Monday, 30 March 2015

कटिंग

सकाळची वेळ. वाडय़ाचं पुढचं आणि मागचं दार घट्ट लावून घेतलंय. वाडय़ातल्या खोल्यांतून, माडीवर शोध सुरू आहे. शोध घेणारी वाडय़ातलीच वडीलमाणसं आहेत. शोध कुणाचा घेतला जातोय? तर या वाडय़ातलाच एक १२-१३ वर्षांचा मुलगा आहे. घडलंय काय एवढं भयंकर? तर विशेष असं काही नाही. थोडय़ाफार फरकानं दर महिन्याला हा प्रसंग या वाडय़ात घडतो. म्हणजे हजामत करणारे कोंडबामामा स्वत:ची धोकटी सावरत वाडय़ात प्रवेश करतात आणि गब्बरसिंगवाल्या माणसांच्या चाहुलीनं गाववाल्यांचा थरकाप उडावा तशी वाडय़ातल्या लहान पोरांची लपालप सुरू होते. पण धान्याच्या कणगीमागे लपलेलं किंवा देवघरातल्या कोपऱ्यात समईच्या मंद प्रकाशात अंधूक झालेलं किंवा जिन्याखालच्या अंधारात दडलेलं किंवा परसातल्या कडब्याच्या आडोशाला लपून बसलेलं पोर, मोठी माणसं एखादा उंदीर धरून आणावा तसं आणून कोंडबामामाच्या पुढय़ात सहज हजर करीत. पोराची प्रचंड आरडाओरड, रडारड, हातपाय झाडणं, अंग टाकून देणं सुरू असे. ही धरपकड सुरू असताना वाडय़ाची दोन्ही दारं बंद करण्याची प्रथा पडली. त्यालाही एक कारण आहे. एकदा कोंडबामामाच्या चाहुलीनं हे पोर उघडय़ा दारातून चक्क पसार झालं. नुस्तं पसार झालं नाही, तर थेट पोचलं वेशीजवळच्या कोंडबामामाच्या घरासमोर. रागापोटी कोंडबामामाच्या घरावर दगड भिरकावले. पत्र्यावर दगड पडतायत म्हणून कोंडबामामाची बायको ओरडत सुटली. तिला हा भुताटकीचा प्रकार वाटला. या भुताटकीच्या मागे असणारं पोर नंतर वाडय़ातच दार लावून कोंडलं जाऊ लागलं.

एखाद्या पशुवैद्यकानं गायी-म्हशीला उपचारासाठी लोखंडी सापळ्यात अडकवावं तसं या पोराला कोंडबामामाच्या पुढय़ात ठेवलं जाई. निसटला तर मोठे भाऊ-बहीण सावध उभे असत. आईचा प्रत्यक्ष सहभाग नसे, पण तिचं तोंड मात्र सुरू असे- ''काय वाढलंय ते टारलं, त्या केसांना तेल नको, फणी नको. सगळे भिकारी लक्षणं. गल्लीला आयता तमाशा. लपूलपू बसतं घरात. जसं काय कोणी याचा मेंदू काढून घेतंय.'' या सगळ्यांचं म्हणणं त्यांच्या दृष्टीनं असेल बरोबर. पण कटिंग म्हणलं की लहान पोरं प्रचंड घाबरायचे. कारणंही तशीच होती.

कोंडबामामा अंगणातल्या पोत्यावर बसून त्यांच्या दोन्ही गुडघ्यांत डोकं गच्च दाबून धरायचे. जराही हलू द्यायचे नाहीत. त्या कचकच वाजणाऱ्या कात्रीने आणि चिमटे बसणाऱ्या करकर मशीनने केसांना होत्याचं नव्हतं करायचे. सुंदर काळ्याशार केसांचे पुंजके पोत्यावर पडायचे. रडू आल्यामुळं ते पुंजकेही अंधूक दिसायचे. अशा वेळी विजयी उन्मादानं कानाजवळ कात्री कचकच वाजत असायची. एखादं गुबगुबीत मेंढरू लोकरीसाठी भादरून काढावं तसा कटिंग केलेला चेहरा गरीब दिसायचा. बरं, आरसा नसल्यामुळं कोंडबामामा कशी कट मारतायत ते कळायला मार्ग नव्हता.

एखादा हुकूमशहा हातातल्या धारदार शस्त्राने माणसं कापीत सुटावा तसा आविर्भाव कोंडीबामामांचा असे. उभी असलेली वडीलमाणसं चेअरिंग केल्यासारखे कोंडबामामाला, 'अजून बारीक करा, अजून बारीक करा' असं म्हणत राहायचे. धारदार वस्तरा, कचकच कात्री, चिमटे घेणारी मशीन शिवाय गुडघ्यात गच्च पकडलेलं डोकं यात कंगवा थोडा मवाळ होता. पण यांच्या संगतीत राहून कंगव्यालाही भरपूर दात फुटलेले होतेच. कटिंग म्हणजे या सर्वाची भीती तर होतीच. पण दुसरं एक दु:ख होतं. त्या काळात हिंदी सिनेमाच्या प्रभावामुळं प्रत्येक पोराला हिप्पी कट ठेवण्याची इच्छा असे. राजेश खन्ना, अमिताभ बच्चन यांच्यासारखे कानावर येणारे केस ठेवण्याची फॅशन होती आणि इथं तर पार पैलवान कट मारला जाई. कटिंग केल्यानंतर काही दिवस तर फारच लाजिरवाणं वाटे.

कातडय़ाच्या पट्टय़ावर घासून वस्तरा धारदार ठेवणारे कोंडबामामा स्वत: मात्र शांत होते. मोठय़ा माणसांशी काहीतरी गुपितं सांगितल्यासारखं बोलायचे. याशिवाय त्यांच्याकडं गावात आवतन (जेवण्याचं आमंत्रण) सांगण्याचं काम होतं. बारसं, लग्न, तेरवी असं काहीही असू द्या, कोंडबामामा आवतनं सांगत फिरायचे. अशा वेळी त्यांची जुनाट सायकल सोबत असायची. पण फार कमी वेळा ते सायकल चालवत असत. बरेचदा सायकल हातात धरून पायी चालत असत. त्यांच्या सायकल चालवण्यात एक गंमत होती. गावातल्या अरुंद गल्ल्या. सायकलसमोर कुणी आलं नाही तरी कोंडबामामा सारखं 'सरकाऽऽ.. सरकाऽऽ' असं जोरजोरात ओरडत राहायचे. कारण सायकलला घंटी नव्हती. त्यापेक्षा गंमत म्हणजे, कोंडबामामाला सायकल चालवताना वळवता येत नव्हती. मग अशा वेळी वळणावर ते चक्क सायकल थांबवायचे, खाली उतरून, सायकल उचलून तिचं हवं त्या दिशेला तोंड करून ठेवायचे आणि पुन्हा सायकलवर बसून पायडल मारीत पुढं जायचे.

पुढं काही वर्षांनी गाव बदलू लागलं. गावात सलूनचं एक दुकान झालं. हे नवं कटिंगचं दुकान म्हणजे गावभर चर्चेचा विषय होता. त्या दुकानातल्या मऊ गाद्यांच्या उंच खुच्र्या, फुसफुस करीत चेहऱ्यावर पाण्याचे तुषार उडवणारी बाटली, आख्खा माणूस दिसेल एवढे मोठ्ठाले चकचकीत आरसे, भरमसाठ लावली जाणारी सुगंधी पावडर, नेहमी सुरू असणारी हिंदी सिनेमाची गाणी, भिंतीवर अमिताभ बच्चन, राजेश खन्नाचे लावलेले फोटो, फुकट चाळायला मिळणारा 'मायापुरी'चा फिल्मी अंक. त्यातले नट-नटय़ांचे रंगीत फोटो अशी मौज होती. इथं कटिंग करायला जाणं पोरांनाही आवडू लागले. बरेचदा तर उगीच त्या दुकानासमोर थांबून दुकानातल्या घडामोडी पाहत शाळेत जाणारी-येणारी पोरं थांबत. या सलूनमध्ये कटिंग करणं घरच्यांना आवडणं शक्य नव्हतं. पोरं मात्र हट्टाने या सलूनमध्ये जाऊ लागले. कोंडिबामामाचं काम कमी झालं. तरीही जुनाट सायकलचा काठीसारखा आधार घेत आवतनं देताना कोंडबामामा दिसायचे. पुढं कोंडबामामाही थकले. तरी आम्ही गाव सोडेपर्यंत वडिलांसाठी आणि आजीसाठी ते येत गेले. त्यांना कटिंग करताना बघून आम्हा सलूनमध्ये जाणाऱ्यांना मोटारीत बसून बैलगाडी पाहिल्यासारखं वाटू लागलं.

परवा फेसबुकवर प्रकाश आमटे हे बाबा आमटेंची कटिंग करतानाचा एक सुंदर फोटो पाहिला आणि कोंडबामामाची कचकच कात्री कानात ऐकू येऊ लागली. हे केस वाढवणे आणि कापणे याला आपल्याकडे अनेक संदर्भ आहेत. आई-वडील वारल्यानंतर केस काढण्याची प्रथा, विधवा स्त्रीचे केशवपन, याउलट जोगतिणीच्या जटा, पोतराजाच्या जटा, जटा वाढवून झालेले  साधुसंत, तिरुपती बालाजीला जाऊन केशदानासाठी केलेलं मुंडण, मौंजीत शेंडी ठेवून केलेला चमनगोटा, बाळाचे जावळं काढण्याचा कार्यक्रम, असे केस कापण्यासाठीचे अनेक संदर्भ आजही भोवताली दिसतात. पूर्वी तपोवृद्ध ज्ञानवृद्ध साधूच्या जटा वाढायच्या, पण पुढे नुस्त्या जटा वाढवूनही काहीजण साधू झाले. अशांसाठी तुकारामाने खडे बोल सुनावले आहेत..

डोई वाढवूनि केश। भुते आणिती अंगास।
तरी ते नव्हती संतजण। तेथे नाही आत्मखूण।

सानेगुरुजींच्या 'श्यामची आई'मध्येही केस कापण्यासंबंधीचा संदर्भ एक विचार पेरून जातो. वसतिगृहामध्ये राहणारा श्याम घरी येतो. तेव्हा त्याचे डोक्यावरचे केस वाढलेले असतात. त्यामुळे वडील श्यामला खूप रागावतात. धर्म पाळला नाही, म्हणून खूप बोलतात. श्यामला वाईट वाटतं. रडू येतं. श्यामला वाटतं, केस वाढवण्यात अधर्म कसला? श्यामची शंका आई दूर करते. आईच्या मते, केस न कापणं म्हणजे केसांचा मोह होणं. कुठल्याही मोहाच्या आहारी जाणं म्हणजे अधर्मच होय. थोडक्यात काय तर केस कापणं आणि वाढवणं ही काय सहज साधी गोष्ट नाहीय. डोक्यावरच्या केसांएवढे त्याला संदर्भ आहेत.

कच्कच कात्री चालवणाऱ्या आमच्या कोंडबामामासारखा लक्षात राहिलेला दुसरा न्हावी म्हणजे विंदा करंदीकरांचा धोंडय़ा न्हावी! करंदीकर म्हणजेसुद्धा एखाद्या अनुभवाची सुंदर कटिंग करून पेश करणारा कवी. या कवितेतला धोंडय़ा न्हावी हलाखीत जीवन जगतोय. देणेकऱ्याचा त्याच्यामागे तगादा आहे. उपचाराविना त्याची चार पोरं मेलेली आहेत. या धोंडय़ाची एक मनातून इच्छा आहे. गांधीबाबा त्याच्या भागात आले तर धोंडय़ाला त्यांची हजामत करायची होती. पण गांधींची हत्या होते आणि धोंडय़ा न्हाव्याची इच्छा अपूर्णच राहते. कटिंगबद्दल इच्छा अपूर्ण राहतात याचा मलाही चांगलाच अनुभव आहे. हिप्पी कट करण्याची आमची इच्छा अपूर्णच राहिलीय ना! त्या काळात या अपूर्ण इच्छेला पूर्ण करू पाहणारा गण्या नावाचा आमचा एक मित्र होता. कटिंगला नव्या सलूनमध्ये जाताना, 'चांगली बारीक कटिंग करून ये' अशी त्याच्या आईने दिलेली सूचना दुर्लक्षून गण्याने परस्पर चक्क हिप्पी कट मारला होता. पण तो आम्हाला काही बघायला मिळाला नाही. कारण हिप्पी कट मारलेला गण्या घरी पोचला तर त्याच्या आईने त्याला घरातही घेतले नाही. उलट त्याच पावली त्याच्यासोबत सलूनच्या दुकानात स्वत: जाऊन थयथयाट केला. सलूनवाल्याचा उद्धार केला. शेवटी त्या सलूनवाल्याने बारीक पैलवान कट मारून दिला तेव्हा गण्याची आई शांत झाली. गण्याचा हिप्पी कटमधला चेहरा पाहण्याचा योग आम्हाला आला नाही. कारण उद्घाटनापूर्वीच पूल कोसळावा तसा हा हिप्पी कट अल्पायुषी ठरला. तरीही आमच्यात गण्याला भाव होता. कारण १५-२० मिनिटे का होईना गण्याच्या वाढलेल्या केसांना हिप्पी कटचा आकार लाभला होता. आमच्या केसांना ते भाग्य लाभले नाही. आमचे केस वडीलधाऱ्यांच्या धाकात वाढले आणि धाकातच कापलेही गेले. स्वतंत्र वळण त्यांना मिळालेच नाही.

हा विषय कटिंगसारखा कितीही वाढू शकतो. पण कुठे तरी कचकच कात्री लावून त्याला थांबवायला हवं. या कटिंग प्रकरणात पुरुषच अडकलाय. बाई आपले केस हवे तसे वाऱ्यावर सोडू शकते. त्यांना कसलीच अडचण नाही असा समज असताना एक छोटीशी घटना घडली. रयत शिक्षण संस्था दरवर्षी फार दर्जेदार वक्तृत्व स्पर्धा घेते. एके वर्षी परीक्षक म्हणून वेगवेगळ्या स्पर्धकांना ऐकत होतो. तिसऱ्या दिवशी, अंतिम फेरीच्या उत्स्फूर्त भाषणात एक शेवटची स्पर्धक मुलगी बोलायला उभी राहिली. या शेवटच्या मुलीचं ऐकून ताबडतोब स्पर्धेचा निकाल लावायचा होता. त्या मुलीनं उचललेल्या चिठ्ठीत विषय निघाला, 'आजच्या स्त्रीसमोरील आव्हाने.' त्या स्पर्धक मुलीनं बोलायला सुरुवात केली. प्रभाव पाडण्याचा कुठलाही प्रयत्न नव्हता. सहज स्वाभाविक संवाद साधणं होतं ते. तिचं पहिलं वाक्य तिच्या स्वत:च्या लांब वेण्यांवर होतं. ती म्हणाली, ''मी खूप पुस्तकी समस्या सांगत बसणार नाही. मी बी.एड. करते. माझं सकाळी सात वाजता कॉलेज असतं. एवढय़ा सकाळी या लांब केसांची मला खूप अडचण होते. गडबडीत या केसांची साधी वेणीही घालू शकत नाही. म्हणून मला हे केस कापायचे आहेत. पण केस कापायला माझ्या घरच्यांचा विरोध आहे.'' स्वत:चे केस कापण्याच्या समस्येपासून तिनं पुढं अनेक समस्यांचा डोंगरच मांडला. पण मला मात्र, तिच्या केस कापण्याच्या समस्येत कोंडबामामांच्या कचकच कात्रीचा आवाज येत राहिला.    

बाई संभाळ कोंदण

आजकाल गावोगाव, विशेषकरून शहरांमधून मॉर्निग वॉकची चळवळ जोरात आहे. या भल्या पहाटे चालण्यामागे उत्स्फूर्ततेपेक्षा डॉक्टरांनी बंधनकारक करण्याचा वाटा मोठा असतो. अर्थात काही हौशी आरोग्य उपासकही असतात. डॉक्टरांनी चालणे अनिवार्य केलेला आणि हौशी चालणाऱ्यांचा.. बऱ्यापैकी नियमित असणाऱ्यांचा आमचा एक ग्रुप तयार झालाय. त्यात वेगवेगळ्या स्वभावाचे लोक आहेत. काहीजण तोंड चालवायला मिळतं म्हणून पाय चालवतात. काही मात्र 'कॅलरीज् बर्न' करायचे उद्दिष्ट डोक्यात ठेवूनच तन्मयतेनं चालत असतात. काहींना घरून जबरदस्ती चालायला पाठवलेलं असतं. वेळ लावून चालणारे सारखे पळणाऱ्या घडय़ाळाच्या काटय़ाकडे पाहत असतात. यात आमचे एक इंजिनीअरसाहेब आहेत. टेलिफोन खात्यात मोठय़ा पदावर कार्यरत असणारे हे साहेब आहेत मोठे मनमिळावू. कुठंही साहेबी थाट नाही. जबाबदारी मोठी असल्यामुळं व्यापही मोठा आहे. पण त्यातूनही इंजिनीअरसाहेबांच्या डोक्यात टेलिफोनच्या केबलसारखे गुंतागुंत झालेले अनेक प्रश्न, प्रसंग वळवळत असतात. पाहता पाहता हे साहेब माझे मित्र झाले. रोज 'हाय- हॅलो' होतं. कधी चालताना गप्पा रंगतात. प्रत्येक प्रश्नावर त्यांना स्वतंत्र पुस्तक हवं असतं. आपण एखादं पुस्तक सुचवलं तर ते मिळवून वाचतात. चर्चा करतात. टेलिफोनच्या क्रॉस कनेक्शनमध्ये एखादा विचित्र संवाद ऐकू यावा तसा एखादा वेगळाच प्रश्न त्यांच्या डोक्यात येतो. पण त्या प्रश्नामागे जाणून घेण्याची प्रामाणिक तळमळ असते. सहा फुटी धिप्पाड देहातली चरबी कमी करण्याकरिता झपाझपा चालताना साहेबांचं तोंडही सुरू असतं. परवा त्यांनी एक छोटासा प्रसंग सांगून एक गंभीर प्रश्न उपस्थित केला. बोलताना थोडेसे हळवे झाले होते.

इंजिनीअरसाहेब शहरालगतच्या औद्योगिक वसाहतीतल्या कार्यालयात भेट द्यायला निघाले होते. सकाळची वेळ. डय़ुटी गाठण्यासाठी प्रचंड वेगात वाहनं धावत होती. रस्त्याच्या कडेचं दृश्य बघून साहेबांनी र्अजट गाडी थांबवली. रस्त्याच्या कडेला एक तरुण मुलगी विव्हळत पडली होती. रस्त्यावरच्या वाळूवर स्लिप झालेली स्कूटी बाजूला पडलेली होती. पण कुणीही थांबायला तयार नव्हतं. त्या अपघाताकडे दुर्लक्ष करून वाहनं सुसाट पळत होती. साहेबांनी तातडीने त्या मुलीला उठवून बसवलं. गाडीतली बाटली आणून पाणी पाजलं. मुलीला बरंच खरचटलं होतं. ती घाबरली होती. तिचं अंग थरथरत होतं. साहेबांनी तिला धीर दिला.
जवळपास दवाखाना नव्हता. दरम्यान, दोन-चार वाहनं आता उत्सुकतेपोटी थांबली होती. त्यांनी त्या मुलीच्या घरी कळवण्यासाठी घरचा पत्ता, मोबाईल नंबर विचारला. पण ती मुलगी काहीच बोलली नाही. मुलगी आता थोडी शांत झाली होती. पुन्हा साहेबांनी माहिती मिळवायचा प्रयत्न केला. मुलगी मात्र शांत. आर्किटेक्ट कॉलेजची ती विद्यार्थिनी होती. थांबलेल्या वाहनांतल्या एक बाई तिच्याशी बोलू लागल्या. मुलगी त्यांच्याशी बोलत होती. मुलीने त्या बाईंना घरचा पत्ता, फोन सांगितला. बाईंनी तिच्या घरी संपर्क साधला. प्रश्न मार्गी लागलेला बघून साहेबही निघाले. निघताना ती जखमी मुलगी साहेबांना 'थँक्स काका!' एवढं बोलली.

प्रसंग एवढाच आहे. यात त्या मुलीनं स्वत:ची माहिती, कॉन्टॅक्ट नंबर न सांगणं ही गोष्ट इंजिनीअरसाहेबांना चांगलीच लागली होती. त्यांच्या मते, 'मलाही मुलगी आहे. म्हणजे मी तिच्या बापासारखाच आहे. शिवाय रस्त्यावर कुणीही लक्ष देत नव्हतं तेव्हा कर्तव्य म्हणून मी गाडी थांबवून तिला मदत केली. तिला घरी पोचवण्यासाठीच मला तिचा पत्ता, मोबाईल नंबर हवा होता. मग तिने माझ्यावर अशावेळी अविश्वास का दाखवला असेल? हा प्रश्न साहेबांना छळत होता.. आतून अपमानित करीत होता. यावर बरीच चर्चा झाली. राहून राहून साहेब पुन्हा या विषयावर यायचे. 'माझा चेहरा एवढा भीतीदायक आहे? का कधी मी एखाद्या स्त्रीसोबत वाईट वागलोय? ज्या स्त्रीसोबत ती मुलगी घरी गेली, ती स्त्रीही अनोळखीच होती. मग माझ्यावरच अविश्वास का?' एखादा दिवस गेला की साहेबांची हळवी जखम भळभळू लागायची. एका परपुरुषाला आपला कॉन्टॅक्ट नंबर किंवा पत्ता सांगणं त्या मुलीला योग्य वाटलं नाही. त्यात वैयक्तिक इंजिनीअरसाहेबांवरच्या अविश्वासापेक्षा 'पुरुष'जातीची वाढत चाललेली दहशतच अधिक जबाबदार असावी. पोटच्या मुलीप्रति बापाचीच विकृती पुढे येताना बापासारख्या पुरुषावर विश्वास कसा ठेवायचा? प्रत्येक लाल मुंगी आपल्याला चावत नसते. पण लाल मुंग्या दिसल्या की आपण सावध होतो. कारण लाल मुंगीच्या कडाडून चावण्याची किमान माहिती आपल्या गाठीशी असते. बायका अशाच दचकून असतात पुरुषांच्या बाबतीत.
खऱ्या अर्थानं बाईचं हे दचकणं, संकोचणं, घाबरणं आणि आणि सावरणं सुरू होतं एका घटनेपासून. ती घटना म्हणजे स्त्रीला होणारी ऋतुप्राप्ती होय. या घटनेपासून बाईच्या जगण्यावर अचानक अनेक बंधने येतात. याचे अनेक संदर्भ लोकगीतांतून, ओव्यातून येत राहतात..

आता आलं ग बंधन
अंग झालंया चंदन
चंदनाची दरवळ
बाई संभाळ कोंदण

सगळ्यांसोबत बिनधास्त खेळणारी, बागडणारी मुलगी अचानक मुलांपासून वेगळी होते. भोवतालच्या नजरा तिच्याकडे वळतात. बहिणी, तिच्या मैत्रिणी एकदमच तुटक वागायला लागतात. त्याचा लहानपणी अर्थ लावता येत नसे. या 'कावळा शिवण्याचा' लहानपणी भयंकर राग येत असे. कारण त्यामुळे तीन दिवस आईपासून लांब राहावं लागायचं. 'शिवू नको, लागू नको, दूर हो' असे जाचक नियम घरात असत. बाहेरून खेळून आल्यावर स्वत:ला आईच्या अंगावर झोकून द्यायची सवय. नेमके तीन दिवस आई अस्पृश्य असायची. त्या काळात 'कावळा शिवणे' या घटनेचा सामाजिक-सांस्कृतिक अर्थ डोक्यात असणं शक्य नाही. पण या घटनेचे दृश्य परिणाम खटकणारे होते. याबद्दलची दाटून राहिलेली बालमनाची अनाकलनीयता पुढं कवितेतून उजागर झाली..

'शेपटी वेण्या हलवत मिरवणारी
हुशार परकरी पोरगी
एकदम वर्गातच घाबरली-ओरडली,
बाईंनी तिला उठवलं- विचारलं
तर बेंचावर भलंमोठ्ठं रक्त सांडलेलं,
आम्ही घाबरलो
बाईंनी आम्हाला वर्गातून हाकललं
नेमकं काय झालं?
कुठला गृहपाठ विसरल्याची
ही रक्तरंजित शिक्षा,
का बेंचाचा खिळा लागला?
(अशा बाहेर आलेल्या खिळ्यांमुळे
आमच्या खाकी चड्डय़ा फाटायच्या.)
कुणीच काही सांगेना
शेवटी मी भांडेवाल्या गंगाबाईला विचारलं
तवा घासताना गंगाबाई बोलली,
''तुला काय संडय़ा
जलमलास पुरुषाच्या जातीत
त्या पोरीचा
जाळभाज सुरू झालाया बाबा''
मला काही कळेना
नुस्ता तव्यावर
विटकर घासल्याचा खरखर आवाज'

दहा वर्षांपूर्वी ही कविता 'जाळभाज' या शीर्षकाखाली 'कवितारती'च्या दिवाळी अंकात छापून आली. कविता मिळताच संपादक प्रा. पुरुषोत्तम पाटील यांचे कौतुकाचं पत्रही आलं. इतरही अनेक प्रतिक्रिया आल्या. हे सर्व इंजिनीअरसाहेबांच्या प्रश्नामुळं मनात घुमू लागलं.
स्त्रीला मुळातच पापी ठरवण्यात आलं आहे. तिच्या पापामुळे ती रजस्वला (कावळा शिवणे) होते. त्या पातकापासून मुक्त होण्यासाठी स्त्रिया ऋषिपंचमीचा उपवास करतात असा एक संदर्भ आहे. हे मी इंजिनीअरसाहेबांना सांगत होतो. त्या घटनेतील मुलीवर स्त्री म्हणून असणारा दबाव त्यांच्या लक्षात येत होता. अपेक्षेप्रमाणे साहेबांनी यासंदर्भात पुस्तकाचं नाव मला विचारलंच. स्त्रीला अपमानित करणारी मूळ गोष्ट म्हणून अरुणा देशपांडेंच्या 'एका शापाची जन्मकथा' या पुस्तकाचं नाव मी त्यांना सांगितलं. साहेबांनी ते पुस्तक मिळवलं, वाचलं आणि चर्चा सुरू झाल्या. जगातील सर्व संस्कृतींतील ऋतुप्राप्तीबद्दलचे समज-गैरसमज अरुणाबाईंनी परिश्रमपूर्वक त्यात मांडले आहेत. सोबत शास्त्रीय माहिती आहे. खरं तर हा विषय चर्चेसाठी आजही निषिद्ध मानला जातो.

आदिमानवाला रक्ताबद्दल भीती वाटत होती. कारण रक्तस्राव म्हणजे जिवाला धोका हेच समीकरण आदिमानवाला माहीत होतं. त्यामुळे प्राण्याचा, माणसाचा जीव रक्तात असतो, ही कल्पना रूढ झाली. कोणतीही जखम न होता स्त्रीला होणारा रक्तस्राव धोकादायक मानला जाऊ लागला. या रक्तस्रावाबद्दल गूढता आणि भीती निर्माण झाली. या गूढतेपासून इतरांना वाचवण्यासाठी अशा स्त्रियांना वेगळे ठेवण्यात येऊ लागलं. त्यांच्या हालचालींवर आणि आहार-विहारावर बंधने घालण्यात आली. ही समाजशास्त्रीय अभ्यासकांची मांडणी मूळ गैरसमजाला हात घालणारी आहे. स्त्रीच्या माथी लावलेल्या 'विटाळ' शब्दाची निर्मिती 'विष्ठा' शब्दापासून झालेली आहे. प्राचीन संस्कृतीत स्त्रीसाठी 'भस्त्रा' हा शब्द वापरला आहे. 'भस्त्रा' म्हणजे केवळ अपत्यांना जन्म देणारी कातडय़ाची पिशवी! प्रजननासाठी पुरुष बीजाचे महत्त्व लक्षात घेऊन पुरुषी वर्चस्व प्रस्थापित झालं. स्त्रियांच्या निसर्गधर्माला निषिद्ध ठरवणाऱ्या शापकथा वाचताना आज करमणूक होते. गंमत म्हणजे या शापकथा ऊर्फ करमणूक कथा सर्वच धर्मात सापडतात. कुणाच्या तरी शापामुळं किंवा पापामुळं स्त्रीला मासिक पाळी येते, असा या सर्व कथांचा मथितार्थ आहे. आजही पुरुषांचा वंशवृक्ष वाढवण्यासाठी शापित स्त्रिया बाळंत होतात. बिचारी छोटी मुलगी 'चिऊ, चिऊ ये, काऊ काऊ ये, दाणा खा, पाणी पी, भुर्र्र उडून जाऽऽ' असे पिटुकले हात हलवत आवतन देते. पुढं हाच कावळा त्या मुलीला शिवतो. मुलीचा जाळभाज सुरू होतो. ती कोणावरच विश्वास ठेवू शकत नाही. नाइलाजाने भीती, संकोच, घुसमट सोबत वागवावी लागते. तिला शिवलेला कावळा दृश्यरूपात क्षणोक्षणी जाणवत राहता. पण आपल्या जगण्याला शिवलेला अज्ञानाचा, रूढी-परंपरांचा आणि पुरुषी वर्चस्वाचा कावळा मात्र कोणालाच दिसत नाही.   

झेंडे

डांबरी रस्ते तापू लागलेत. राष्ट्रीय महामार्गावरचे खड्डे चुकवताना ड्रायव्हरचं कौशल्य पणाला लागलंय. टोलवाले इमानेइतबारे पैसे घेऊन पावती देतायत. रस्त्याशेजारचं गवत वाळून गेलंय. दुतर्फा शेतीत दुष्काळाचं सावट दिसतंय. या वर्षीही पुरेसा पाऊस पडला नसल्याच्या खाणाखुणा भोवताली भरून आहेत. रस्त्याच्या बाजूला चरणाऱ्या गुरांच्या फासळ्या स्पष्ट दिसतायत. रसवंतीच्या आडोशाला थकलीभागली माणसं जमू लागलीत. लाकडी चरकाचा बैल गोल गोल फिरतोय. उसामध्ये लपवून लिंबू चिरडलं जातंय. दूरच्या प्रदेशातून आणलेल्या टरबुजांची आरास रचलेली रस्त्याच्या कडेला. नमुना म्हणून लालबुंद टरबूज कापून ठेवलंय दर्शनी भागात. टरबूज हे मूळ चिनी फळ. माणसाच्या रक्तासारखा टरबुजाचा रंग पाहून आरंभी माणूस घाबरला होता म्हणे. आता मात्र या रक्तवर्णी रंगाकडे तो आकर्षित होतो. अचानक एक काळीपिवळी विचित्र कट मारून पुढं निघून जाते. प्रचंड माणसं कोंबलेल्या काळीपिवळीवाल्या ड्रायव्हरला आमचा ड्रायव्हर उत्स्फूर्त शिवी देतो. त्याला दिलेली शिवी बऱ्याचदा आपल्यालाच ऐकू येते. पण स्वत:च्या समाधानाकरिता शिवी मात्र दिली जातेच.
रस्त्याच्या मधेच एखादं गाव लागतं. गाव म्हटलं की कौलारू घरं, पाणवठा, चावडी, देऊळ, शाळा, हिरवेगार शेतमळे असं जलरंगातलं चित्र आता शक्य नसलं तरी किमान गाव म्हटल्यावर घरं दिसायला काय हरकत आहे? पण खरं गाव असतं रस्त्यापासून दूर कुठंतरी. रस्त्यावर पाच-सहा हॉटेल्स, झाडाला लटकवलेल्या टय़ूब-टायरमुळं लक्षात येणारं पंक्चरचं दुकान, मोकाट फिरणारे कुत्रे-जनावरं, पानपट्टय़ा, चहाच्या टपऱ्या. एखादा तेलकट-मळकट भिकारी आणि भोवताली उडणारे प्लॅस्टिकचे तुकडे, तर कधी कोंबडीची पिसं.. या नेपथ्यासोबत हमखास ठळकपणे उभे असतात ते होर्डिग्ज. कुणाचा वाढदिवस, कुणाचं गोडजेवण, कुणाची निवड, तर कुणाची निवडणूक अशा अनेक कारणांनी होर्डिग्जवरचे पांढऱ्याशुभ्र कपडय़ातील सुवर्णालंकारांनी मढलेले महामानव छद्मीपणानं हसत असतात. अनधिकृत होर्डिगवरचे हे महामानव राजकारणात कधी अधिकृत होऊन जातात, ते कळतच नाही.

ड्रायव्हर मामांनी स्पीड वाढवलेला होता. अंधारून यायच्या आधी आम्हाला समोरचं गाव गाठायचं होतं. ड्रायव्हर मामांनी त्यांच्या आवडत्या इंदुरकर महाराजांच्या कीर्तनाची सीडी लावलेली. या प्रबोधनी कीर्तनातील रोखठोक विचार आणि गावरान भाषा ग्रामीण लोकांपर्यंत पोहोचायला पूरक. या कीर्तनकाराची शैलीही खिळवून ठेवणारी. असं नामी बोलणाऱ्याला खेडय़ात मोठा मान असतो. त्यामुळं या महाराजांचा भारी दरारा. कीर्तन सुरू आहे. कीर्तनात मधेच उठलेल्या एका गावकऱ्याला महाराज चालू कीर्तनात हटकतात.. 'येऽऽ मधीच कामुन उठला रं..? तुला लघी नाही आली.. एक तर तुला शायनिंग मारायची असल, नाहीतर चपल्या चोरायच्या असतील.. (लोकांचा खळखळून हसण्याचा आवाज) कीर्तनकार महाराजांनाही हसू आवरेना. टाळ-पखवाज वाजायला लागतात.. विठ्ठाला. विठ्ठाला. विठ्ठाला.. सुरू होतं. हा डायलॉग डोक्यात असतानाच पुढं एक गाव लागतं. होर्डिगवरचे पांढऱ्याशुभ्र कपडय़ात उभे सुवर्णजडित महामानव दिसतात आणि कीर्तनकाराचा डायलॉग मला आठवतो.. ''येऽऽ मधी कामुन उठला रं..? तुला शायनिंग मारायची असल, नाहीतर चपल्या चोरायच्या असतील.'' विठ्ठाला.. विठ्ठाला.. विठ्ठाला..

आता आम्हाला पोहोचायचंय ते गाव अवघं पंधरा कि. मी. अंतरावर आहे. दुतर्फा शेतमळ्यांतील घरांवर झेंडे दिसायला लागतात. तुरळक असणारे झेंडे आता दाट व्हायला लागतात. झाडावरही झेंडे फडकतायत. गाव जवळ येतंय आणि झेंडे वाढतच जातायत. गावात प्रवेश करतो तर झेंडेच झेंडे! दुकानावर झेंडे, इमारतींवर झेंडे, झाडांवर झेंडे! लाइटच्या खांबावर झेंडे, एसटीवर झेंडे, रिक्षावर झेंडे, जीपवर झेंडा, कारवर झेंडा, मोटारसायकलवर झेंडे, हातगाडय़ांवर झेंडे, पानटपरीवर झेंडा, पाणपोईवर झेंडा, टी-स्टॉलवर झेंडा, पुतळ्याच्या हातात झेंडा, दुभाजकावर झेंडे.. चौकात पताकाही झेंडय़ांच्याच. मोहरानं आंब्याचं झाड भरून जावं तसे गावात झेंडे लखाटलेले. पुराचं पाणी वाढत जाताना भीती वाटावी तशी आता या झेंडय़ांची दहशत वाटतेय. माणसं राहणाऱ्या या गावाचं 'झेंडेपूर' झालेलं.

स्थानिक मित्राला सोबत घेऊन बाहेर पडलो. रस्त्याने जाताना एक गोष्ट लक्षात आली. रस्त्यातल्या दुभाजकावर ओळीने झेंडे लावलेले. पण हे झेंडे रोवण्यासाठी दुभाजकातील हिरवीगार झाडं चक्क उपटून टाकण्यात आली होती. हिरवं झाड उपटून तिथं झेंडा रोवावा असा जगात कुठला झेंडा असेल असं मला वाटत नाही.

खरं तर हे वळवळणाऱ्या झेंडय़ांचं एक स्वप्न होतं असं म्हणायला मला आवडलं असतं. म्हणजे गार वारं लागलं.. डोळा लागला आणि झेंडय़ांनी लखाटलेल्या गावाचं स्वप्न पडलं.. असं काहीसं. पण हे मात्र वास्तवातलं गाव होतं.. ज्या गावात असंख्य झेंडे नुसते वळवळत होते. माणसापेक्षा झेंडेच ठळक झाले होते. हे झेंडे एका विशिष्ट आविर्भावात फडकत होते. त्या फडकण्यात एक ईष्र्या जाणवत होती. मधेच एक मोटारसायकलचा ताफा हातातले झेंडे नाचवीत एका दिशेला गेला. कुठं जायचंय त्यांना? त्यांच्या घोषणा भीतीदायक का वाटतायत?
गल्लीबोळ ओलांडत, झेंडय़ांतून रस्ता काढत एका जुनाट वाडय़ासमोर येऊन आम्ही थांबलो. हे घर होतं समाजवादी विचारांच्या जुन्या कार्यकर्त्यांचं. उजव्या सोंडेचा गणपती दुर्मीळ म्हणून लोक मुद्दाम दर्शनाला जातात, तसा या भेटीमागचा उद्देश. हा समाजवादी विचारांचा पन्नासेक वर्षांपासून निष्ठावान सक्रिय समर्थक. वातावरण बदलत गेलं तसं सोबतचे लोक पक्ष सोडून गेले. म्हणजे लोकांनी हातातला आणि घरावरचा झेंडा सोयीप्रमाणे बदलला. कुणी नगरसेवक, कुणी जि. प. सदस्य, कुणी नगराध्यक्ष, तर कुणी आमदार झाला. पण या निष्ठावान माणसाने समाजवादी डावा विचार सोडला नाही. 'निष्ठावान', 'तत्त्वनिष्ठ' म्हणायला आपल्याला बरं वाटतं; पण तालुक्याच्या या गावात ही निष्ठा टिंगलेचा विषय होती. या सत्शील कार्यकर्त्यांनं उदरनिर्वाहासाठी पंक्चरचं दुकान चालवलं. त्यात आता प्रगती म्हणजे एका जिल्हा दैनिकात पत्रकार म्हणून काम करतायत. सोबतचे मोठे झाले, पैसेवाले झाले म्हणून ना खेद, ना खंत. अजूनही त्यांच्या पक्षाला चांगले दिवस येतील असा त्यांना विश्वास आहे. म्हणूनच राजकारणात राहूनही चेहऱ्यावर निर्मळपणा शाबूत आहे. त्यांच्या पत्र्याच्या खोलीत बसून प्यालेल्या चहामध्ये आत्मीयता होती. निघताना अंगणात उभं राहून बोलत होतो. त्यांच्या घरावरही गावभर फडकणाऱ्या झेंडय़ांसारखा एक झेंडा फडकत होता. त्या झेंडय़ाचा रंग यांच्या समाजवादाशी जुळणारा नव्हता, म्हणून सहजच झेंडय़ाबद्दल विचारलं. तर त्यांचं सोपं-साधं उत्तर तयार होतं.. ''पोरं बळंच घरावर झेंडे आणून लावितेत. पोरायला कशाला नाराज करायचं? म्हणलं लावू द्या. आपला विचार थोडाच बदलणाराय?'' या काळातल्या अशा दुर्मीळ प्राण्याचा निरोप घेऊन बाहेर पडलो.

जबरदस्ती घरावर झेंडा लावण्याचा अनुभव मीही या निवडणुकीत घेतलेला होता. दहावी-अकरावीतील सहा-सात मुलं भर दुपारी बेल वाजवतात. दार उघडलं तर हातात एक झेंडा देतात. दारावर स्टिकर तर लावूनही झालंय. एका राजकीय पक्षाचा झेंडा घरावर लावण्यासाठी दिलेला. 'हा झेंडा घरावर का लावायचा? या पक्षाने आमचे काही प्रश्न सोडवलेत का?' अशा कुठल्याच प्रश्नांची त्या मुलांजवळ उत्तरं नव्हती. त्यांच्या मते, 'बाकी काही असू द्या; घरावर झेंडा मात्र आमचा लावा.' तो झेंडा मी मुलांच्या समाधानाकरिता ठेवून घेतला. त्यांना बोलू लागलो, 'हा झेंडा ज्या घरावर लावलाय, त्या घरात नियमित नळाला स्वच्छ पाणी येत नसेल, लोड शेडिंगमुळे वीज उपलब्ध नसेल, समोरची गटारं साफ केली जात नसतील, तर तुमच्या झेंडय़ाचा अपमान नाही का होणार?' पण त्यांना फार चर्चा नको होती. त्यांचा झेंडा घरावर फडकणं महत्त्वाचं होतं. मुलंच ती; धाडधाड आली तशी निघूनही गेली. तो झेंडा (किं वा कुठलाही) लावण्याचा प्रश्नच नव्हता. आपण चांगला युक्तिवाद केला, या समाधानात दोन दिवस उलटून गेले. तिसऱ्या दिवशी कॉलनीत सगळ्या घरांवर डौलात झेंडे फडकत होते. आम्ही पाहतच राहिलो.

काही वर्षांपूर्वी असेच त्रासदायक ठरतील असे झेंडे एकदा फडकले होते. एका मुख्य चौकातील विजेचा खांब. या खांबाला मोजून सोळा-सतरा झेंडे लावलेले. अनेक रंगांचे, अनेक पक्षांचे झेंडे मालकी ऐटीत फडकत होते. हा केविलवाणा खांब डोक्यातून जाईचना. महाविद्यालयीन दिवस होते ते. शेवटी एक 'स्ट्रीट पोल' नावाची कविता लिहून झाली..
'ऐन रस्त्यातला खांब
मला म्हणाला थांब
मी थबकलो
तारांनी जखडलेला
आणि झेंडय़ांनी लखाटलेला
देह सावरीत खांब बोलू लागला,
'अरे, तुमच्या जयंत्या होतात
नेते येतात, मिरवणुका- जलसे निघतात
प्रत्येकाचे झेंडे मात्र आम्हाला लागतात
भगवा, हिरवा, निळा, तर कधी काळाही
प्रत्येक झेंडा फडकत असतो मालकी ऐटीत
बाबांनो, एक तर आम्ही दिव्याचे खांब राहू
नाही तर चक्क ध्वजदंड होऊ
या झेंडय़ांच्या ओझ्यानं
आमचे देह खालावतील
मग कुणाच्या भावना दुखावतील
नंतरचा रक्तपात पाहता पाहता
आमचे दिवेच मंदावतील,
म्हणून आता ठरवूनच टाका
हवेत दिवे का झेंडेच हवे
ऐन रस्त्यातला खांब
मला म्हणाला थांब.'

पंचेवीस वर्षांपूर्वी लिहिलेली ही कविता. या कवितेने स्पर्धेतून अनेक पारितोषिकं मिळवून दिली. तेव्हा आर्थिक पाठबळही दिलं. वाटलं, संपलं तिचं काम. जुन्याकाळचं नाणं ठेवून द्यावं तशी ही कविता ठेवून दिली. म्हणजे तिला संग्रहातही समाविष्ट केलं नाही. पण आता प्रासंगिक प्रतिक्रिया म्हणून बाजूला ठेवलेली ही कविता पुन्हा एकदा माझ्या डोक्यावर फडकू लागलीय.

 दासू वैद्य - dasoovaidya@gmail.com

गोष्ट लिहिणाऱ्याची गोष्ट

शिक्षकी पेशात आपल्या विद्यार्थ्यांची संख्या हमखास वाढत जाते. वर्ष संपलं की माजी विद्यार्थ्यांच्या संख्येत आपोआप वाढ होते. वर्षांच्या सुरुवातीला नवे विद्यार्थी दाखल होतात. म्हणजे तोटी सैल झाल्यामुळे थेंब थेंब टपकणाऱ्या नळाखालची बादली भरतच जावी तसे शिक्षकाच्या खात्यात विद्यार्थी वाढतच जातात. lok01त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे गावात राहणारा प्रत्येकजण आपला गाववाला असतो तसा वर्गात बसणारा हरएक विद्यार्थी होऊन जातो. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या या वाढत्या यादीचं वेगळं श्रेय घेण्याची गरज नाही. बरं, यातले सगळेच विद्यार्थी लक्षात राहतात असंही नाही. याउलट, काही विद्यार्थी विसरताच येत नाहीत. साधारणपणे चळवळे, बोलके, अंगी काही गुण असणारे किंवा उपद्रवी विद्यार्थी बऱ्यापैकी लक्षात राहतात. असे विद्यार्थी पुढं कुठं कुठं भेटत राहतात. वर्गातल्या डायसवर चोख असणारा आणि विद्यार्थ्यांबद्दल आस्था ठेवणारा शिक्षक विद्यार्थ्यांच्याही विस्मरणात जात नाही. एखाद्या लग्नकार्यात एखादी स्त्री आपल्या छोटय़ा मुला-मुलीला 'हे माझे सर बरं का!' अशी आत्मीयतेनं ओळख करून देते. गच्च भरलेल्या एसटीत स्वत:ची खिडकीत धरलेली जागा उभ्या असलेल्या शिक्षकाला सन्मानाने विद्यार्थी देतो, तेव्हा या पेशाचं वेगळेपण अधिक ठळक होतं.

पोटापाण्याला, संसाराला लागलेले विद्यार्थी बऱ्याचदा भेटायला येतात. बोलताना संदर्भ आठवतात. त्यांची जुनी बॅच लक्षात येते. तेव्हाचे प्रसंग, घटना आठवतात. गेल्या महिन्यात असाच एक माजी विद्यार्थी सहज भेटायला आला. पहिल्या भेटीपासूनच हा विद्यार्थी माझ्या लक्षात होता. पाचेक वर्षांपूर्वीची त्यांची बॅच होती.

आमच्या विद्यापीठात 'कमवा आणि शिका' नावाची एक चांगली योजना आहे. आर्थिकदृष्टय़ा कमकुवत विद्यार्थ्यांनं सकाळी दोन तास बागेत काम करायचं, त्याचा मोबदला म्हणून महिन्याला पैसे मिळतात. या पैशांची गरीब विद्यार्थ्यांना नक्कीच मदत होते. काहींचं तर या योजनेमुळं शिक्षण पूर्ण होतं. या योजनेत नंबर लागण्यासाठी काही नियम व अटी आहेत. आलेल्या अर्जाची छाननी होऊन गरजू विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या जातात. त्या निवड समितीवर त्या वर्षी मी होतो. सहकारी प्राध्यापकासोबत मुलाखती घेणं सुरू होतं. खरं तर जवळपास सर्वच मुलांची आर्थिक परिस्थिती खराब आहे हे जाणवत होतं. पण मर्यादित जागा असल्यामुळे सगळ्याच विद्यार्थ्यांची निवड करणं शक्य नव्हतं. म्हणून त्यातल्या त्यात बिकट परिस्थितीवाला होतकरू विद्यार्थी आम्ही शोधत होतो. पोरांच्या अडचणी ऐकून आम्हालाच अपराधी वाटत होतं. प्रश्न विचारतानाही संकोच वाटत होता. मुलं भडाभडा बोलत होती. जे बोलत नव्हते त्यांची परिस्थिती बोलत होती. पार लांबच्या गावावरून पॅसेंजर ट्रेनने रात्रभर प्रवास करून एक विद्यार्थी आलेला होता. चुरगळलेले मळके कपडे. रेल्वे स्टेशनवर उतरल्यावर केस ओले करून काढलेला केसांचा चापट भांग. पहाटे चार वाजता स्टेशनात येऊन झोपला. सकाळी उठून रेल्वे स्टेशनपासून दहा-बारा कि. मी. अंतर पायी आलेला. गावाकडे घरी अत्यंत वाईट परिस्थिती. पण शिकण्याची जिद्द नि आत्मविश्वास त्याच्यात जाणवत होता. फार प्रश्न विचारण्याची गरजच नव्हती.

मुलाखती संपत आल्या होत्या. बराच वेळ झाला होता. एक शेवटचा विद्यार्थी आत आला. त्याचं नाव सुरुवातीला पुकारून झालं होतं, पण तो उपस्थित नव्हता. उशिरा पोहोचल्यामुळे त्याला शेवटी बोलावलेलं होतं. त्याच्या डोळ्यांत विलक्षण चमक होती. छोटय़ा गावातून आलेला असल्यामुळे थोडासा संकोचलेला, लाजलेला होता. पण बोलता बोलता खुलला. छान बोलायला लागला. त्याची ग्रामीण ढंगाची लयदार भाषा होती. लेखक होणं हे त्याचं स्वप्न होतं. म्हणून तो विद्यापीठात शिकायला आला होता. सोबत जिल्हा दैनिकांत छापून आलेल्या कथांची कात्रणं होती. कथालेखन स्पर्धेत द्वितीय पुरस्कार मिळालेलं प्रमाणपत्र होतं. आम्हीही त्याच्या लेखनाला दाद दिली. तो अधिकच खुलला. 'सर, आपल्याला तुमच्यासारखा प्राध्यापक व्हायचंया.. अन् खूप गोष्टी लिव्हायच्यात. म्हणून मी इथं आलोया. राह्य़ाची-खायाची सोय झाली ना मंग फिकीर नाही. लागलं तर मी एसटीडीवर काम करीन, नाहीतर पेपर वाटीन.' त्याचा निर्धार पक्का होता. त्याच्या परिस्थितीचा नेमका अंदाज घेण्यासाठी वडिलांच्या व्यवसायाची चौकशी केली. तो जरा हळवा झाला. म्हणाला, 'माय-बाप दोघंबी मजुरी करत्यात. पण आम्ही वायलं राहतो. माय-बापानं आम्हाला घराबाहीर काढलंया.' आमच्या डोक्यात प्रश्न आला- आम्हाला म्हणजे कोणाकोणाला घराबाहेर काढलंय? सगळ्या भावा-बहिणीला? त्यानं थोडंसं लाजून उत्तर दिलं, 'माझंवालं बारावीलाच लगीन झालंय. मला अन् बायकोला घराबाहेर काढलंया.' गंमत म्हणजे घराबाहेर काढण्यासाठी मालमत्तेचे किंवा इतर कोणते वाद नव्हते. माय-बापाच्या मजुरीवर घर चालत होतं. घर म्हणजे झोपडपट्टीतल्या पत्र्याच्या दोन खोल्या. माय-बापाच्या मते बी. ए. झाल्यावर पोरानं मिळंल ती नोकरी धरावी. बायकोच्या मते, नवऱ्यानं अजून  शिकावं. घरात दोन गट पडले. सुनेमुळं एकुलतं एक पोरगं बिघडलं म्हणून माय-बापानं भांडण काढलं. शेवटी त्यांना घराबाहेर काढलं. ही तरुण पोरगीही मोठी जिद्दीची. नवऱ्याला घेऊन वेगळी झाली. एका खोलीत संसार थाटला. स्वत: मजुरीला जाऊ लागली. बिडय़ा वळू लागली. आणि नवऱ्याला शिकायला पाठवलं. त्या पोरीची जिद्द आणि त्या विद्यार्थ्यांचा लेखक होण्याचा संकल्प आम्हाला प्रभावित करून गेला.

त्यानं कथेचा 'गोष्ट' असा उल्लेख करणं मला फार भावलं. 'कमवा आणि शिका' योजनेत काम करीत त्यानं अभ्यास सुरू केला. नियमित तासाला हजर असायचा. चर्चेत सहभागी व्हायचा. विभागाच्या वेगवेगळ्या कार्यक्रमांत सक्रिय असायचा. त्याला पडणारे प्रश्न वर्गात मोकळेपणाने विचारायचा. गोष्टी लिहिणं सुरूच होतं. दरम्यान, त्यानं वेगवेगळी नियतकालिकं नेऊन वाचायलाही सुरुवात केली होती. आता त्याला चांगल्या अंकांतून गोष्टी प्रकाशित करण्याचे वेध लागले होते. बोलता बोलता एकदम शून्यात नजर नेण्याची त्याची लकब वेगळीच होती. कशाबद्दलच त्याने कधी तक्रार केली नाही. कुठल्या तरी कथाकथन स्पर्धेत सहभागी झाला. बक्षीस मिळालं नसल्याची बातमी शांतपणे स्वत:च येऊन सांगितली. एकूण सगळा साहित्यव्यवहार तो समजावून घेत होता असं वाटत होतं. नवोदित लेखक व सर्वाशी संवादी असणारा विद्यार्थी म्हणून प्राध्यापक मंडळीही त्याच्यावर खूश होती. त्यालाही त्याच्या लेखकपणाचा अभिमान होता. त्यात उत्साहाचा भाग असला तरी त्याच्या कथांमध्ये उद्याच्या चांगल्या लेखनाच्या अनेक सुप्त शक्यता होत्या. त्याची ग्रामीण भाषेची समज उत्तम होती. त्याच्या डोळ्यांतली निरागसता आश्वासक होती.

सगळं व्यवस्थित सुरू असतानाच तो एकदम तासाला येईनासा झाला. रोज काहीतरी निमित्त काढून भेटणारा हा विद्यार्थी आठ दिवस दिसलाच नाही. वर्गातल्या इतर मुलांकडे चौकशी केली तर तो हॉस्टेललाही नसल्याचं कळलं. 'कमवा आणि शिका'च्या कामातही तो गैरहजर होता. कदाचित आजारी पडला असेल, घरी काही अडचण असेल म्हणून आम्हीही काही दिवस वाट पाहिली. पण महिना उलटला तरी त्याचा पत्ता नाही. काही खबर नाही. अनेक अडचणींमुळं खेडय़ांतून आलेली काही मुलं अध्र्यातूनच गावी निघून जातात. बऱ्याचदा कौटुंबिक अडचणी असतात. म्हणजे प्रामुख्याने आर्थिक अडचणच असते. एवढं मोठं झालेलं पोरगं कमवायचं सोडून शिक्षणच घेतंय, ही कल्पना अशिक्षित माय-बापांना पचत नाही. या विद्यार्थ्यांला तर आर्थिक अडचण होतीच. कारण त्याची बायको स्वत: मजुरी करून घर चालवायची. पण नेमकं काय कारण घडलं, ते काही कळेना. न राहवून शेवटी त्याच्या जुन्या कॉलेजातल्या माझ्या ओळखीच्या प्राध्यापक मित्राशी संपर्क केला. हे प्राध्यापक त्याला बी. ए.ला शिकवायला होते. शिवाय त्याच्या होतकरूपणाचं त्यांनाही कौतुक होतं. तालुक्याचं छोटं गाव. प्राध्यापक मित्राने विद्यार्थ्यांना घरी पाठवून आमच्या बेपत्ता झालेल्या विद्यार्थ्यांची माहिती घेतली. मिळालेली माहिती धक्कादायक होती.

हा आमचा कथाकार विद्यार्थी कुणालाही न सांगता एक दिवस विद्यापीठ सोडून गावाकडे निघून गेला होता. कारण नवऱ्याच्या शिक्षणासाठी स्वत: मजुरी करणारी त्याची बायको गरोदर होती. नवऱ्यानं शिक्षण सुरू ठेवावं म्हणून सासू-सासऱ्याशी भांडण घेणारी त्याची बायको एकटी राहायची. गरोदर असतानाही सहा महिने ती मजुरीवर कामाला गेली. पण आता दोन जीवाच्या त्या पोरीला काम शक्य होईना. घरी कोणी मदतीला नाही. माहेरीही गरिबी. सगळे मोलमजुरी करणारे. नाइलाजाने नवऱ्याला निरोप पाठवला आणि हा लेखक विद्यार्थी बोऱ्याबिस्तारा गुंडाळून गावाकडे निघून गेला होता. जाण्याशिवाय त्याला पर्यायही नव्हता. काहीतरी व्यक्त करू पाहणारा एक विद्यार्थी हजेरीपटावरून कमी झाला.

त्यानंतर पाचेक वर्षांनंतर हा विद्यार्थी भेटायला आलेला होता. एकूण रागरंगावरून त्याचं सगळं व्यवस्थित सुरू आहे असं दिसत होतं. राजकारणी लोकांसारखे स्टार्च केलेले पांढरे कपडे. खिशात वाजणारा मोबाइल. (दहा-पंधरा मिनिटांत दोनदा केबिनबाहेर जाऊन आलेले कॉल त्याने घेतले होते.) सोबत कपाळावर भलामोठा टिळा लावलेला एकजण होता. तो मोकळं बोलत होता, पण मध्येच शून्यात जाऊन बघण्याची त्याची सवय आता राहिलेली नव्हती. मीच कथालेखनाची आठवण काढली. त्याने थेट उत्तर दिलं, ''सर, ते लई अवघड काम झालंया आता.'' मी कारण जाणून घ्यायचा प्रयत्न केला तर त्यानं एका वाक्यात नेमकं उत्तर दिलं, ''सर, गोष्टी लिव्हायच्या म्हणजे तळ निर्मळ पाहिजे. आपलं पाणी आता लई गढूळ झालंया.'' मी काय समजायचं ते समजलो. त्याच्या बोलण्यावरून बऱ्याच गोष्टी लक्षात आल्याच होत्या. बिकट परिस्थितीत याला पैशाची गरज होती. स्थानिक राजकीय नेत्यानं याला मदत केली. वर उचलण्यासाठी याचा हात धरला आणि त्याच्या पायाखालचा रस्ताच गायब केला. सगळेच संदर्भ बदलून गेले. त्याचं आडवंतिडवं वाढलेलं शरीर आणि डोळ्यांतली हरवलेली निरागसता लक्षात येत होती. त्याच्या घडय़ाळाचा सोनेरी पट्टा अधिकच चमकत होता. त्याच्या गोष्टी जन्माला येण्याआधीच तूर्त तरी मरून गेलेल्या होत्या.
- दासू वैद्य

गळा दाबल्याने गाणे अडते का?

प्रिय पेरूमल मुरूगन,
स्वत:मधील लेखकाचं मरण घोषित करणाऱ्या मित्रा, आपला नियमित पत्रव्यवहार होता.. आपण कुठल्यातरी लिटररी फेस्टिव्हलला एकदा भेटलो होतो.. माझ्या कवितांचे तू तामिळमध्ये अनुवाद केले होतेस.. तुझं लेखन वाचून मी तुझा फॅन झालेला होतो.. तू माझ्यासाठी खादीचे झब्बे पाठविले होतेस.. मी तुला आमच्याकडची हिमरू शाल भेट दिलेली होती.. असं काही काही घडलेलं नव्हतं. तरीही मी तुझ्याशी सलगी करतोय. एकेरी संबोधून नसलेला दोस्ताना प्रस्थापित करू पाहतोय. त्याचं कारण तू लेखक आहेस. स्वत:चं मरण घोषित करणारा लेखक. रस्त्याने जाताना अचानक एखादी प्रेतयात्रा समोर येते. आपले सहजपणे हात जोडले जातात. तेव्हा मृत व्यक्ती आपल्या ओळखीची असतेच असं नाही. मानवी प्रजातीतील एक सदस्य गेला म्हणून त्याच्या निर्वाणाप्रती आपण आदरभाव व्यक्त करतो. इथं तर लिहिणारा एक सर्जनशील लेखक मेलाय. गाय मरणं वाईटच; पण त्यातही दुभती गाय अवेळी मरणं अधिक त्रासदायक असतं.

चकाचक रस्त्याच्या कडेला मरून पडलेलं कुत्रं एकदम नजरेत येतं, तशी परवा अनेक बातम्यांच्या गराडय़ातील तुझ्या मरणाची बातमी ठळक नजरेत भरली. तुझा फोटो प्रथमच पाहिला. ज्याच्या चेहऱ्यानिशी फोटो छापून आलाय तो जिवंत आहे. पण ज्याचा फोटोच काढता येत नाही त्या लेखकाचा मृत्यू झालाय. लेखक अनेक मरतात. लोकांना गोळा करून मृत लेखकाला श्रद्धांजली वाहिली जाते. असल्या-नसल्या संदर्भासहित भाषणं ठोकली जातात. काहीजण लेखक मेल्यानंतरच त्याचं मोठेपण मान्य करतात. बऱ्यापैकी प्रसिद्ध लेखक असेल तर एखाद्या रस्त्याचं नामकरणही केलं जातं. पण इथं रूढ अर्थानं लेखकाचा मृत्यू झालेला नाहीए, तर एका पेरूमल मुरूगन नावाच्या प्राध्यापकाने स्वत:मधील लेखकाचा मृत्यू घोषित केला आहे. किती अनोखी घटना आहे! अपेक्षेप्रमाणे या घटनेची बेसुमार नोंद घेतली गेली. कारण त्यात बातमीमूल्य जबरदस्त होतं. तू ज्याच्या देहात निवासाला होतास त्यांचा फोटो बातमीसह झळकला. अग्रलेखांचे रकाने भरभरून वाहिले. इलेक्ट्रॉनिक माध्यमाला तर खपावू स्टोरी मिळाली. टीव्हीवर तज्ज्ञ लोक मनसोक्त 'चर्चा-चर्चा' खेळले. म्हणजे चांगलाच चघळला गेलेला विषय! त्याबद्दल मी काय नवीन लिहिणार? पण मनातून वाटलं, तुला लिहावं आणि व्हावं मोकळं. ज्याच्यासाठी लिहितोय तो तर मृत झालाय! मग हे वाचणार कोण? समजा, हा मजकूर मी तुझ्या जुन्या पत्त्यावर पाठवला तर प्रा. पेरूमल मुरूगन नावाचे गृहस्थ हे पत्र तीव्र तिटकाऱ्याने नाकारतीलच. हे पत्र घेऊन त्यांच्या दारी गेलेल्या कुरिअरवाल्याला 'इथं कुणी लेखकबिखक राहत नाही..' असं तुसडं उत्तर मिळण्याची शक्यता आहे. ठीकय. बऱ्याचदा आपण ज्याच्यासाठी लिहितो, तिथपर्यंत लिहिलेलं पोहोचत नाही. तरीही आपण लिहितो, कारण आपल्याला लिहून हलकं वाटतं. म्हणून मीसुद्धा लिहितोय.

मित्रा, आपल्याला परदेशातील फुटकळ लेखकही माहीत असतात. बोलताना आंतरराष्ट्रीय लेखकांचे संदर्भ पेरणं हा आताशा स्टेटस सिंबॉल आहे. पण आपल्या भारतीय भाषेतील लेखनाबद्दल मात्र उदासीनताच दिसते. साहजिकच त्यामुळे तुझं साहित्य वाचण्याची आम्ही तसदी घेतलेली नाहीए. तुला मरणदारी घेऊन जाणारी चर्चा झाली ती तुझं लेखन इंग्रजीमध्ये अनुवादित झाल्यावरच. 'मधोरूबागन' नावाची तुझी साहित्यकृती तामिळ भाषेत प्रथम प्रकाशित झाली. तामिळ वाचकांनी, समीक्षकांनी तिचं बऱ्यापैकी स्वागतही केलं. सगळं काही गुण्यागोविंदानं सुरू होतं. ही कादंबरी अनुवादित होऊन इंग्रजीत गेली आणि संस्कृती दुखावली गेली. या लेखनाला विरोध सुरू झाला. बाकी सर्वजण 'हाताची घडी, तोंडावर बोट' ठेवून चूप होते. लेखकाच्या जयंत्या-पुण्यातिथ्या साजऱ्या करणाऱ्या कुठल्याही साहित्य संस्थेनं साधी नोंदही घेतली नाही. कुणी निषेध नोंदवला नाही. शेवटी तुलाच लेखी माफी मागावी लागली. पुस्तकाच्या न खपलेल्या प्रतींवर बंदी आली. विक्री थांबली. या मन:स्तापातूनच 'वाचकांनी त्यांच्याजवळच्या प्रती जाळून टाकाव्यात,' अशी विमनस्क घोषणा तू केलीस. शिल्लक प्रतींच्या नुकसानीपोटी प्रकाशकालाही भरपाई देण्याचं तू जाहीर केलंस. या वादंगाला कारणीभूत ठरला- तुझ्या कादंबरीचा 'वन पार्ट वुमन' हा इंग्रजी अनुवाद. तामिळ भाषेत शांत राहिलेला विषय इंग्रजीत मात्र पेटला. यावरून काही निष्कर्ष काढता येतील.
१) तामिळ भाषेतील वाचक इंग्रजी भाषेतील वाचकापेक्षा अधिक उदार आहेत.
२) तामिळ भाषेतील वाचकांना भारतीय संस्कृतीबद्दल चिंता नाही.
३) तामिळ भाषेतील वाचक-समीक्षकांना साहित्यातील काहीच कळत नाही.
 ४) तामिळ वाचक गांभीर्यानं वाचत नाहीत.
यापैकी कुठल्याही निष्कर्षांला आपण सहमती दर्शविली तरी तू घोषित केलेलं मरण स्वीकारावंच लागतं. भोवतालच्या परिस्थितीनं घडवून आणलेली ही लाजिरवाणी घटना आहे.

अशा घटना आपल्याला नवीन नाहीत. या उन्मादामुळेच तुकारामाला स्वत:च्या अभंगाचे चोपडे नदीत बुडवावे लागले होते. तेंडुलकरांच्या 'सखाराम बाईंडर' नाटकामुळे विवाहसंस्था धोक्यात आलेली होती. 'पाथेर पांचाली'सारख्या कलाकृतीवर भारतातल्या दारिद्रय़ाचं भांडवल केल्याचा आरोप झाला होता. 'बॅण्डिट क्वीन' चित्रपटातील एका स्त्रीवर समूहाने केलेल्या अत्याचाराच्या दृश्याला संस्कृतिरक्षकांनी विरोध केला होता. म्हणजे देशातलं वळवळणारं दारिद्रय़ चालेल, पण ते पडद्यावर दिसता कामा नये. दिवसाउजेडी आजही बाई ओरबाडली जाते, पण पडद्यावरच्या, पुस्तकातल्या दृश्यातून मात्र संस्कृती धोक्यात येते. अर्थात तुला हे सर्व माहीत आहेच. पण या यादीत आपण जाऊ, असा विचार तूही केला नसशील. खरं सांगतो, एखाद्याला आपल्या आतल्या लेखकाला असं मनावर दगड ठेवून मारून टाकावं लागेल असं मलाही वाटलं नव्हतं.

लेखक मित्रा, खरं तर मेलेल्या लेखकाला उद्देशून लिहायचं ही कल्पना मेलेल्या पितरांना पिंडदान करण्यासारखीच श्रद्धाळू आहे. लिहायला बसलो. भाबडेपणा वाटला. बेत रद्द केला. पण तुझा मरणगंध काही डोक्यातून जाईना. म्हणून पुन्हा लिहायला बसलो. तशी तुझी एकही ओळ मी वाचलेली नाहीए. एक तर मला तामिळ भाषा येत नाही. या तामिळ भाषेवरून सहज आठवलं. वीस वर्षांपूर्वी राष्ट्रीय युवक महोत्सवासाठी म्हणून मदुराईला आलो होतो. विद्यापीठाच्या कलावंतांचा संघच होता. त्यावेळी चेन्नईला सदिच्छा भेट दिली होती. चेन्नईच्या बीचवर फिरताना एक खारीमुरीवाला दिसला. आम्हाला चेन्नईचे खारीमुरे खाण्याची इच्छा झाली. पण त्या खारीमुरीवाल्याला इंग्रजी किंवा हिंदी भाषा येत नव्हती. मराठीचा तर प्रश्नच नाही. आम्हाला तामिळ येत नव्हतं. संवादच खुंटला. शेवटी आम्ही शब्दांची भाषा बाजूला ठेवली आणि खाणाखुणांची भाषा वापरात आणली. आम्ही खारीमुरीवाल्याला दोन रुपये दाखविले, तर त्याने एक माप दाखवलं. आम्ही पाच रुपये दाखविले, तर त्याने एक मोठं माप दाखवलं. असा आमचा संवाद झाला होता. तुझ्या मातीतल्या भाषेतली गंमत आहे म्हणून सांगितली. आता तुला कुठल्याही भाषेशी काय देणंघेणं असणार म्हणा! मेल्यावर भाषेचा काय संबंध? जगण्यासाठी भाषा लागते.

मरणारा सुटतो, पण मागे उरलेल्यांचा जाळभाज सरत नाही. तू मेलास, पण जाताना अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा प्रश्न आमच्यासाठी तसाच शिल्लक ठेवून गेलास. त्या 'मधोरुबागन' कादंबरीत तू रूढ परंपरेबद्दल लिहिलंस. काही लोकांना तो अपमान वाटला. ते ठीक. पण बोलणाऱ्याचं तोंड कायमचं बंद केलं जाणार असेल तर कुठली अश्मयुगीन संस्कृती पुन्हा अवतरणार आहे, माहीत नाही. असा उलटा प्रवास कायम राहिला तर एक दिवस आपल्याला पुन्हा शेपूट फुटेल. वेदना वेदनाच असते. तरीही चप्पल हरवलेल्या दु:खी माणसाला पाय तुटलेल्या माणसाची गोष्ट सांगण्याची आपल्याकडे प्रथा आहे. तुलना म्हणून नाही, पण सहज सांगतोय. आमच्याकडे बऱ्याच दिवसांपासून शेतकऱ्यांच्या आत्महत्येची साथ आलेली आहे. परवा तर पस्तीस हजार कर्ज फेडता येईना म्हणून एका तरुण शेतकऱ्यानं गळफास घेतला. आधी शेतकरी म्हटलं की डोळ्यासमोर नांगरधारी शेतकरी यायचा. आता फासासकट शेतकरी दिसतो. या शेतकऱ्यांची पंचाईत आहे. परिस्थितीचा जाच सारखाच असताना त्याला त्याच्यातील शेतकऱ्याचं मरण घोषित करता येईना. त्याला स्वत:च्या देहासह लटकवून घ्यावं लागतंय. जगण्याचा मूलभूत अधिकारच संपतो. कृपया, तुझ्या मरणाची त्याच्या मरणाशी तुलना करतोय असं समजू नकोस. तुझा मन:स्ताप, यातना यांचा आदर ठेवूनच सांगतोय. शेतकरी जिवानिशी मरतो. तू मरणाची घोषणा केलेली आहेस. गेलेला जीव परत येऊच शकत नाही. केलेली घोषणा मात्र परत घेता येऊ शकते. तुझी घुसमट, तुझा त्रागा, तुझी वेदना मी समजू शकतो. त्यामुळे फुकाचा सल्ला द्यायचा अधिकार मला नाहीए. तरीही सांगतो- तू मेला नाहीस आणि मरणारही नाहीस. आई जेव्हा स्वत:च्या लेकराला रागात 'मेल्या' असं म्हणते तेव्हा लेकराप्रतीच्या आसक्तीचा तो आविष्कार असतो. कुठल्या आईला आपलं मूल मरावं वाटेल? तसा तुझा हा मरण घोषित करणारा तीव्र निषेध आहे. तो रास्तही आहे. तू मेल्यानंतर इथं कुणाचं अडणार आहे? स्वत:च नद्या बुजवून पुन्हा स्वत:च नद्यांचा शोध लावणारे हे लोक आहेत.

मित्रा, माणसाला मारता येतं, विचाराला नाही मारता येत. विहीर बुजवता येते, पण पाण्याला संपवता येत नाही. झरे वळवता येतात, पण थांबवता येत नाहीत. कंदिलावरच्या वाढत्या काजळीनं ज्योत दिसेनाशी होते, पण विझत नाही. मला खात्री आहे- तू हे सर्व जाणतोसच. मला एक खरं खरं सांग. तू घोषित केलंयस म्हणून तुझ्यातला लेखक खरंच मेलाय? तुझी संवेदना मेलीय? तुला कशाबद्दल काहीच वाटत नाहीए?
मला माहीत आहेत- तुझे शिवशिवणारे ओठ आणि अनावर झालेली लेखणी. पुन्हा तुला लाल-पोपटी पानांची पालवी फुटेल. तुझ्या कथेची, कवितेची आम्ही वाट पाहत आहोत. तूर्त लिहिण्या-वाचण्याची शिसारी आली असेल तर किमान पुढील दोन ओळी वाचच वाच. लेखनासाठी शुभेच्छा. घरी सर्वाना नमस्कार. वाचतोयस नं..
'वाढलेल्या काजळीने
ज्योत विझते का?
गळा दाबल्याने
गाणे अडते का?'
तुझाच-
शेपूट फुटण्याच्या भीतीने
टरकलेला एक कवी

-दासू वैद्य

रंग

विद्यापीठाचं रिसर्च हॉस्टेल. १९९२-९३ चा काळ. विज्ञान शाखेतले संशोधक संख्येने जास्त. त्यात भाषा, सामाजिक शास्त्रातील आम्ही काही बोटावर मोजण्याएवढेच. पण सगळे मिळूनमिसळून. पेपरवाचन, टीव्ही, गप्पांचं गुऱ्हाळ, बऱ्याचदा जेवण.. सारं काही एकत्र. हॉस्टेलची प्रत्येक खोली म्हणजे एक स्वतंत्र प्रकरण. इथिओपियाचा रझ्झाक, सोमालियाचा पॅट्रिक, केरळचा थॉमस, वारकरी असणारा गात, अबोल राहणारा खामकर, जाता-येता सगळय़ांना हटकणारा शिंदे, आंघोळीच्या वेळी अंगाला साबण लावून कॉरिडॉरमध्ये फिरणारा रफिक, प्रत्येकाच्या कानाशी हितगुज करणारा देशपांडे, निवांत असणारा मुंढे, प्राण्यांच्या आवाजाची हुबेहूब नक्कल करणारा अनिल, विद्यापीठाच्या युवा राजकारणात व्यस्त असणारे किरण व आण्णा, हळूच गादीखालच्या कविता काढून वाचून दाखवणारा कांबळे असे कितीतरी. या सर्वात वेगळा होता तो केरळचा श्रीनिवासन. बॉटनीमध्ये संशोधन करायचा. तोडकीमोडकी हिंदी. इंग्रजी मात्र मधाळ बोलायचा. सदान्कदा गडबडीत असायचा. हॉस्टेलसमोरच्या मैदानात सकाळ-संध्याकाळ आमच्या गप्पा रंगायच्या. श्रीनिवासन 'येस..येस' करीत यायचा. थोडंसं थांबल्यासारखं करून मोठय़ा आदबीनं परवानगी घ्यायचा, 'शाल आय मुव्ह?' आणि लॅबमध्ये निघूनही जायचा.

श्रीनिवासन दिसायचा हिंदी मालिकेतल्या पात्रासारखा. केव्हाही टापटीप. शर्टची बटनं गळय़ापर्यंत लावलेली. विस्कटलेले केस नाहीत की चुरगळलेले कपडे नाही. केसांचा देवानंदसारखा फुगा. पुराणातल्या देवांना दाढी-मिशा नसतात तशी सदोदित क्लीन शेव्ह. इस्त्री केलेले सोबर रंगाचे कपडे. नेहमी इन् शर्ट. पायात चकाकणारे काळे बूट. भित्रेपणा वाटावा अशी विनयशीलता. त्यामुळे श्रीनिवासन खूपदा थट्टेचा विषय व्हायचा.

बऱ्याचदा संध्याकाळी विद्यापीठ गेटजवळच्या मोनू हॉटेलमध्ये अड्डा बसायचा. गरमागरम, कडक गोल्डन चहा पिणाऱ्यांची तिथे गर्दी असे. या हॉटेलला लागून असणाऱ्या एसटीडी बूथवर फोन करणाऱ्यांचाही चांगलाच राबता होता. तेव्हा मोबाइल नव्हते. हॉस्टेलवर राहणाऱ्यांना घरच्यांशी किंवा बाहेर कुठं बोलायचं असेल तर एसटीडीवरूनच बोलावं लागे. आम्हीही तिथूनच फोन करायचो. श्रीनिवासन चहा प्यायचा आमच्यासोबत; पण फोन लावायला मात्र लांबच्या दुसऱ्या एसटीडी बूथवर जायचा. काही दिवसांनंतर श्रीनिवासनचं मुद्दाम लांबच्या एसटीडीवर जाणं आम्हाला उगीच खटकू लागलं. आमच्या एसटीडीवाल्याशी श्रीनिवासनचं काही बिघडलं असण्याची सुतराम शक्यता नव्हती. कारण त्याचा कोणाशीच वाद होणं शक्य नव्हतं. त्याला काही खासगी हितगुज करायचं होतं असंही नव्हतं. फोनचं बिलही सगळीकडे सारखंच होतं. इतरही काही कारणं सापडेनात. उलट, आमचा एसटीडीवाला हसतमुख आणि सुस्वभावी होता. पण श्रीनिवासन शेवटपर्यंत आमच्या एसटीडी बूथवर आलाच नाही. खूपदा मागे लागल्यावर त्याने एकदा न येण्याचं कारण सांगितलं. कारण ऐकून आश्चर्यापेक्षा जास्त हसू आलं. काय होतं कारण? या एसटीडी बूथवर लाल रंगाचा फोन होता. या लाल रंगाच्या फोनमुळे श्रीनिवासन अस्वस्थ व्हायचा. त्याला बोलणं सुचायचं नाही. त्यामुळे श्रीनिवासन हा एसटीडी बूथच टाळायचा. ही बातमी हळूहळू हॉस्टेलमध्ये पसरली. प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने श्रीनिवासनची टर उडवली. कुणी त्याला खोदून प्रश्न विचारले. कोणी '' 'रेड वाइन' चालेल का?'' असं विचारलं. एकाने त्याला लाल रंगाचा पेन भेट दिला. बिचाऱ्याला जरा त्रासच झाला. श्रीनिवासन मात्र शांत राहिला. लाल रंगाच्या फोनमागची गोष्ट त्याच्या महाकाय मौनाखाली दबून गेली. पुढं रिसर्च संपवून विनम्रपणे 'शाल आय मूव्ह?' म्हणत श्रीनिवासन गावी निघून गेला. आम्हीही पोटापाण्याच्या शोधात पांगलो.

परवा 'खेळ'चा २०१४ चा दिवाळी अंक हाती आला. एका कवितेजवळ थांबलो. बोलीभाषेतला संवाद असलेली 'गायीचे डोळे' ही विनायक पवारांची कविता..
'ए.. माय
आत्ताच जेवलास ना मुडद्या
भाकर नई माघत वं
मंग जिव मागतो क काय मव्हा?
ए माय.. ते हिरवं लुगडं
तू नेसत जाऊ नको
काहून रे बाप्पा?
माये तुपल्या अंगावरचं
हिरवं लुगडं पाहून
गायीचे डोळे चमकतेत.'
ही कविता वाचून पुन्हा एकदा श्रीनिवासन आठवला. दुष्काळग्रस्त भागातल्या झोपडीतला माय-लेकाचा संवाद. दुष्काळात करपलेल्या खोपटात लेकरानं हाक मारली म्हणजे तो भाकरी मागेल याची मायीला भीती आहे. लेकराचं मात्र मायीकडं वेगळंच मागणं आहे. हिरव्या रंगाचं लुगडं मायीनं नेसू नये असं मुलाला वाटतंय. ठिगळाचं का होईना, पण मायीनं नेमकं हिरव्या रंगाचंच लुगडं नेसलंय. मुलाचा असलेला हिरव्या रंगाला विरोध कुणाला आश्चर्यकारक आणि गमतीदार वाटू शकतो. (जशी लाल रंगाचा फोन बघून श्रीनिवासनला येणारी अस्वस्थता हास्यास्पद ठरली होती.) हिरव्या लुगडय़ाला विरोधाचं कारण मुलगा एका वाक्यात सांगतो, 'माय, तुपल्या अंगावरचं हिरवं लुगडं पाहून गायीचे डोळे चमकतेत.' हे कारण कळल्यावर आपला अस्वस्थ श्रीनिवासन होतो. दुष्काळी परिस्थिती. खाण्यापिण्याची मारामार. जनावरं चारा छावणीत नेऊन बांधावीत, नाहीतर खाटकाला विकून टाकावीत. माणसाला प्यायला पाणी नाही; मग ढोरांना चारा कुठून मिळणार? बिचारी मुकी जनावरं मरणघटका मोजत बसून आहेत. अशावेळी हिरवा रंग दिसला तरी ढोरांना चाऱ्याचा भास होऊ शकतो. भुकेची कळ तीव्र होऊ शकते. गाईच्या डोळ्यात भुकेची वेदना मुलाने पाहिलेली आहे. या भीतीपोटी कवितेतला मुलगा मायीला हिरवं लुगडं नेसायला मज्जाव करतोय. म्हणजे एखाद्या रंगाचा संदर्भ किती जीवघेणा असू शकतो!

भरतमुनींनी त्यांच्या नाटय़शास्त्रात नाटक करणाऱ्यांसाठी काही नियम सांगितले आहेत. त्यातला एक नियम म्हणजे नाटय़प्रयोगात रंगमंचावर भोजनाचं दृश्य दाखवू नये. भरतमुनींच्या मते, रंगमंचावर प्रयोग सुरू असताना पात्र उघडपणे पदार्थाचा आस्वाद घेऊ लागले तर प्रेक्षकांच्या भावना चाळवल्या जाऊ शकतात. नाटय़ास्वादात व्यत्यय येऊ शकतो. खरं तर आजच्या नाटय़प्रयोगांचा विचार करता नाटकाला आलेले बरेच प्रेक्षकच नाटक सुरू असताना काय काय खात असतात. कदाचित पुढच्या रांगेतील प्रेक्षकांच्या या खाऊगिरीमुळे रंगमंचावरच्या कलावंतांच्या भावना चाळवल्या जाऊ शकतात. त्यामुळे भरतमुनींच्या नियमांत 'रंगमंचावर व प्रेक्षागृहात प्रयोग सुरू असताना कुणीच कुठलेही खाद्यपदार्थ खाऊ नयेत' अशी सुधारणा करण्याची वेळ आलेली आहे. थोडक्यात काय, तर रंग, गंध असेही त्रासदायक असू शकतात. रंगमंचावर खाण्याचे दृश्य दाखवू नये असं सांगणारे भरतमुनी असोत किंवा कवितेतील मायला हिरवं लुगडं नेसू नको म्हणणारा मुलगा असेल; परिस्थिती वेगळी असली तरी दोघांचीही भूमिका सारखीच आहे.

रंगांना आपले वैयक्तिक संदर्भ चिकटतात. मग रंग आवडते होतात. कधी नावडते होतात. काही रंगांना आल्हाददायक ठरवलं जातं. काहींना त्रासदायक ठरवलं जातं. पण रंगांचे संदर्भ येतच राहतात. कवी वसंत आबाजी डहाके यांच्या कवितांमधून येणारे काळय़ा रंगाचे संदर्भ भीषण आहेत. काळोखाच्या निमित्ताने व इतर स्वरूपातही या कवितांमधून काळा रंग येत राहतो. काळी पाखरे, काळा सूर्य, काळय़ा काचेतून पाहावा, काळय़ा फुलांचा सडा, काळा गाढ रंग, काळय़ा घोडय़ांच्या टापा, पांढऱ्यावर काळे करणारे शब्द, काळसर पाण्यात, काळी कुरतड, काळा पक्षी, कोळशाच्या काळय़ा भुकटीनं, अज्ञाताचं काळं बोट कपाळावर टेकलं गेलं, जिभेवर काळ्या श्लेषाची कडवट चव, दहशतीचं काळं मांजर, दहशतीचा काळा खेकडा, काळय़ा रंगाचे जाड पडदे, काळय़ा बंद मोटारी, चरित्राच्या काळ्या मातीत, काळोखाची राजवट, धुरानं काळवंडलेलं आभाळ.. हा काळा रंग भोवताल व्यापतजातो. शेवटी बाजारात फक्त काळे कागद उरल्यामुळे दऊतभर पांढरी शाई शोधण्याची वेळ येते. डहाक्यांच्या कवितेत भरून राहिलेल्या काळय़ा रंगाची गोष्ट समजावून घेताना या कवीचं चंद्रपूर भागात गेलेलं बालपण समोर येतं. त्या भागातील कोळशाच्या खाणी.. सर्वत्र पसरलेली कोळशाची काळी भुकटी.. काळा धूर.. कवितेतून पुन:पुन्हा डोकावत राहतो. हा काळा रंग निग्रो कवी लँगस्टन ह्युजेस यांच्या कवितेत वेगळ्या स्वरूपात येतो. त्यांच्या एका कवितेची प्रत्येक ओळ आणि ओळीतला प्रत्येक शब्द- 'ब्लॅक.. ब्लॅक.. ब्लॅक' असाच आहे. शोषितांमध्ये घर करून बसलेली ही काळीकुट्ट जाणीव भयावह आहे. यावरती जाऊन बेन्झामिन मोलाईसे हा गोरा कवी काळ्यांची वेदना जाणून घेण्यासाठी रसायनाच्या मदतीने स्वत: काळा झाला. बदललेली काळी कातडी घेऊन स्वत:च्याच घरी गेला तेव्हा अपमानित झाला. तेव्हा त्याला काळ्या रंगाची वेदना कळली.  हे रंग बऱ्याचदा गोंधळात टाकतात. मुला-मुलींचे 'स्लॅम बुक' भरून देताना काहीही प्रश्न विचारलेले असतात. बुबुळाच्या रंगापासून ते जीवन कसं जगावं? अशा बेछूट प्रश्नांची उत्तरं भरायचं काम मला फार अवघड वाटतं. विचारलेला असतो- 'आवडता रंग?' माझा गोंधळ उडतो. कारण आभाळ भरून आल्यावर ढगांचा काळा रंग मला आवडतो. पण गावाकडच्या बोळीत लहान मुलांना भीती दाखवायला दबा धरून बसलेल्या अंधाराचा काळा रंग मला आवडत नाही. मग काळा रंग आवडता की नावडता? श्रावणातल्या पानांचा हिरवा रंग मला आवडतो. पण दवाखान्यातल्या आयसीयूमध्ये लावलेल्या पडद्याचा हिरवा रंग मला आवडत नाही. मग हिरवा रंग आवडता की नावडता? हे काहीही असो; पण ज्याचा पेरू आतून लाल निघायचा त्याला आम्ही भाग्यवान समजायचो.

पौर्णिमेच्या मध्यरात्री कमळाच्या तळ्यात एकसाथ कमळं उमलतात. त्याक्षणी संपूर्ण तळ्यात रंग कालवला जातो म्हणे. असे दृश्य मनोहर ओक नावाच्या मनस्वी कवीने अनुभवलेले असावे. म्हणूनच 'बगळा उडून जाताना.. थोडासा शुभ्र गलबला' अशी ओळ ते लिहू शकले. आपल्याभोवती पसरलेले अनेक रंग आपण पाहत असतो, अनुभवत असतो. पण एखादा रंग विसरताच येत नाही. एकदा तहसील कार्यालयात कामानिमित्त गेलो होतो. अनवाणी पायांनी एक खेडुत बेंचावर बसला होता. रापलेला चेहरा, विटलेले, विरलेले कपडे. कष्टकरी होता. कुणीतरी त्याला हाक मारली. हातातली कागदं सावरत तो उठून गेला. माझं सहज लक्ष गेलं. बेंचाखाली त्या खेडुताच्या पायाच्या जागी लाल रंग ठिबकलेला होता. सरकारी कार्यालयाची चकचकीत फरशी जखमी झालेली होती. फुटलेल्या टाचांतून लाल रंग ओघळलेला होता.
या लाल रंगाचं श्रीनिवासनच्या लाल रंगाशी काय नातं असेल?  

मु. पो. पंढरपूर

गावाकडच्या वाडय़ात लहानपणी आम्ही पोरं धिंगाणा करायचो. तेव्हा वैतागलेली भागीरथाआजी कापऱ्या आवाजात ओरडायची, 'एकदा मला त्या मणकर्णिका घाटावर नेऊन घाला. त्याशिवाय मला शांती मिळणार नाही. घटकाभर डोळा लागत नाही तर या पोरांचा धांगडधिंगा सुरू. उचल रे पांडुरंगा!' या स्वगतातलं मणिकर्णिका घाट हे काशी तीर्थक्षेत्री असणारं शेवटचं विश्रांतीचं स्थान होतं. काशीप्रमाणेच परंपरेनं डोक्यात रुतलेलं दुसरं स्थान म्हणजे पंढरपूर! पण इथं हात-पाय, डोळे धडधाकट असताना एकदा पांडुरंगाच्या पायांवर डोकं ठेवण्याची इच्छा पुन:पुन्हा व्यक्त व्हायची आणि गावाकडे आजही होते.

कुठलंही अवडंबर नसणारा, थेट दर्शन घेऊ देणारा हा गोरगरीबांचा देव. हा पांडुरंग आणि त्याचं मुक्काम पोस्ट असणारं पंढरपूर मराठी संस्कृतीत पार मिसळून गेलंय. एक सर्वव्यापी प्रतीक झालंय. संत मेळ्यानं या पंढरपुराला अधिक उजागर केलं. अभंगांतून, लोककथांतून, गाण्यांतून, चित्र-शिल्पांतून, उखाण्यांतून, नाटय़-चित्रपटांतून, कवितांतून हे पंढरपूर ध्रुवपदासारखं पुन:पुन्हा आवर्त होताना दिसतं. भीमसेन जोशी यांच्या आवाजातील 'तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल' ही रचना आपल्या डोक्याच्या घुमटात घुमत राहते. खडीसाखरेसारख्या कडक, पण कानात विरघळणाऱ्या प्रल्हाद शिंदे यांच्या आवाजातील 'चल गं सखे, चल गं सखे पंढरीला' आपल्याशी अधिक सलगी करतं. 'पाऊले चालती पंढरीची वाट', 'माझे माहेर पंढरी' अशी अनेक भक्तिगीतं लहानपणी लग्नमंडपांत, मंदिरांत, गणेश मंडळांत लावलेल्या कण्र्यातून गावभर ऐकू यायची. गावालगतच्या मळ्यातील मोटेचा आवाज किंवा मशिदीतल्या मुल्लाच्या आजानचा आवाज ऐकू यावा एवढय़ा शांत वातावरणात कण्र्यात वाजणाऱ्या या गाण्यांचं आम्हाला अप्रुप होतं. असा पंढरपुरी काढा भल्या लहानपणापासून पीत (ऐकत) गेल्यामुळे आता कुठेही 'पंढरपूर' शब्द भेटला की लांबच्या प्रवासात बालपणीचा वर्गमित्र भेटल्यासारखं वाटतं.

गावातलं विठ्ठल मंदिर तर नेहमीच गजबजलेलं. एक गोड आवाजाचे कीर्तनकार दरवर्षी गावात यायचे. विठ्ठल मंदिरात त्यांचं कीर्तन रंगायचं. गावातली सगळी मोठी मंडळी कीर्तनाला मोठय़ा नम्रतेनं हजर असायची. पोलीस पाटील, पाटील, सावकार, पैलवान, मास्तर, म्हातारे, आया-बाया असे सगळे सगळे भक्तिभावे कीर्तन ऐकायचे. आरंभी कीर्तनकाराच्या पाया पडायचे. कीर्तनाच्या आख्यानात लोक रंगून जायचे. ठरावीक वेळांनी श्रोत्यांना विठ्ठलनामाचा नामी डोस असे. कीर्तनकारासोबत श्रोत्यांचा आवाज मंदिरात घुमायचा.. 'विठ्ठल.. विठ्ठल.. विठ्ठऽऽल.. विठ्ठऽऽल.. विठ्ठल.. ठ्ठल.. ठ्ठल.. ठ्ठल..' आणि लोक पुन्हा ताजेतवाने व्हायचे. श्रावणात भागवत सप्ताह सुरू असे. भक्तिभावे पोथी ऐकली जाई. 'अथ प्रथमोध्याय: समाप्त:' असं म्हटल्यावर 'पुंडलिक वरदे हरी विठ्ठल' असा समूहस्वर घुमायचा. भल्या रामपाऱ्यात काकडआरतीच्या नावाखाली हरीचे नाव घेऊन पांडुरंगाला आळवले जाई. काहीच नसेल तर मंदिरात नामसप्ताह सुरू असे. आळीपाळीनं वीणा गळ्यात घेऊन नामसंकीर्तनाचा अखंड पहारा सुरू असे. असा हा विठूचा गजर आणि हरीनामाचा झेंडा कायम रोवलेला असे. 'ग्यानबा.. तुकाराम'च्या पावल्या रंगात येत. टाळ-मृदंगाच्या आवाजात एकजीव झालेली खडय़ा आवाजातील भजनं भल्या रात्रीपर्यंत सुरू असत.

गावात वारीची परंपरा होती. वारीला जाण्यासाठी अनेक अडचणी असत. ज्यांना दिंडीत वारीला पायी जाणं शक्य नव्हतं, ते एसटीनं पंढरपूर गाठायचे. बऱ्याच लोकांना आर्थिक अडचणी असायच्या. अशा वेळी कोणी घरातलं शिल्लक धान्य विकायचं. घोंगडी, शिलाई मशीन विकून पंढरपूरला गेलेले दोघेजण मला आजही आठवतात. काहींना जाणं शक्यच नव्हतं. हे लोक आपल्या गावालाच मनोमन पंढरपूर समजून 'विठ्ठऽऽल.. विठ्ठऽऽल.. ठ्ठल.. ठ्ठल..' करीत राहायचे. पुढं मला एक स्त्री भेटली. अरुण कोलटकरांच्या 'नगेली' कवितेत. तीसुद्धा पंढरपूरला जाऊ शकली नाही. ही स्त्री वेश्या आहे. देहविक्रीच्या धंद्यात तिचा जीव उबगला आहे. मोठय़ा हौसेनं ती पंढरपूरला निघते. भव्य स्टेशन बघूनच हरखून जाते. पण तिला तिच्या खिळखिळ्या शरीराचा भरोसा वाटत नाही. प्रवास झेपणार नाही म्हणून ती घरी परतते. काढलेलं तिकीट वाया जातं. परतताना पांडुरंगालाच, जमल्यास घरी ये, असं मनोमन निमंत्रण देते आणि स्वत:च्या घरी पांडुरंगाची वाट पाहत बसते. 'नगेली' कवितेतील पंढरपुराला निघालेली ही स्त्री शेवटी गेलीच नाही. अनेक कारणांनी अनेक जणांना पंढरपूरला जाणं शक्य होत नाही. अशा अनेक भक्तांना पंढरपुराबद्दल हुरहुर असणं स्वाभाविक आहे. पण आपल्यासारख्या इतर 'नगेल्या'नाही पंढरपुराबद्दल उत्सुकता असतेच. अशा नगेल्या उत्सुकाने एकदा डॉ. रा. चिं. ढेरे यांचा 'श्रीविठ्ठल : एक महासमन्वय' हा ग्रंथ जरूर वाचावा. (जसं आग्ऱ्याला जाण्यापूर्वी एकदा माधव आचवलांचं ताजमहालवरचं पुस्तक जरूर वाचावं.) एखाद्या देवाचा आणि देवस्थानाचा किती समूळ पाठपुरावा करता येतो याचं सुंदर उदाहरण म्हणजे ढेऱ्यांचा हा ग्रंथ आहे. पंढरपूरस्थित विठ्ठल हा लोकमानसात महासमन्वय झाला आहे. या संशोधनातील पंढरपुरी माहिती मोठी वाचनीय आहे. पंढरपूरचं पूर्वीचं नाव पांडुरंग क्षेत्र, पुंडरीक क्षेत्र, पौंडरीक क्षेत्र असं होतं. आताचं 'पांडुरंग' हे विठ्ठलाचं पर्यायी नाव पूर्वी क्षेत्रवाचक- म्हणजे गावाचं नाव होतं. 'पांडुरंग विठ्ठल' म्हणजे पांडुरंग क्षेत्रीचा विठ्ठल. पांडुरंगच का? तर संतांच्या दृष्टीनं विठ्ठल हा गोपालकृष्ण आहे. गाईच्या खुरांनी उधळलेल्या धुळीनं त्याचं सर्वाग धूसर झाल्यामुळं त्याला 'पांडुरंग' हे नाव लाभलं. असं 'पंढरपुरी' रहस्य ढेरे यांच्या शोधग्रंथातून साक्षात उलगडत जातं.

खरं तर हे पंढरपुरी आख्यान लागण्यासाठी कारणीभूत ठरला तो मराठी चित्रपट 'एलिझाबेथ एकादशी'! हिंदी चित्रपटांचं अनुकरण करण्याचं मराठी चित्रपटांतलं 'फॅड' एकदाचं संपलं. नवे रंगकर्मी नवनव्या आशयांत आंघोळ करून मराठी चित्रपटाकडे वळले आणि स्वत:चा चेहरा असलेला मराठी चित्रपट चर्चेत आला. या नव्या लोकांनी नवनवे प्रयोग केले. त्यामुळे मराठी चित्रपटांमध्ये आज चैतन्य आलंय. अशा प्रयोगशील दिग्दर्शकांपैकी परेश मोकाशी हे महत्त्वाचं नाव. दि. बा. मोकाशी यांचा प्रातिभ वारसा पुढं चालवणारे परेश मोकाशी हे 'मु. पो. बोंबिलवाडी' नाटकामुळे लक्षवेधी ठरले. 'हरिश्चंद्राची फॅक्टरी' या चित्रपटामुळं या दिग्दर्शकाचं वेगळेपण अधोरेखित झालं. याच मोकाशींचा 'एलिझाबेथ एकादशी' हा पंढरपुरी काढा प्यालेला मराठी चित्रपट! लेखिका मधुगंधा कुलकर्णीनी हा काढा मस्त आटवलाय. पडद्यावर चित्रपट सुरू होतो आणि आपण पंढरपुरात प्रवेश करतो. वाटतं, आपण चित्रपटाचं तिकीट काढलेलं नसून पंढरपूरच्या एसटीचंच तिकीट काढलंय. पंढरपूरच्या जत्रेतच नव्हे, तर गल्लीबोळांत आपण फिरत राहतो. या गल्लीबोळी पाहताना गावाकडच्या गल्लीबोळी आठवल्या. बोळींतून जिवाच्या आकांताने पळणारे ज्ञानेश, झेंडू पाहताना माजिद माजेदीच्या 'चिल्ड्रन ऑफ द हेवन' चित्रपटातील बोळींतून फाटका बूट घालून पळणारे बहीण-भाऊ आठवले. या पंढरपुरी चित्रपटात एका सरळमार्गी कुटुंबावर संकट येतं. चरितार्थाची साधन असलेली स्वेटर विणणारी मशीनच बँक अधिकारी कर्जापायी जप्त करतो. अशा कठीणप्रसंगी अंगवळणी पडलेल्या रिवाजाप्रमाणे ही संकटग्रस्त पात्रं गावातल्या मूर्तिरूप पांडुरंगासमोर हात जोडून उभी राहय़ला हरकत नव्हती. पण तसं घडत नाही. मुलगा-मुलगी, आई- आजी असे सर्वजण आपापल्या परीनं या प्रश्नाला भिडतात. साक्षात् पंढरपुरात हे लोक स्वत:चा विठ्ठल शोधतात. घरातला कर्ता पुरुष गेल्यावर बाई स्वेटर विणून, पोळ्या लाटून घर चालवतेय. दोन मुलं, सासू यांचा गाडा रेटतेय. हे कथानक पंढरपुरात घडतंय. आचरणाने वारकरी संप्रदाय पचवलेलं हे घर आर्थिकदृष्टय़ा गरीब असलं तरी पंढरपुरातल्या घरापेक्षा वेगळं आहे. कारण या घरात देवांच्या फोटोबरोबरच न्यूटनचा फोटो लावलेला आहे. न्यूटनचा नुस्ता फोटोच नाहीए, तर या घरातल्या स्वर्गवासी प्रमुखाने नव्या प्रकारची सायकलही स्वत: बनवलेली आहे.

वृक्षाची पानं खाऊन परीक्षेत यश मिळवू पाहणाऱ्या दैवी वातावरणात स्वकर्तृत्वानं प्रश्नाला सामोरं जाणारं हे कुटुंब आहे. दृश्यरूपात अबीर, बुक्का, तुळशीच्या माळा दिसत नसल्या तरी खरा भागवतधर्म कळलेली ही पात्रं जगणं समृद्ध करतात.

अशीच पंढरपुरी पाश्र्वभूमी असलेला 'लय भारी' चित्रपट काही दिवसांपूर्वी आलेला होता. त्या चित्रपटाचा 'पब्लिक खिंच' इरादा स्पष्ट होता आणि तो साध्यही झाला. यातील नायक चमत्कारिक मारामाऱ्या करतो, नाहीतर विठ्ठलासमोर हात जोडून उभा राहतो. (गावात विठ्ठल उपलब्ध असल्यावर का उभं राहू नये?) पण 'एलिझाबेथ एकादशी'मधील पात्रं स्वत:च्या कर्तृत्वावर विश्वास ठेवून नैतिक मार्गाने प्रश्नाला सामोरे जातात. कातडीसारखी जगण्याला चिकटलेली माणसाच्या भोवतालची दुनिया 'फिल्मी' असू शकत नाही. ती वास्तवच असते. जशी 'एलिझाबेथ'मध्ये आहे. 'एलिझाबेथ'मधील पात्रांची भाषा, लकबी, पोशाख, घरे, रस्ते, गल्ल्या, बोळी व मानसिकता अस्सल पंढरपुरी आहे. पात्रांची निवड करताना नेहमीचे यशस्वी चेहरे न घेता अस्सल पंढरपुरी पात्रांना पडद्यावर आणलेलं आहे. त्यामुळे हे मंदिराबाहेरचं पंढरपूरदर्शन स्वत:मधला विठ्ठल शोधण्यासाठी माणसाला जागं करतं.

आमच्या एक आत्याबाई होत्या. स्वतंत्र विचाराची फटकळ बाई. रागिष्ट तेवढय़ाच प्रेमळही. बऱ्याचदा त्यांचे घरातल्यांशी वाद व्हायचे. मग अशावेळी आत्याबाई पंढरपुरात जाऊन खुशाल राहायच्या. घराच्या आठवणी भोवती जास्तच फेर धरू लागल्या की आत्याबाई पुन्हा गावी परत यायच्या. आत्याबाईंनी एकदा मला तांब्यांत कोंडलेल्या विठ्ठलाची गोष्ट सांगितली. तांब्यात बंद करून ठेवलेला विठ्ठल आत्याने पंढरपुरातल्या एका मठात पाहिला होता. त्याचं झालं असं : माणसात देव पाहणारा भागवतधर्म.. पण विठ्ठलाचं दर्शन घेण्याची अस्पृश्यांना परवानगी नव्हती. वारकरीविचाराला कलंक असलेली ही परंपरा होती. म्हणून साने- गुरुजींनी अस्पृश्यांना विठ्ठलमंदिरात प्रवेश मिळावा म्हणून उपोषण केलं. गुरुजींच्या या प्रयत्नांना यशही आलं. अस्पृश्य दर्शनासाठी मंदिरात जाणार त्याच्या आदल्या दिवशीच एका महाराजांनी एक दिव्य प्रकार केला. महाराजांनी मंत्राच्या सामर्थ्यांनं विठ्ठलाचा आत्माच एका तांब्यात (कलशात) बंद केला. आत्माच काढून घेतल्यामुळं त्यांच्या मते आता मंदिरात फक्त दगडाची मूर्तीच उरलेली आहे. अस्पृश्यांच्या स्पर्शानं मूर्ती विटाळली, पण कलशातला आत्मा पवित्रच राहिला आहे. आजही तो कलश पंढरपुरातल्या कुठल्यातरी मठात आहे म्हणे. असे कुठे कुठे कोंडून ठेवलेले विठ्ठल 'एलिझाबेथ एकादशी'सारख्या धक्क्य़ानं मुक्त व्हायला नक्कीच मदत होईल. म्हणजेच ज्याचं त्याला पंढरपूर गवसेल.

दासू वैद्य - dasoovaidya@gmail.com