Monday, 4 May 2015
सीमेवरचं नाटक
घोळक्या-घोळक्यांनी लोक निघालेत. त्यांना साधायची आहे संध्याकाळची वेळ. पुरुष, बायका, म्हातारे, तरुण, लेकरं असे जथ्थे आतुर झालेले. या गर्दीला सोल्जरांकडून जागोजागी अडवलं जातंय. सुरक्षेच्या कारणानं तपासलं जातंय. भोवताली सगळं तणावग्रस्त वातावरण. जागोजागी बंदूक रोखून सोल्जर पहारा देताहेत. रंगीबेरंगी माणसांनी प्रशस्त रस्ता भरून गेलाय. गर्दीत हिंदीशिवाय तेलगू, तामीळ, गुजराती, बंगाली, पंजाबी, मराठी अशा अनेक भारतीय भाषा कानावर पडताहेत. परदेशी पाहुण्यांचीही शांत, संयत उपस्थिती आहे.
रस्ता कधी संपत नसतो. एक तर पाय थकतात किंवा प्रवासाचा ठेपा आलेला असतो. तसाच हा गर्दीनं ओसंडून वाहणारा आतुर रस्ता थांबला. समोर एका भव्य गेटनं रस्त्यावरच्या पावलांना मज्जाव केला.. म्हणजे पुढं जायला बंदी होती. कारण तो प्रदेश आपला नव्हता. स्पष्टच सांगायचं तर तो प्रदेश पारंपरिक शत्रूचा होता. मग एवढय़ा संख्येनं हे लोक शत्रूच्या प्रदेशावर चालून तर जात नव्हते? छे! छे! ही सारी पापभिरू पर्यटक माणसं. काठावरून पूर पाहताना घाबरणारी. पण अशा माणसांतील देशभक्ती जागी केली जातेय. हिंदुस्थानचा जयघोष पुकारून वातावरणात जोश आणला जातोय. बुलंद आवाजाचा एकजण कण्र्यातून त्यासाठी आवाहन करतोय. त्याच्या घुमणाऱ्या 'हिंदुस्थान..' अशा सादाला आतुर लोकांचा समूह 'जिंदाऽऽबाद' असा प्रतिसाद देतोय. यातच वातावरणाला कापत येणाऱ्या खडय़ा सैनिकी आवाजात 'परेऽऽड' घुमू लागते. सगळं वातावरण भारून जातं. आता गर्दी गेटजवळच्या मोकळ्या जागेत स्थानापन्न होतेय. तिथं प्रेक्षकांसाठी गॅलरी उभारलेल्या. व्हीआयपींसाठी खुच्र्या टाकलेल्या. खचाखच भरलेल्या या स्टेडियमवर गेल्या अनेक वर्षांपासून ही परेड होत असते. वाघा बॉर्डरवर होणारा हा सोहळा पर्यटकांना आकर्षून घेतो.
ज्यांनी ही परेड स्वत: पाहिलेली आहे त्यांनी हा 'तयार केलेला' थरार अनुभवलेला असतो. पण ज्यांनी ही परेड प्रत्यक्ष पाहिली नसेल त्यांनी टीव्हीवरची फेविक्विकची 'तोडो नहीं, जोडो' ही जाहिरात आठवावी. पाकि स्तानी आणि भारतीय सैनिक त्वेषाने परेडच्या नावाखाली दणादण पाय आपटताहेत. नेमकं पाकिस्तानी सैनिकाच्या बुटाचं सोल निघतं. (ही जाहिरात पाकिस्तानात दाखवायची असेल तर भारतीय सैनिकाच्या बुटाचं सोल निघेल.) भारतीय सैनिक परेड सुरू असताना त्याला फेविक्विक देतो. पाकिस्तानी सैनिकाच्या बुटाचं सोल जोडलं जातं. पाश्र्वभूमीवर 'तोडो नहीं, जोडो' असा संदेश झळकतो. ही जाहिरात या वाघा बॉर्डरच्या परेडवरच आधारित आहे. खरं तर दुश्मनी उगाळत बसण्यापेक्षा दोस्तीसाठी हात पुढं करणं हे सर्वाच्याच हिताचं असतं. सौहार्द वाढवणं हाच या परेडचा मूळ हेतू असावा. आज मात्र या परेडला सीमेवरच्या नौटंकीचं स्वरूप आलेलं आहे. या परेडमधील हावभाव संघर्षांचा पवित्राच उजागर करतात. त्यामुळे दोन्ही देशांतील पारंपरिक खुन्नसच रोज आळवली जाते. गेटपलीकडचे पाकिस्तानी सैनिक आणि नागरिक दिसल्यावर तर 'हिंदुस्थान जिन्दाबाद'चा नारा अधिकच चेकाळतो. गर्दीच्या देहबोलीत खुन्नस जाणवायला लागते. रेडय़ांची टक्कर पाहताना जमलेल्या लोकांनी हवेत फेटे उडवावेत, टाळ्या वाजवाव्यात, तसं वातावरण तयार होतं.
एकमेकांच्या विरोधात असणाऱ्या दोन देशांत सौहार्दानं हात मिळविण्याचा खरं तर हा सोहळा; पण दृश्यरूपात मात्र खुन्नसच भरून राहिलेली. फेविक्विकच्या जाहिरातीतसुद्धा त्या सैनिकांचं अती पाय आपटणं त्रासदायक वाटतं. वाटलं, जाहिरातीत बुटाचं सोल काढायचं म्हणून जास्तीचे पाय आपटले असतील. पण प्रत्यक्षातही भयंकर पाय आपटण्याचा त्रासच होतो. त्या सैनिकांच्या चेहऱ्यावरचे भावही रौद्र आणि उग्रच आहेत. सैनिकी संचलनात पाय आपटण्याला वेगळा काही सिद्धतेचा अर्थ असेल, पण दिसताना मात्र आपल्याला ठळक क्रोध किंवा बदलाच जाणवत राहतो. आधी ही परेड साध्या स्वरूपात होत असणार.. पण जसजसा 'टीआरपी' वाढत गेला तसतसं त्याला एक उत्सवी स्वरूप येत गेलं असावं. दोन बाजू. दोन पक्ष. दोन देश. 'हिंदुस्थान जिंदाबाद', 'पाकिस्तान जिंदाबाद' अशा दोन घोषणा. हिरवा आणि तिरंगा असे दोन रंग. एका गेटवर महात्मा गांधी, तर दुसऱ्या गेटवर बॅ. जीना असे दोन फोटो. या पाश्र्वभूमीवर एकमेकांविरुद्ध चित्कारणारे दोन समूह. यांत रोज टक्कर घडवली जाते. हहा मधील मारामाऱ्या जशा पूर्वनियोजित असतात, तशीच ही देशभक्तीची टक्करही ठरवल्यासारखी! सौहार्दाच्या नावाखाली दररोज साजरी होणारी ही खुन्नस न पटण्यासारखीच. दहशतवादाला आश्रय देणाऱ्या, रोज कुरापती काढणाऱ्या, सीमेवरच्या निरपराध लोकांवर गोळीबार करणाऱ्या, भारतात बॉम्बस्फोट घडवून आणणाऱ्या पाकिस्तानचं समर्थन करताच येणार नाही. पण याचा अर्थ हा राग रोज 'साजरा' करावा असा होत नाही. परेडच्या शेवटी पाकिस्तान आणि भारताचे सैनिक एकमेकांशी हस्तांदोलन करतात. हा क्षण त्या परेडचा अत्युच्च क्षण ठरायला हवा होता. पण याउलट रौद्ररस चेहऱ्यावर ओसंडताना सैनिक पाय आपटत एकमेकांना खुन्नस देतात तो क्षण लोकांना अधिक भावतो. लोक त्यावेळी चेकाळतात. वरतून घोषणा देऊन लोकांना अधिक पेटवलं जातं. त्यामुळे ही परेड म्हणजे रेडय़ांची टक्करच ठरते.
का कोण जाणे, पण ही परेड पाहताना लहानपणी पाहिलेली रेडय़ांची टक्करच आठवत होती. रेडा हा तसा प्रमाणभाषेतला शब्द झाला. आमच्याकडे त्याला 'हलगट' असा शब्द वापरायचे. दिवाळीच्या वेळी गावाबाहेरच्या मोकळ्या जागेत या टकरी व्हायच्या. पंचक्रोशीतले रेडे या टकरीसाठी येत. वर्षभर या रेडय़ांना तयार केलं जाई. तुकतुकीत काळ्याशार रंगाचे सजवलेले हे रेडे उन्हात चमकायचे. या रेडय़ांना वर्षभर भरपेट खुराक असे. नदीकाठच्या वाळूत पळवून त्यांच्या पायांतली मजबुती वाढवीत. टकरीच्या आदल्या रात्रभर तोंड वरती झाडाला बांधून ठेवलं जाई. पुंग्या, डफडं वाजवत हे वेगवेगळ्या गावचे रेडे मैदानात दाखल होत. पताका लावून सजलेल्या मैदानात लोक चेकाळलेले असत. लाऊडस्पीकरमधून रेडय़ांबद्दल माहिती व इतर सूचना सुरू असत. कुणाचा रेडा जिंकतोय, यापेक्षा रेडे एकमेकांना भिडतानाचा थरार प्रेक्षकांना हवा असे. गावातले धुरिण फेटे बांधून मैदानात संयोजक म्हणून मिरवत असत. दोन रेडे विरुद्ध बाजूंनी येऊन एकमेकांना भिडत. या टकरीत जोश आणण्यासाठी 'डडंग डांगचिक..डडंग डांगचिक' डफडं वाजायचं. (हे म्हणजे वाघा बॉर्डरवर 'हिंदुस्थान जिंदाबाद' म्हणण्यासाठी जोरदार प्रोत्साहन देण्यासारखंच!) फुसफुसणारे दोन बलवान रेडे मग सर्वशक्तीनिशी भिडायचे. शिंगांत शिंगं अडकायची. शिंगांमुळे त्यांच्या पाठी रक्तबंबाळ व्हायच्या आणि लोक टाळ्या वाजवत असायचे. हरलेला रेडा वाट फुटेल तिकडं जिवाच्या आकांतानं पळत सुटायचा. जिंकलेला रेडा त्याचा विजयी पाठलाग करायचा. बऱ्याचदा या धुमश्चक्रीत शेजारच्या शेतातल्या उभ्या पिकाची नासाडी व्हायची. एकदा असाच हरलेला रेडा पळत सुटला आणि नेमका आम्हा लहान मुलांकडे आला. लाकडी कठडा रोवलेला होता, पण बेभान रेडय़ांना कठडा तोडायला फार वेळ लागला नसता. आम्ही पोरं चिरडलोच असतो. पण काही कळायच्या आतच मैदानात फेटेधारी माणसांनी धावाधाव केली आणि त्या रेडय़ांना हुसकून लावलं. तेव्हा त्या रेडय़ाची शिंगांमुळे चिरलेली पाठ आणि काळ्याशार पाठीतून ओघळणारं रक्त मी पाहिलं होतं. मालकाच्या प्रतिष्ठेसाठी रक्तबंबाळ होणारे रेडे काय, किंवा देशाच्या सन्मानार्थ पाय आपटणारे सैनिक काय, दोघेही असहायच वाटतात. आपला खेळ होतो आणि त्यांचा जीव जातो.
Monday, 13 April 2015
अंधारातला नट
राष्ट्रीय नाटय़ विद्यालयानं आयोजित केलेला भारतीय रंग महोत्सव या वर्षी प्रथमच आमच्याकडे झाला. अप्रतिम नाटकं बघायला मिळाली. बंगाली भाषेतलं 'गंभिरा-गंभिरा' हे लोककलावंताची कैफियत मांडणारं नाटक, नेपाळी कलावंतांनी सादर केलेलं 'राशोमान', अमेरिकन रंगकर्मीनी सादर केलेलं नाटककार युजिन ओनिलच्या फक्त रंगसूचनाचं अफलातून सादरीकरण. या महोत्सवात अल्बर्ट कामूचं 'कॅलिगुला' नावाचं एक नाटक बंगाली भाषेत सादर झालं. या नाटकात राजाची मध्यवर्ती भूमिका करणाऱ्या बंगाली नटानं सगळय़ाचंच लक्ष वेधून घेतलं. कितीतरी दिवसांनी असा ताकदीचा नट पाहायला मिळाला. चांगल्या नटातील ऊर्जा लक्षात आली. पडदा उघडून बंद होईपर्यंत या नटानं संपूर्ण रंगमंच ताब्यात घेतलेला होता.
एखाद्या खोपीत वारा घुसतो आणि खोपीचं छप्पर उडवून नेतो, तसं गौतम हलधर नावाच्या या बंगाली नटात पात्र घुसलं आणि तो रंगमंचावर पिसासारखा हलका होऊन तरंगत होता.
प्रयोग संपल्यावर या नटाशी बोलताना एक विचित्र गोष्ट लक्षात आली. त्या गोष्टीचा या नाटय़प्रयोगाशी काहीही संबंध नव्हता. तर या नटाच्या व्यक्तिमत्त्वाशी प्रचंड साधम्र्य असणारी एक व्यक्ती मला आठवू लागली. फक्त डोळय़ातील बुबुळांचा रंग थोडा वेगळा होता. बाकी जुळे भाऊच. दिग्दर्शक मनमोहन देसाईंच्या 'लॉस्ट अॅण्ड फाउंड' फाम्र्युल्यात चपखल बसणारी ही स्टोरी झाली असती. लहानपणी काही कारणांनी दोन भाऊ बिछडतात. एक बंगाली रंगभूमीवर मोठा नट होतो आणि दुसरा रात्री गस्त घालणारा गुरखा होतो. योगायोगाने रात्री नाटकाचा प्रयोग करून नशेत परतणाऱ्या नटाला गुरखा अडवतो. त्यांची भांडणं होतात. प्रचंड मारामारी होते. दोघेही जखमी होतात. या झटापटीत नटाला गुरख्याच्या हातावर गोंदलेलं चिन्ह दिसतं. नट थबकतो. कारण त्याच्याही हातावर असंच गोंदलेलं चिन्ह असतं. अशा प्रकारे बिछडलेले भाऊ अनपेक्षितपणे भेटतात. कथानकात असं काही वळणही आणता आलं असतं. पण 'कॅलिगुला' नाटकातील नटाशी दिसण्यात साधम्र्य असणारी व्यक्ती गायब आहे आणि आता असा जुना 'लॉस्ट अॅण्ड फाउंड' फाम्र्युला घेऊन कोण सिनेमा करेल, केला तर लोक पाहतील का, अशा प्रश्नांची उत्तरं शोधण्यापेक्षा त्या बंगाली नटाशी साधम्र्य असलेल्या व्यक्तीबद्दल बोलणं सोपं आहे.
साधारणपणे आठेक वर्षांपूर्वीची घटना आहे. छोटय़ा गावात फार साहित्यिक-सांस्कृतिक वातावरण नसतं. पण साहित्यिक-सांस्कृतिक क्षेत्रातील माणसांना भाव मात्र असतो. कारण अशा गावात छोटय़ा-मोठय़ा कार्यक्रमात एखादा प्रमुख पाहुणा लागतो. कार्यक्रमाला अध्यक्षाची गरज असते. तिथं भाषण करणारे, बोलणारे फार जण नसतात. अशावेळी लोकांसमोर उठून काहीतरी बोलणाराही सन्माननीय ठरतो. प्राध्यापक असणाऱ्यांना तर जगातल्या कुठल्याही विषयावर बोलण्याचा परवानाच असतो. अशा कार्यक्रमाकडे एक अनुभव म्हणूनच बघयला हवं.
असाच एक शेजारच्या खेडेगावातल्या नव्याने उघडणाऱ्या ग्रंथालयाचा कार्यक्रम. मित्र आणि मी कार्यक्रमाला निघालो. कार्यक्रम संध्याकाळी सात वाजता म्हणून आम्ही वेळेत पोहोचण्याच्या हिशोबाने निघालो. वेळेत पोहोचलोही. अजून तर कार्यक्रम स्थळी एक-दोघांशिवाय कुणीही नव्हतं. कार्यक्रम रद्द झाला असावा असं वातावरण. सात वाजून गेल्यानंतर एकेकजण येऊ लागला. दरम्यान आम्हाला दोन-तीन वाडय़ात आग्रहाने चहापाण्याला नेण्यात आलं. आता चांगलं अंधारून आलं होतं. साडेआठ वाजले होते. एक टय़ुब व एका पेट्रोमॅक्सच्या प्रकाशयोजनेत कार्यक्रम सुरू होण्याचे चिन्ह दिसू लागले. शेवटी सव्वानऊ वाजता एकदाचा कार्यक्रम सुरू झाला. स्वागत समारंभच अर्धा तास सुरू होता. तेच आठ-दहा हार पुन्हा परतून वेगवेगळय़ा गावकऱ्याच्या गळय़ात पडू लागले. उपस्थितांपैकी हार गळय़ात पडला नाही असे फार कमी लोक राहिले. नंतर सरपंचांचं लांबलचक भाषण. मधेच कुठल्या तरी स्थानिक पुढाऱ्याचा सत्कार राहिला, म्हणून थोडा गदारोळ. मग कार्यक्रम थांबवून राहिलेल्या उपेक्षित दोघांचा सत्कार. म्हणजे तेच हार नव्याने खूप ओव्हर्स टाकलेल्या लेदर बॉलची शिवण उसवून जावी तशी गळय़ात पडून-पडून या हारांची झालेली अवस्था. गावातल्या शाळेतील शिक्षकानेही हक्क दाखवत दोन मिनिटे म्हणून बराच वेळ भाषणकला दाखवली. शेरोशायरी सांगणाऱ्या निवेदकाने रात्री ११ वाजता 'आता आपल्यासमोर येत आहेत शब्दप्रभु.' अशी उद्घोषणा केली. तेव्हा कुठं आम्हाला बोलण्याची संधी देण्यात आली. तेव्हा झोपेला आलेले गावकरी काढता पाय घेत होते. म्हणून आम्ही ग्रंथालयाला शुभेच्छा देऊन खाली बसलो. नंतर एका शेतात दालबाटीच्या जेवणाचा कार्यक्रम. जेवण उरकून आम्ही वापस निघालो तेव्हा रात्रीचा एक वाजलेला होता. मित्राने आमच्या कॉलनीत मला आणून सोडलं आणि तो घरी गेला. रात्रीचे पावणेदोन वाजलेले. मुख्य रस्त्यापासून तीन-चार मिनिटं आत पायी जावं लागायचं. मी निघालो. रात्र पेंगुळलेली. दूरवर कुठे तरी कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज. बसस्थानकावरची स्पष्ट ऐकू येणारी उद्घोषणा. तेवढय़ात काठी आपटण्याचा आवाज. पाठोपाठ शिट्टी. काठीचा आवाज जवळ येऊ लागला. डोक्याला टोपी, हातात टॉर्च, काठी असा गुरखा समोर उभा राहिला. खांबाच्या लाईटखाली तो उभा. खांबावरच्या लाईटचा प्रकाश त्याच्यावरून निथळतोय. त्याने मला हटकले. 'कहाँ जाते हो' त्याच्या प्रश्नाचं उत्तर देण्याऐवजी मी त्याच्याकडे पाहतच राहिलो. आवाजात जरब होती. एक तर हा गस्त घालणारा गुरखा नवीन होता. जुना गुरखा गावाकडे निघून गेला आणि त्याच्या जागी हा नवा फिरू लागलाय. त्यामुळे त्याची माझी ओळख नसावी. रात्री-अपरात्री फिरणाऱ्याला हटकणं त्याचं कामच होतं. मीही माझ्या घराकडे निर्देश करीत ओळख दिली. त्यालाही ती पटली. हा गुरखा म्हणजे कुठल्याही हिंदी सिनेमाच्या सेटवर हिरो म्हणून उभं करावा असा देखणा. त्याला सहज छेडलं, 'ये डंडा लेके इधर क्या घुमते हो, तुम तो फिल्मो मे जाना चाहिये.' तो जरा लाजला, 'नही शाबजी. हमको कोन फिलीम मे लेगा' त्याला अभिनय येत होता की नाही माहीत नाही. पण जाहिरातीत मॉडेल म्हणून तो यशस्वी झाला असता. त्याचा बोलका चेहरा, त्याचं रूपवान असणं मला विचित्र वाटू लागलं. कारण सौंदर्य ही सापेक्ष गोष्ट आहे. तिची तुलना झाली पाहिजे. तिला दाद मिळाली पाहिजे. हा रूपवान तरुण पेशाने गुरखा होता. रात्री सगळे झोपल्यावर अंधारात रखवालीसाठी हा बाहेर पडणार. मग या रूपाला पाहणार कोण? आपण नवा ड्रेस घातला आणि कोणीच नोंद घेतली नाही तर वाईट वाटतं. याउलट नव्या ड्रेसची तारीफ झाली तर पैसे वसूल होतात.
पुढं काही दिवस या हिरोची भेट झाली नाही. अचानक एके दिवशी दुपारी तो घरी आला. दिल्लीतल्या नातेवाईकांसाठी त्याला पैसे पाठवायचे होते. मनीऑर्डर फॉर्म भरून देण्यासाठी तो आला होता. फॉर्म भरला. चहा झाला. तरी तो घुटमळत होता. त्याला काहीतरी सांगायचं होतं. त्याचा संकोच लक्षात घेऊन मीच बोललो, ''कुछ कहना चाहते हो?'' या प्रश्नाचा आधार घेत तो बालू लागला. ''शाबजी, फिलम मे हम जा सकता क्या?'' हा प्रश्न विचारताना त्याच्या निळसर झाक असणाऱ्या डोळय़ात चमक होती. भुऱ्या रंगाचे लांब केस गोऱ्या चेहऱ्यावर अधिकच उठून दिसत होते. पॉलिथिनच्या कव्हरमध्ये व्यवस्थित आणलेले त्याचे फोटो त्यानं दाखवले. हिरो स्टाईल वेगवेगळय़ा पोजमधले फोटो मी पाहत राहिलो. फोटोवरून हिरो बनण्याचा विचार त्याच्याही मनात रेंगाळत होता असं वाटलं. तो बरंच काही सांगत राहिला. त्याच्या रूपाची त्यालाही जाणीव होती. एवढंच काय, रात्रभर जागरण झाल्यावरही तो सकाळी व्यायाम करायचा. लहानपणी गावातल्या नाटकात त्यानं छोटं कामही केलेलं होतं. त्याच्या भाषेतली गाणी म्हणायचा. काही हिंदी गाणीही त्याला पाठ होती. घरी मुलखाचं दारिद्रय़. पोटासाठी अंधारात काठी आपटत फिरावं लागलं. अंधाराची सवय झाली. दिवसाउजेडीही डोळय़ासमोर अंधार झाला. पुढं तिनेक महिन्यांनी भेटला. दरम्यान मराठी फिल्म इंडस्ट्रीत माझे काही मित्र आहेत असं त्याला कोणीतरी सांगितलं होतं. खरं तर या इंडस्ट्रीत प्रचंड संघर्ष करणाऱ्या मित्रांची परिस्थिती मला माहीत होती. या अंधारातल्या हिरोला मीच खरं ओळखलंय अशी त्याची भावना झालेली. त्यामुळं त्यानं पुन्हा फिल्मचा विषय काढला. सोबत पॉलिथिनमध्ये गुंडाळलेले फोटो होतेच. अंधारातून प्रकाशात येऊ पाहणाऱ्या त्याच्यातील अभिनेत्यासाठी मी काय करू शकत होतो? शेवटी या क्षेत्रातील संघर्ष, स्पर्धा, अडचणी, तपश्चर्या असं काय काय सांगण्याचा प्रयत्न केला. तो थोडासा नाराज झाला.
काठी आपटण्याचे, शिट्टीचे आवाज येत राहिले. पण त्याची भेट झाली नाही. चार-पाच महिने गेले. एक दिवस पैसे मागायला आलेला नवीनच गुरखा दिसला. मला आश्चर्य वाटलं. मी त्याला आपल्या हिरोबद्दल विचारलं. त्यानं सांगितलं, 'शाबजी, ओ तो बम्बई चला गया. अब उधऱ्ही काम करेगा' त्याचं असं अचानक मुंबईला निघून जाणं सूचक होतं. मी सांगितलेला त्याचा भाषेचा प्रश्न इतराच्या खडतर संघर्षकथा त्याला नकारात्मक वाटल्या असतील. म्हणून जाताना मला भेटणं त्यानं टाळलं असावं. या घटनेलाही आता आठेक वर्षे झालीत. इंडस्ट्रीतला संघर्ष मी त्याच्यासमोर आळवला असला तरी अशा संघर्षांतूनच पुढं आलेल्या यशोगाथा मला माहीत आहेत. त्यामुळे नवा सिनेमा पाहत असताना नकळत या अंधारातल्या हिरोला शोधत असतो. काय सांगावं, एखाद् वेळी निळसर डोळय़ांचा हा हिरो, नायिकेसोबत पडद्यावर थिरकतानाही दिसेल. नाही तरी, गौतम हलधर या ताकदीच्या बंगाली नटाला मी अचानक रंगमंचावर पाहिलं होतं. या प्रकाशातल्या नटामुळं एक अंधारातला नट लख्ख दिसला. नट प्रकाशातला असो का अंधारातला असो; त्याच्यातील तडफ जीवघेणी असते. नाटय़गृहात प्रेक्षकातून गायब झालेला प्रकाश अशा अंधारातल्या नटावर निथळायला हवा.
Subscribe to:
Posts (Atom)

