचा. मोकाट कुत्र्यांनी कित्येकांच्या पिंढऱ्या, ढोपरं फोडलेले आठवू लागले. श्वानपुराण डोक्यात घुमू लागलं. मुळात कुत्रा चावण्याची भीती करण्याचं कारण म्हणजे चौदा इंजेक्शनची दहशत. साधं इंजेक्शन म्हटलं तरी मोठी माणसंसुद्धा घाबरून जायची. कुत्रा चावल्यावर तर तेव्हा चौदा इंजेक्शन्स, तीही बेंबीच्या भोवती घ्यावी लागायची. या रॅबिजबद्दल अनेकदा चर्चा चघळल्या जायच्या. पिसाळलेला कुत्रा चावलेला माणूस कुत्र्यासारखा भुंकायला लागतो, हा माणूस दुसऱ्या माणसाला चावला तर तो माणूस मरतो, कुत्रा चावल्यानंतर दहा वर्षांत कधीही रॅबिज उद्भवू शकतो, अशी माहिती भोवताली भिरभिरत असे.
एकदा रात्री एक- दीड वाजता गलका झाला- म्हणजे कुत्री भुंकू लागली. आरडाओरडा झाला. गाढ झोपलेली गल्ली जागी झाली. तेवढय़ा रात्री लोक डोळे चोळत गणपतीच्या पाराजवळ गोळा झाले. आम्ही छोटी मुलंही हजर होतो. शेजारच्या खेडय़ातून बैलगाडीत घालून एका माणसाला रातोरात आणलेलं होतं. एरवीही पाराजवळच्या दवाखान्यात बैलगाडीतून पेशंट यायचे. पण यावेळी पेशंटला दोरीनं बांधलेलं होतं. तरीही तो बांधलेला माणूस हातपाय झाडत होता. विचित्र ओरडत होता. त्याच्या घशात काहीतरी अडकल्यासारखं वाटत होतं. त्या माणसाला पिसाळलेला कुत्रा चावलेला होता. त्या रात्रीपासून कुत्र्याबद्दलची दहशत मनात बसली. पुढं याच विषयावरची सरदार जाधव यांची ‘दात’ नावाची अप्रतिम कादंबरी वाचनात आली. या कादंबरीत कुत्रा चावलेल्या माणसाला गाव एका वाडय़ात कोंडून ठेवतं. घरचे लोकही त्या रॅबिज झालेल्या व्यक्तीजवळ जाऊ शकत नाहीत. एखाद्या पिसाळलेल्या रानटी प्राण्यासारखा पाय खोरून त्याचा एकाकी अंत होतो. गावात पाहिलेली व अंगावर काटा आणणारी दृश्ये या कादंबरीत आहेत.
प्रत्यक्ष नाही, पण डिस्कव्हरी चॅनलवर शिकार करताना रानटी कुत्र्यांना आपण पाहिलेलं असतं. त्यांची हिंस्रता पाहताना आपण टरकलेलो असतो. यातली काही रानटी कुत्री माणसाच्या वस्तीत येऊन माणसाळली. प्रसंगानुरूप वागू लागली. कधी शेपूट हलवत लाडात यायचं आणि कधी सुळे, दात दाखवत फोडून काढायचं, याचं गणित त्यांनी अवगत केलं. बऱ्याचदा डुकराच्या पिलाला चार-पाच कुत्री खिंडीत गाठतात. पाठलाग करून चहूबाजूनी हल्ला चढवतात. शेवटी त्या डुकराला फाडून काढतात. डुक्कर जिवाच्या आकांतानं चीत्कारत असतं. अर्थात सगळेच कुत्रे असे फाडू नसतात. काही कुत्री साजूक तुपात भिजवलेल्या फुलवातीसारखी नाजूक असतात. जणू तोडणीचा स्वच्छ-शुभ्र कापूस घरभर तुरतुरत असतो. स्वत:च्या भुंकण्याला स्वत:च घाबरणारी ही कुत्री संरक्षणासाठी नसतातच मुळी. खेळण्यांसारखे असतात बिचारे. पण मोकाट कुत्र्याचं हिंस्र रूप ज्यानं पाहिलंय त्याला कुत्रा सुरक्षित अंतरावरच बरा वाटतो. बऱ्याचदा मोठी गंमत होते. आपण एखाद्या घरी जातो. बेल वाजवतो. दार उघडलं जातं, आणि भला थोराड कुत्रा अंगलट यायला लागतो. आपण त्या कुत्र्याला बघूनच टरकलेलो असतो. त्यात भर म्हणजे तो विचित्र कुत्रा आपल्या छातीवर चक्क त्याचे समोरचे पाय ठेवतो. तेव्हा तर छातीतले ठोके शाळेच्या घंटेसारखे ऐकू यायला लागतात. अशावेळी घरमालक मात्र ‘काही करीत नाही. त्याचा खेळच आहे तो!’ असं सहजपणे सांगत असतात. ल्ह्या-ल्ह्या करणारी जीभ आणि तीक्ष्ण सुळे व दात दाखवत छातीवर पंजे ठेवून उभ्या असणाऱ्या त्या कुत्र्याचा खेळ जीवघेणाच आहे. एखाद्या दहशतवाद्यानं आपल्या कानशिलात पिस्तूल लावलीय, आपल्याला दरदरून घाम फुटलाय आणि कुणीतरी समजूत घालतंय- ‘घाबरू नको, गंमत करतोय तो. शिवाय त्यानं गांधींचं साहित्य वाचलेलं आहे..’ असा तो प्रकार आहे. कसेतरी आपण सोफ्यावर टेकतो, तर घरमालक व घरमालकीण श्वानस्तुती आळवत असतात. संगोपनाचं कौतुक ठीक आहे, पण अशा घाबरवेळी, त्या कुत्र्यानं कडाडून चावा घेतल्यावर आतल्या हाडाचाही तुकडा पडतो, हे सांगण्याची गरज नसते. पण ते बोलत असतात. घरमालकीण माहिती पुरवतात- ‘एखाद् वेळी सुरेश रैनाकडून कॅच सुटेल, पण आमचा कुत्रा कसंही फेकलेलं टोमॅटो झेलणारच. त्याला लाल टोमॅटो खूप आवडतात.’ अजून बरंच काही! हे ऐकून वाटतं, घराच्या दारात स्टेनगनधारी रक्षक ठेवण्याऐवजी ‘सावधान.. कुत्रा मोकळाच आहे!’ अशी गेटवर पाटी लावली तरी काम चालू शकतं.
कथा-कादंबऱ्यांतून, चित्रपटांतून ‘टिप्या’, ‘मोती’ यांचं खूपच रसभरीत चित्रण आलेलं आहे. त्यातली अतिशयोक्ती सोडली तर श्वानपथकातील कुत्र्यांची कामगिरी थोरच आहे. आपल्याकडे कुत्र्याच्या इमानदारीवर रचल्या गेलेल्या कहाण्यांना नाटय़-दिग्दर्शक कमलाकर सारंगांनी कलाटणी दिलेली आहे. कोकणातलं बालपण सांगताना सारंग त्यांच्या वफादार कुत्र्याबद्दल सांगतात. हा कुत्रा त्यांच्या घरात वाढलेला. छोटय़ा सारंगांच्या मागे सावलीसारखा राहणारा. सारंगांनाही त्याचा खूप लळा. पुढील शिक्षणासाठी छोटय़ा सारंगांना कोकणातलं गाव सोडून मुंबईला जायचं असतं. त्या आवडत्या कुत्र्याला सोडून जायची कल्पनाच सारंगांना सहन होईना. आपल्या माघारी याचं काय होईल? कसा राहील तो? या चिंतेनं सारंग परेशान. शेवटी जाण्याचा दिवस उजाडतो. छोटय़ा सारंगांना सोडायला सारं घर समुद्रावर जमलेलं. सोबत कुत्राही. कुत्रा सारंगांना सोडतच नाहीये. जणू पुढचा विरह त्याला कळलाय. जड पावलांनी आणि भरल्या डोळ्यांनी छोटे सारंग बोटीवर चढतात. काठापर्यंत येऊन कुत्रा स्तब्ध उभा. मालकाकडं पाहतोय. बोट हलते. घरची मंडळी वापस घराकडं निघतात. कुत्रा उभाच. छोटय़ा सारंगांचं लक्षही कुत्र्याकडंच. बोट हळूहळू आत सरकतेय. किनारा लांब जातोय. कुत्रा जागचा हलतो आणि शेजारी जेवण करीत बसलेल्या माणसाजवळ जाऊन शेपूट हलवायला लागतो. सारंग हे दृश्य लांबून पाहतात. पुढच्या प्रवासासाठी निश्चिंत होतात. खरंच आहे. जिवंत राहण्यासाठी कुत्र्याला कुणासमोर तरी शेपूट हलवावी लागेल, किंवा हिंस्र होऊन जनावरं फाडावी लागतील. जगण्यापुढं शेवटी वफादारीही लोळण घेते.
कुणालातरी आपल्या आज्ञेत ठेवणं माणसांना मुळातच आवडतं. लहान मूलसुद्धा चार-पाच वर्षांचं होईपर्यंत सर्वाना निरागस, गोंडस वाटत असतं. नंतर मात्र ते मूल स्वतंत्र विचार करायला लागतं. म्हणजे आपली प्रत्येक गोष्ट ऐकत नाही. मग तिथं संगोपन आणि संस्कारांचा अध्याय सुरू होतो. आंधळं अनुकरण संपतं. त्याबरोबर गोंडसपणा, निरागसता संपते. मग ताणतणावाला सुरुवात होते. त्यामानाने कुत्रा आज्ञाधारकपणे वागत असतो. ‘छूऽऽ’ म्हटलं की पळतो. ‘यूऽऽ’ म्हटलं की येतो. एरवी कुणीच आपलं ऐकत नसताना कुत्रा मात्र आपलं ऐकतो. स्वत:ची मतं व्यक्त न करता ‘कंपनी’ देतो. वाटलं तर जवळ घ्या, नाही तर साखळीनं जखडून ठेवा- त्याचं काही म्हणणं नसतं. (म्हणजे त्याला काही म्हणताच येत नाही. म्हणता आलं असतं तर मोठी पंचाईत झाली असती.) त्यानं लाडात यायचं की नाही, ते तुम्ही ठरवणार. तुम्ही ‘चूप’ म्हटलं की तो बिचारा शांत बसणार. या बदल्यात माणसंही त्याला अफाट सुखसोयी देतात. काही वेळा तर माणसापेक्षा त्याचा थाट जास्त असतो. कारणं काहीही असोत; काहीजणांना कुत्र्याची संगत आवडते.
काही वर्षांपूर्वीची घटना. भाडय़ाच्याच, पण ऐसपैस घरात राहत होतो. आमच्या शेजारचा प्लॉट रिकामा होता. तिथं पावसाचं पाणी साचून उंच गवत वाढलं होतं. मागच्या कोपऱ्यात बांधकामाचा राडारोडा आणून टाकलेला. त्याचा एक छोटा ढीग तयार झालेला होता. त्या ढिगाच्या आडोशाला एक कुत्री व्याली. डोळे न उघडलेल्या पिलांची कुईकुई सुरू झाली. कुत्री तिकडं कुणाला फिरकू देईना. कुणी तिकडं डोकावण्याचा प्रयत्न केला तर ती भुंकत अंगावर यायची. एकदा कुत्री नसताना मुद्दाम तिकडं जाऊन मी पिल्लं पाहिली. चांगली मांसल अशी वळवळणारी सहा पिल्लं होती. मधे काही दिवस गेले. पिल्लांचा आवाज वाढलेला होता. पिलांच्या मस्तीमुळं गवताच्या तळाशी हालचाल वाढली. एक दिवस तर चार पिल्लं रस्त्यावरच आली. नंतर कॉलनीत ही पिल्लं तुरुतुरु पळू लागली. लहान मुलं पिलांच्या शेपटय़ा धरून ओढायचे. मग जोरात केकाटण्याचा आवाज घुमायचा. घरोघरचे पोळी-भाकरीचे तुकडे खाऊन पिल्लं चांगलीच गुरगुरू लागली. एक दिवस मोटारसायकलखाली येऊन एक पिल्लू गतप्राण झालं. त्याची पोटातली छोटीशी आतडीच बाहेर आली होती. उरलेल्या पाच पिलांपैकी दोन पिल्लं लोकांनी पाळायला नेली. कारण ती नर होती. एक पिल्लू गायब झालं. शेवटी उरलेली दोन पिल्लं मात्र कॉलनीत फिरत राहायची. कॉलनीतल्या मंदिरासमोर उडणारे कागदाचे तुकडे तोंडात धरून पळण्याचा खेळ रंगात येई. पिल्लांच्या आईनं या पिल्लांकडं पूर्णत: दुर्लक्ष केलेलं होतं. दोन्ही पिल्लं स्वत:च्या हिमतीवर जगत होती. नको तिथे घुसायची. त्यामुळं फटका बसायचा. मग ‘क्याऽऽ क्याऽऽ’ केकाटण्याचा आवाज घुमायचा. बऱ्याचदा नालीतल्या पाण्यानं त्यांचं अंग बरबटलेलं असे. रस्त्यावरून जाणाऱ्या गाडय़ांमागं लागण्याचा धोकादायक खेळही त्यांनी सुरू केला होता.
हिवाळय़ाचे दिवस. दुपारी घराचं मागचं दार मी उघडलं. प्रकाश आणि थंड वाऱ्यासोबत ही दोन पिल्लं सरळ घरात घुसली. एक कुबट वास त्यांच्याबरोबर आत आला ‘हाऽऽड हाऽऽड’ म्हणेपर्यंत पार बेडरूमपर्यंत त्यांनी पल्ला गाठला. त्यांच्या मागंच पळालो. खोल्यांमधून पाठलाग सुरू झाला. पिल्लं चपळ होती. भुसकन् कुठंही घुसायची. हाती लागत नव्हती. तरी मोठय़ा कसरतीनं एकाच्या मानगुटीला धरलं आणि सरळ बाहेरचा रस्ता दाखवला. आत येऊन शोधतोय तर दुसरं गायब. पुन्हा सगळय़ा खोल्या शोधल्या. महाशय हॉलमध्ये दिवाणाखाली अंग आकसून बसले होते. बाहेर काही येईनात. शेवटी काठीनं डिवचून बाहेर काढलं. जोरजोरात ओरडत होतं. धरून बाहेर नेऊन सोडलं. चांगलंच थकवलं होतं त्यांनी. कुबट वास डोक्यात बसला होता. स्वच्छ हात-पाय धुतले. खिडकीतून त्यांच्या जागेकडे दोन पोळ्या भिरकावल्या. पंखा लावला. खुर्चीत येऊन बसलो. समोरच्या टेबलवर पॅडला लावून ठेवलेली कोरी कागदं होती. त्या पांढऱ्याशुभ्र कागदावर पिल्लांच्या छोटय़ा पावलांचे ठसे उमटलेले होते. ठसे चिखलाच्या पायांचे असले तरी होते मोठे मोहक. नंतर लक्ष गेलं तर टेबलावर, गादीवर आणि फरशीवरही छोटे पायठसे उमटलेले होते- घरभर.

खडूची भुकटी

त्यादिवशी या गोष्टीतल्या शाळेसमोरची पितळी घंटा पोरं बडवतात. घंटेचा घणघणाट गावभर होतो. पण खेळात रमलेल्या दिनूला ही घंटा ऐकूच येत नाही. शेवटी आईने आठवण करून दिल्यावर दिनू जड पावलांनी शाळेत निघतो. चौकात आल्यावर दिनू दोन बोटं तोंडात घालून शिट्टी वाजवतो. मित्र गोळा होतात. गंमतम्हणजे या पोरांपैकी कुणीच गुरुजींनी दिलेला गणिताचा गृहपाठ पूर्ण केलेला नसतो. गणिताच्या मास्तराचा राग परवडणारा नाही म्हणून पोरं शाळेला ठेंगा दाखवतात आणि निघतात ओढय़ाकडं. हिरव्यागार दाट झाडीतून खळाळणारा पांढराशुभ्र ओढा! पोरं वाळूत हुंदडतात. खेळताना अडचणीची ठरणारी पुस्तकं-पाटय़ा वाळूत पुरून ठेवतात. मग सुरू होतो- सूर्यप्रकाशात चमकणाऱ्या पाण्यात मासे पकडण्याचा खेळ. मासेच ते; लवकर सापडत नाहीत. झडप घालून ओंजळीत मासे पकडण्याचा खेळ खूप वेळ सुरू राहतो. डोकरा, काळ्या पाठीचा छोटा मिशावाला झिंगा.. अशा माशांचा परिचय दिनूला सोबतच्या आबास, हामजा या मित्रांमुळं होतो. शेवाळाखाली लपण्याची माशांची जागा कळते. मासे स्वच्छ कसे करायचे, भाजायचे कसे, आणि चटणी-मीठ लावून गट्टम कसे करायचे, हे ऐकून दिनूच्या तोंडाला पाणी सुटतं.
या खेळाचा कंटाळा आल्यावर पोरं घुसतात काटेबनात. तिथं बोराटीच्या झाडावरची व्हल्याची अंडी मिळवतात. व्हल्याच्या व रानचिमणीच्या अंडय़ातला फरक दिनूला लक्षात येतो. व्हल्या-पारव्याची अंडी शोधताना, खारीमागं धावताना पोरं रमून जातात. बाभळीचा डिंक गोळा करतात. हा गोळा केलेला डिंक दुकानदाराला विकण्याचं ठरतं. त्या आलेल्या पैशातून जत्रेत शिट्टी, रेवडय़ा घेण्याचा बेत आखला जातो. त्यातच दिनूला देवबाभळ व रामकाठी बाभळीची खासीयत ध्यानात येते. शिवाय त्या दिवशी जंगलात अनेक नवीन गोष्टी दिनू पाहतो. सुरेख पक्षी, पांढरे उंदीर, सोनकिडे, तांबडीलाल फळं, मधाची पोळी अशा कितीतरी गोष्टी दिनू अधाशासारखा पाहत जातो. यात नवी भर म्हणजे आबासच्या पायात काटा घुसतो. आबास ओरडायला लागतो. देवबाभळीच्या मोठय़ा काटय़ाने पायातला काटा काढण्याचा प्रयत्न यशस्वी होत नाही. शेवटी रुईचा चिक काटा मोडलेल्या ठिकाणी लावला जातो. आता तो काटा सकाळी आपोआप बाहेर पडणार असतो. पाहता पाहता संध्याकाळ होते. गुरं माघारी फिरतात. पोरंही पुरून ठेवलेली पाटी-पुस्तकं घेऊन घरी परततात. घरी परतलेला दिनू आईला अपेक्षित असणाऱ्या शाळेत गेलेलाच नसतो; तर त्याला मनापासून आवडलेल्या, खुल्या आभाळाखाली भरलेल्या शाळेतून परतलेला असतो. व्यंकटेश माडगूळकरांच्या ‘शाळा’ गोष्टीतील दिनूला न कंटाळता, न छडी खाता खूप ज्ञान सहज मिळालेलं होतं.
ही गोष्ट मी प्रथम पंधरा-सोळा वर्षांपूर्वी वाचली असेन. तेव्हाही या पोरांची जंगलातील भटकंती मला मोहक वाटली होती. त्याबरोबरच ज्या गणिताच्या मास्तरच्या भीतीमुळं या पोरांनी जंगलाचा रस्ता धरला होता, त्या मास्तराची दहशतही जाणवली होती. बेशरमीच्या फोकानं मारणारे माझे गणिताचे शिक्षक आठवले होते. शिकवण्याचा कुठलाही आविर्भाव न आणता शिकवणाऱ्या जंगलात सहज स्वाभाविकता आहे. अशी स्वाभाविकता आपल्या शिक्षणाला किती प्रमाणात पकडता आलीय? शाळा सुटल्यावर ‘हुय्याऽऽ’ करीत वर्गाबाहेर पडणारी पोरं पाहताना त्यांना आपण कोंडलं होतं की काय असं वाटतं. जुन्या काळातल्या मारकुटय़ा मास्तरांची गौरवानं केलेली वर्णनं मला कधीच आवडली नाहीत. काही मास्तरांच्या दहशतीमुळं त्यांचा विषयच नावडता झालेला असतो. यात गणित, इंग्रजीचा क्रमांक वरचा आहे. ‘छडी लागे छमछम, विद्या येई घमघम’ असल्या जुनाट म्हणी त्रासदायक जात्यासारख्या संग्रहालयात ठेवून द्यायला हव्यात.
हा विषय कालबाहय़ वाटणाऱ्यांच्या पुढय़ात एक ताजी घटना ठेवतो. तीनेक महिन्यांपूर्वी तेलंगणातील एका खासगी शाळेतील इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांनं वर्गात इंग्रजीतून संभाषण केलं नाही. तो विद्यार्थी त्याच्या मातृभाषेत- तेलुगुतच बोलत होता. याचा राग आल्यामुळं वर्गशिक्षिकेनं त्या कोवळ्या पोराला बदडून काढलं. चक्क त्याला चावा घेतला. त्याचं डोकं भिंतीवर आपटलं. हे सर्व सुरू असताना वर्गातील बाकी चिमुकल्या मुलांची काय अवस्था झाली असेल? त्या बिचाऱ्या पोराला शारीरिक-मानसिक आघात झाला. मेंदूला इजा झाली. रात्रीतून त्या विद्यार्थ्यांची तब्येत बिघडल्यामुळं हैदराबाद येथील हॉस्पिटलमध्ये त्याला अ‍ॅडमिट केलं; पण दुसऱ्या दिवशी पहिलीतलं ते कोवळं पोर त्या आघातानं मरण पावलं. या घटनेतून पुन्हा एकदा दहशतच उजागर होते. नव्या काळात मुलांना मारणं हा गुन्हाच आहे. तरीही मुलांना एवढं अमानुषपणे बदडलं जातं म्हणजे मारकुटय़ा पंतोजीचे अवशेष अजून शाबूत आहेत.
दप्तराचं ओझं, बेसुमार फीची चिंता, इंग्रजी भाषेत अवघडलेली पोरं, त्यांच्या भाषेचं झालेलं कडबोळं, दडपलेली कल्पनाशक्ती या सगळ्याचा विद्यार्थ्यांबरोबरच पालकांवरही आताशा ताण पडलेला असतो. पण मारकुटय़ा मास्तरांची परंपरा मात्र जुनी आहे. एका अज्ञात कवीनं ही मारकुटी दहशत नेमकेपणानं पूर्वीच शब्दांत पकडलेली आहे..
शाळेसी जाताना
रडे कशाचे रे आले
भय माऊली वाटले
पंतोजीचे
शाळेचा पंतोजी
त्याचा केवढा दरारा
मुलं कापती थरारा
थंडीवीण
पंतोजी पंतोजी
शाळा बाळाला आवडो
घरी ना दडो
तुमच्या धाके
अशा पंतोजींना साने गुरुजी नावाचे शिक्षक माहीत असतील काय? हातून झाडाची फांदी तुटली म्हणून प्रायश्चित्तापोटी दिवसभर उपाशी राहणारे, मुंगळ्यांची रांग जातेय म्हणून स्वत: स्तब्ध उभं राहणारे, मुलांसोबत स्वत: वसतिगृहात राहणारे, एवढंच काय- स्वत:चा पगार विद्यार्थ्यांच्या अडीअडचणीला वापरणाऱ्या साने गुरुजींची परंपरा का बरं क्षीण होत गेली असेल? अर्थात आजही काही अपवादात्मक चांगले शिक्षक-शिक्षिका आणि हाताच्या बोटावर मोजण्याएवढय़ा का होईना, पण चांगल्या शाळा आहेत. बाकी आज शिक्षणसंस्था काढण्यामागचा हेतूच बदललाय. पेट्रोल पंप, एखादी गॅस एजन्सी, सूतगिरणी, कारखाना तशी एखादी शिक्षणसंस्था! मग ज्ञानार्जनापेक्षा अर्थार्जन महत्त्वाचं ठरतं. शिक्षक, प्राध्यापक निवडीच्या वेळी ‘दक्षिणा’ निर्णायक ठरते. व्यावसायिक अभ्यासक्रमापासून ते बालवाडीपर्यंत प्रवेशासाठी राजरोस ‘दक्षिणा’ घेतली जाते. ‘दक्षिणे’ची परंपरा आजही वेगळ्या रूपात सुरू आहे. फक्त ‘दक्षिणा’ घेणारे हात बदललेत. ‘तोंडी पुरोगामित्व आणि हातात दक्षिणा’ अशी नवी रीत झाली आहे. याबद्दल सर्वत्र सामसूम आहे. कुणीच काही बोलत नाहीय.कुणाची शिक्षक- प्राध्यापक म्हणून निवड झाल्यावर त्याच्यासाठी पहिला प्रश्न असतो- ‘किती द्यावे लागले?’ भाषेत सुवर्णपदक मिळवणारा एक विद्यार्थी- ज्यानं चांगल्या गुणांसह बी. एड. पूर्ण केलंय- माध्यमिक शिक्षक म्हणून नुकताच रुजू झालाय. अर्थात रुजू होण्याचा- म्हणजे निवड होण्याचा आणि गुणवत्तेचा काहीही संबंध नाही. त्याने थोडी काही शेती विकून, स्वत:चं लग्न ठरवून, भावी सासऱ्याकडून काही रक्कम घेऊन संस्थाचालकाच्या दक्षिणेची भरती केली आणि बिच्चारा गुणवान पोरगा शिक्षक म्हणून रुजू झालाय. आता तो वर्गात ‘हिरवे हिरवे गार गालीचे, हरित तृणाच्या मखमलीचे’ कविता शिकवणार आहे. त्यानं दिलेला पेढा गोड नव्हता. नोकरी लागल्यावरही बऱ्याच राजकारणी संस्थाचालकांकडे शिक्षकांना ‘शिकवणे’ सोडून दुसरीच कामं करावी लागतात. हा शिक्षकाच्या ज्ञानाचा अपमान आहे. पण बोलणार कोण? अशा वातावरणात शिक्षकांकडून काय अपेक्षा ठेवणार? तरीही शिक्षकाने एखाद्या विद्यार्थ्यांला अमानुष मारण्याचं समर्थन करताच येत नाही. पण त्या शिक्षकाच्या हिंसक होण्यामागची कारणं मात्र शोधायला हवीत. त्या शिक्षिकेचा राग खरंच त्या विद्यार्थ्यांवर आहे की व्यवस्थेनं केलेल्या कुचंबणेवर आहे, हेही स्पष्ट व्हायला पाहिजे.
शाळेत असताना सरांनी मला एकदा फळा पुसायला सांगितला होता. शिक्षक- पुन्हा त्यात गणिताचे.. मग त्यांची आज्ञा शिरसावंद्यच. मोठे कडक आणि मारकुटे होते ते. दिवसभर शाळेत त्यांचा दरारा असे आणि रात्रीसुद्धा सरांना विश्रांती नव्हती. कारण रात्री आमच्यासारख्या गणित चुकणाऱ्या पोरांच्या स्वप्नात बेशरमीचा फोक घेऊन वटारलेल्या डोळ्यांनी ते उभे असत. गणितं तर हमखास चुकायचीच; पण सर समोर असताना आपला श्वासोच्छ्वासही चुकतोय अशी भावना व्हायची. सरांनी सांगितल्याबरोबर मी बेंचावरून उठून व्यवस्थित फळा पुसला. डस्टर जागेवर ठेवताना मी सहज सरांकडे पाहिलं. चष्म्याच्या वरतून सर माझ्याकडं पाहत होते. मी गडबडलो. डस्टर हातातून खाली पडलं. खडूची भुकटी उडाली. हवेत पांढरे कण तरंगू लागले. खिडकीतून आलेल्या प्रकाशाच्या पट्टय़ात ते पांढरे कण चमकत होते. ठसका लागला. त्यानंतर काही दिवसांनी रिवाजाप्रमाणे चुलीतला अंगारा लावून, चुलीच्या पाया पडून झोपलो तरी रात्री एक भयंकर स्वप्न पडलंच. स्वप्नातल्या वर्गात खडूची प्रचंड भुकटी उडत होती. भिंती, छत, बेंच, आम्ही सारी पोरं, सरांची खुर्ची, टेबल, टेबलावरची हजेरी, बेशरमीचा फोक, सर, सरांच्या मिशा.. सारं सारं खडूच्या भुकटीनं भरून गेलेलं होतं. नाका-तोंडात ते पांढरे कण गेल्यामुळं सगळ्यांनाच ठसका लागला होता. भुकटी मात्र वाढतच होती. श्वास घ्यायला खूप त्रास होत होता. घाबरून मी जागा झालो. चांगलाच घामाघूम झालेला होतो. तेव्हा वडीलही जागे झाले. ‘‘झाली का सुरू बडबड तुझी? चल ऊठ, मोरीवर जाऊन ये..’’ असं बोलून कूस बदलून ते झोपी गेले- एवढं आजही स्पष्ट आठवतंय. पण हे स्वप्न आत्ताच का आठवलं, हे मात्र लक्षात येत नाहीये.